वाचननिष्ठेची मांदियाळी
एखद्या सोमवारी तुम्ही तुमची मेलबॊक्स उघडता आणि तुम्हाला एक नवी मेल आलेली दिसते. तीही मराठीतून! विषय असतो ’अक्षरवाटा’. विस्मरणात गेलेल्या एखाद्या पुस्तकातला एखादा वाचनीय उतारा...एखादी कविता...एखादा लेख तुमच्या वाटेवर या मेलमधून आलेला असतो. नव्या आठवड्याची सुरुवात होत असते आणि असा छान उतारा वाचायला मिळाल्याने तुम्ही एकदम प्रसन्न होऊन जाता. वाचनाची, पुस्तकांची, साहित्याची वाट तुम्ही विसरला असाल तर ती तुम्हाला खुणावत येते या मेलमधून. तुमचा कामाचा मूड आणखी वाढतो. नव्या आठवड्याची सुरुवात तर मस्त झालेली असते.
उदाहरणार्थ ही अक्षरवाट तुम्हाला दुर्गा भागवत यांच्या एखाद्या विचारप्रवर्तक उतार्याकडे घेऊन जाते. किंवा श्याम मनोहर यांच्या नव्याकोर्या कादंबरीतल्या परिच्छेदाकडे. किंवा एखाद्या वैज्ञानिक पुस्तकातल्या माहितीकडे वा किशोरी आमोणकर यांच्या स्वरार्थमणी या सांगीतिक ग्रंथाकडे.
मेलमध्ये उतार्या सोबत ही टीप असते - ’प्रत्येक सोमवारी मी 'अक्षरवाटा' मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. आजच्या सोमवारपासून आपल्यालाही हे विचारधन पाठवायला सुरुवात केली आहे. तरी आपल्याला हे विचारधन मिळाले का ? ते देवनागरीत असल्यामुळे आपल्याला ते वाचता आले का? (यूनिकोड नसल्यास देवनागरी वाचता येत नाही, म्हणून हा प्रश्न.) कृपया कळवावे. आपण हे आधीच वाचले असेल तर याकडे दुर्लक्ष करावे. कारण ही सूचना या मांदियाळीत नव्याने सामिल होणार्यांसाठी आहे. आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत - शुभदा पटवर्धन.
दुर्गा भागवत यांचा उतारा ज्या पुस्तकातून घेतला त्याची माहितीही मेलमध्ये शुभदाने दिलेली असते. पुस्तकाचं नाव पैस. लेखिका दुर्गा भागवत. प्रकाशक मौज प्रकाशन गृह. मूल्य: साठ रूपये. प्रथम आवृत्ती : १९७०, पाचवी आवृत्ती : २००३. सोबत शुभदाची ही टीपसुद्धा असते -’अक्षरवाटातील उतारे ज्या पुस्तकातून घेतले आहेत, त्या पुस्तकांचे प्रकाशक कोण आणि त्यांचे मूल्य काय याबद्दल विचारणा होत असते, ही अतिशय आनंदाची बाब आहे. किंवा प्रकाशक आणि मूल्य ही माहितीही उतार्याबरोबर दिलेली असावी अशीही सूचना अनेकांनी केलेली आहे. ही सूचना अगदी योग्य आहे, यात शंका नाही. पण फार पूर्वीपासून मी या उतार्यांची नोंद करत आले आहे आणि या विचारधनाचा पुढे असा काही उपयोग होईल अशी तेव्हा कल्पना नसल्याने पुस्तकाचे नाव आणि लेखकाचे नाव याचीच फक्त नोंद करून ठेवली. पण यापुढे जिथे ही माहिती देणं शक्य आहे, तिथे ही माहितीही देण्याचा प्रयत्न करेन. परत एकदा मनापासून धन्यवाद.’
तुम्हाला अशी छान मेल मिळाली की ती आपल्या मित्र-मॆत्रिणींना फ़ॊरवर्ड करावीशी वाटतेच. शुभदाच्या या उपक्रमामागच्या प्रेरणा दोन. पहिलं तिचं पुस्तकप्रेम. दुसरं संवादाची ओढ. कशी सुचली ’अक्षरवाटा’ ची कल्पना? ती सांगते -’शाळकरी वयापासून वाचनाची खूप आवड. आणि आवडलेले उतारे वहीत लिहून ठेवायची सवय. त्यामुळे वाचनीय उतार्यांचा मोठा संग्रहच माझ्याकडे तयार होत गेला. साहित्याचा मौलिक खजिनाच. कुणाचा वाढदिवस असला, कुणाला शुभेच्छा द्यायच्या असल्या की मी त्या संग्रहातले उतारे वापरून शुभेच्छापत्र तयार करत असे. बाजारात मिळणार्या ग्रीटिंग कार्डांपेक्षा मी तयार केलेली शुभेच्छापत्रं नक्कीच संग्राह्य असायची. पुढे संगणक आला, इंटरनेट आलं, इ मेलने सहज आणि वेगाने संपर्क करता येऊ लागला. दरम्यान आपल्या सगळ्यांच्याच जगण्यातली धावपळ वाढत गेली. प्रत्यक्ष भेटीगाठी, गप्पाटप्पा करणं जमेनासं झालं. संपर्कसाधनं वाढली आहेत आणि संवाद कमी होऊ लागला आहे असं काहीसं. आपल्याकडे ज्या मित्रमंडळी, नातेवाईकांचे मेल आय डी आहेत किमान त्यांच्याशी नियमितपणे संवाद कसा साधता येईल त्याचा विचार करताना ’अक्षरवाटा’ची कल्पना सुचली. म्हणजे आधी असं सुचलं की आपल्या संग्रहातल्या उतार्यांचा उपयोग करून मेल पाठवायला सुरुवात करावी. अशा मेलला काही नाव द्यावं हे नंतर सुचलं. संवाद करावा असं वाटत होतं आणि त्यासाठी साहित्याचा धागा मी पकडला. माझ्या एका वाढदिवशी, १० नोव्हेंबर २००७ ला मी हा उपक्रम सुरू केला. येत्या १० नोव्हेंबरला उपक्रमाला दोन वर्ष होताहेत.’
प्रतिसाद कसा मिळाला? शुभदा सांगते - ’दोन वर्षात ’अक्षरवाटा’ मांदियाळीत सामील झालेल्यांची संख्या शंभर-दीडशेवरून हजार-बाराशेपर्यंत गेली आहे. माझ्याकडे सुरुवातीला फ़क्त शंभर-दीडशे मेल आय डी होते. त्यांना मी मेल पाठवायला सुरुवात केली. त्या शंभर-दीडशेजणांनी माझ्या मेल्स आपापल्या वर्तुळातल्यांना फ़ॊरवर्ड करायला सुरुवात केली. ज्यांना फ़ॊरवर्ड्स मिळाल्या त्यांनी त्यांच्या वर्तुळातल्यांना माझ्या मेल्स आणखी फ़ॊरवर्ड केल्या. ’अक्षरवाटा’चं नेटवर्क असं वाढत गेलं.’अक्षरवाटा’च्या वाचकांत देशी-परदेशी, तरुण-प्रौढ सगळे आहेत. मराठी वाचन सुटलं होतं ते पुन्हा सुरू झालं असं अनेकजण कळवतात. ज्या पुस्तकातला उतारा ’अक्षरवाटा’त असतो ते पुस्तक कुठे मिळेल, आणखी कोणती पुस्तकं वाचावीत अशी विचारणा, मार्गदर्शनाची अपेक्षा, विशेषत: महाराष्ट्राबाहेरच्या मराठी लोकांकडून होते. एरवी मराठी साहित्यापर्यंत न पोचलेल्या तरुणांपर्यंतही अक्षरवाटा पोचतंय. तरुण पिढीचं माध्यमच आहे इंटरनेट. त्यामुळे ही मुलं-मुली मेलबॊक्समध्ये आलेला रेडिमेड मजकुर सहजच वाचतात. प्रतिसाद देतात. या सगळ्यांपर्यंत मराठी साहित्य, पुस्तकं पोचवल्याचा आनंद मला मिळतो. वाचनाचीच आवड नसेल तर लोक प्रतिसाद देणं बंद करतात. प्रतिसाद आला नाही तर मी मेल पाठवणं बंद करते. पण असे थोडेच लोक भेटले मला. ’अक्षरवाटा’च्या वाचकांची संख्या वाढतीच राहिली आहे."
शुभदाकडून ’अक्षरवाटा’बद्दल ऎकताना थक्क व्हायला होतं कारण तिच्या शब्दाशब्दातून जाणवते तिची मराठी भाषा, साहित्य, वाचनाविषयी तीव्र निष्ठा आणि लोकांपर्यंत पोचण्यासाठी तिचं भरपूर कष्ट घेणं.
’अक्षरवाटा’ तिच्या संग्रहातल्या जुन्या उतार्यांच्या पलीकडे कधीच गेलं आहे. पूर्णवेळाची नोकरी, घर-संसार हे सगळं करताना नवनवी पुस्तकं वाचत राहणं, त्यातले उतारे निवडणं, निवडीमध्ये विषय आणि लेखक यांची विविधता राहील याची काळजी घेणं, निवडलेला उतारा स्वतः टाइप करणं आणि सगळे सोपस्कार करून मेल करणं. गेली दोन वर्ष असं न चुकता दर सोमवारी एकहाती ती हे करत आली आहे. व्रतवैकल्यांवर विश्वास नसलेल्या शुभदाचं नव्या युगातलं हे सोमवारचं व्रतच आहे. इंटरनेटवर एक कम्युनिटीच चालवणंच आहे हे तिचं. हे करताना ती नवं तंत्रज्ञान, कधी मुलाची मदत घेत, शिकत गेली. इंटरनेटवर मराठीतून संवाद करण्यातली मोठी अडचण युनिव्हर्सल मराठी फ़ॊन्ट नसणं ही आहे. त्यातून मार्ग काढण्यात वेळ आणि शक्ती खर्ची पडते आणि मजकुराच्या देवाण-घेवाणीतला सहजपणा जातो, गंमतही कमी होते. तरीही शुभदाची ही वाचननिष्ठेची मांदियाळी सुरू आहे, वाढते आहे. आता या ’अक्षरवाटा’ संगणकातून उतरून काही निष्ठावान शिक्षिकांमार्फ़त मुंबईतल्या शाळाशाळांत विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष वाचनाच्या रुपातही पोचणार आहेत. नवतंत्रज्ञानाच्या या युगात आपल्या मायमराठीला बरे दिवस येऊ शकतात असं दिसतं.
(Originally published on Sept 5th, 09 in Sakal)
No comments:
Post a Comment