१९ डिसें ०९
जग बदललेलं आणि न बदललेलं
माहिती तंत्रज्ञानाचा सर्वदूर झालेला प्रसार आणि आर्थिक उदारीकरण यामुळे जग कसं जवळ येत चाललं आहे आणि त्याचवेळी ते कसं सपाटही होत चाललं आहे हे वेगवेगळ्या उदाहरणांची चर्चा करत समजून घेण्याचा प्रयत्न आपण वर्षभर या सदरातून केला. कंप्युटर, मोबाइल फ़ोन ही आता निव्वळ संपर्कसाधनं राहिली नाहीत. या साधनांच्या मदतीने आपली गुणवत्ता, क्षमता वाढवता येणं शक्य झालं आणि त्यामुळे आर्थिक स्तर उंचावता येणं हे घडू लागल्याचं आपण महाराष्ट्रातली, भारतातली, जगभरातली; शहरातल्या आणि खेड्यातल्याही अनेक माणसांची उदाहरणं घेत पाहिलं.
मनाची खिडक्या-दारं सताड उघडून बदलणारं जग समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला.
पण याच जगात न बदललेलंही कितीतरी आहे. युरोप-अमेरिकेतले मोजके देश सोडले तर लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडातल्या रहिवाशांना अजुनही अन्न, वस्त्र, निवारा पुरता मिळालेला नाही. लाखो मुलं जन्माला आल्याआल्याच मरत आहेत. जी जगली ती कुपोषण, रोग यांच्यापासून बचाव करू शकत नाहीत. बचाव करून घेतलाच तर ती मुलं शिक्षणापासून दूर राहातात. मलेरियासारख्या साध्या आजारापासूनही आपली सुटका झालेली नाही. रस्ते, वीज, पाणी नसलेलं, अभावग्रस्त असं न बदललेलं जग सार्या तंत्रज्ञानाला, उदारीकरणाच्या नीतीला आव्हान देणारं.
न बदललेलं, बदलाकडे डोळे उघडून बघायचंच नाही आणि जुन्यालाच चिकटून रहायचं असा अट्टाहास बाळगणार्यांचंही एक जग आहे. बदल म्हणजे काहीतरी भयंकर आणि आपल्याला उघड्यावर टाकणारी गोष्ट आहे असं या जैसे थे जगातल्यांना वाटतं. स्वतःचा विकास करून घेण्यासाठी धडपडणारी तरुण मुलं आमचं का ऐकत नाहीत अशी या बदलाला विरोध करणार्यांची सततची तक्रार असते. स्त्रियांचं मोकळेपणाने जगणं, आत्मविश्वासाने वावरणं, नवनव्या संधींचा लाभ घेण्यासाठी सक्षम होणं हे जैसे थे जगातल्या लोकांना सहन होत नाही. ते स्त्रियांना जन्मालाच येऊ देत नाहीत. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग ते नक्कीच करतात; पण जगाला मागे नेण्यासाठी.
याच मागेच राहणार्या जगात अजूनही माणसाचं श्रेष्ठत्व जाती-धर्मावर, काळ्या-गोर्या रंगावर ठरवलं जातं. जैसे थे जगाने नीच मानलेल्या जाती-धर्मातल्या लाखो माणसांनी कितीही कर्तुत्व गाजवलं तरी ते नाकारत राहाणारं एक मोठं न बदललेलं जग आजही अस्तित्वात आहेच की.
तंत्रज्ञानाने मानवी व्यवहारात कितीही पारदर्शकता आणली तरी तिला वळसा घालून आपला स्वार्थ साधणार्या भ्रष्ट राजकारण्यांचं, नोकरशहांचं जगही अजून बदललेलं नाही. माणसांना समान पातळीवर आणून ठेवणार्या जागतिकीकरणाच्या युगातही आपल्या राजकारणात नवी राजेशाही अवतरली आहे.
आणखी एक जग आहे. ज्या तंत्रज्ञानाच्या मदतीने जगणं सुखकारक होऊ शकतं त्याच तंत्रज्ञानाला धरून अख्या मानवजातीला भीतीच्या विळख्यात घेरून टाकणारं ९/११ आणि २६/११ घडवणारं दहशतवाद्यांचं जग.
आपण या सदरासाठी ज्या पुस्तकाचा सतत संदर्भ घेत आलो त्या “द वर्ल्ड इज फ्लॅट” या पुस्तकाचे लेखक थॉमस फ्रिडमन यांनी त्यांच्या आधीच्या पुस्तकात एक विचार मांडला होता. ज्या दोन देशात खाद्यपदार्थ पुरवणारी मॅकडोनाल्डची दुकानं आहेत ते देश एकमेकांच्या विरोधात कधीही लढणार नाहीत हा फ़्रिडमन यांचा विचार. याचा अर्थ असा की ज्या दोन देशांचे हितसंबंध एकमेकात गुंतलेले आहेत ते देश एकमेकांशी मित्रत्वाने वागतील. पुढे जेव्हा सपाट होत गेलेल्या जगात वस्तुंचं उत्पादन आणि विक्री यांच्या जागतिक साखळ्या तयार झाल्या तेव्हा थॉमस फ़्रिडमन यांनी संघर्ष रोखणारी “डेल” थेअरी या नावाने आधीचाच विचार पुन्हा मांडला. डेल कंपनीचे कंप्युटर्स कसे विविध देशांमधले सुटे भाग एकत्र करून बनवले जातात त्याचं तपशीलात वर्णन करून फ़्रिडमन म्हणतात – इतकं एका देशाचं व्यवसायाचं, आर्थिक फायद्याचं गणित दुसर्या देशावर अवलंबून आहे...आणि जागतिकीकरणात सगळेच छोटे-मोठे देश एकमेकांवर अवलंबून आहेत तर मग कोण कशाला भांडण करेल, कुरापती काढेल आणि युद्ध करेल?
पण फ़्रिडमन यांची “डेल” थिअरी सत्तापिपासू, धर्मवेड्या, हिंसाचारी मूठभरांनी खोटी ठरवली आहे.
तंत्रज्ञानाची मदत घेत स्वतःला इतरांशी जोडून अधिकाधिक व्यापक, मोठं करून घेणार्यांचं एक जग. आणि स्वतःच निर्माण केलेल्या धर्म-जात-रंगाच्या कुंपणात बंदिस्त, खुजं होऊन राहाणार्यांचं दुसरं जग. जागतिकीकरणाने हा भेद अजून तरी मिटवलेला दिसत नाही.
मेधा कुळकर्णी.
No comments:
Post a Comment