04 October, 2012

प्रिय आशा, माफ कर.

प्रिय आशा,
काही महिन्यांपूर्वी हरयाणामध्ये जातीबाहेर लग्न करणार्‍या तरूण जोडप्याला कुटुंबियांनीच गावकर्‍यांच्या साथीने ठार मारून टाकल्याच्या  घटनेने खळबळ झाली होती. अशा घटना, तिथल्या ’खाप” पंचायती यांची चर्चा करताना आपण महाराष्ट्रातले लोक हरियाणा, उत्तर प्रदेश अशा राज्यांना मागास ठरवून मोकळे होत असतो. पण आपल्या महाराष्ट्रात सगळं ठीक आहे का? आशा, नुकत्याच घडलेल्या तुझ्या खून प्रकरणाने महाराष्ट्राची वैचारिकता आणि मानसिकता पुरती खरवडून काढली आहे.
अजन्मा मुलींनी जन्माला यावं यासाठी प्रयत्न करणारा जिल्हा ही तुझ्या सातार्‍याची गेल्या दशकभरात ठळक झालेली ओळख. सातार्‍याचं कौतुक झालं होतं २०११ साल संपताना; जेव्हा तिथला मुलींचा जन्मदर  २००१ मधल्या ८७८ वरून ८८१ वर आला होता. २००० साली गर्भलिंगनिदान करून मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करून देणार्‍या केंद्रांचं महाराष्ट्रात पेव फुटलं होतं.  गर्भलिंग निदानाचा धंदा तेजीत होता. सातार्‍यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि बीड या जिल्ह्यांत परिस्थिती गंभीर होती. आशा, तुला आठवत असेल की स्त्रीभृणहत्याविरोधी कायदा प्रभावीपणे अंमलात यावा म्हणून मुख्यतः तुझ्या सातार्‍यात सामाजिक संघटनांनी “लेक लाडकी अभियान” सारखी अनेक आंदोलनं केली. प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले. छुप्या कारवाया (स्टिंग ऑपरेशन)रत डॉक्टरांना रंगेहा पकडलं. विशिष्ट डॉक्टरवर कारवाई होऊ नये यासाठी बड्या राजकीय नेत्यांचा दबाव असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास प्रशासनाला भाग पाडलं. शेकडो सोनोग्राफी सेंटर्सना नोटिसा बजावल्यानंतर राजरोसपणे चाललेला गर्भलिंगनिदानाचा धंदा बंद झाला.
अभियानाच्या निमित्तानं निर्माण झालेलं वातावरण  टिकवण्यासाठी युवक-युवतींचं जलदगती कृतीदल कार्यरत राहिलं. तू समाजकार्याची पदवी घेतलेली. त्यामुळे तुला माहीतच असेल की या सर्व प्रयत्नांतून आज या भागात मुलींचा जन्मदर वाढला आहे. अशा सातारा जिल्ह्यातली तू. नाव: आशा शिंदे. गाव: औंध. छोट्या शहरातून येत सातारा शहरातल्या समाजकार्य महाविद्यालयात MSW ची पदवी तू मिळवलीस. आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात आपल्या करिअरची सुरुवात केलीस.
माहिती  तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे माणसांचा संवाद, देवाण-घेवाण, नवी माहिती मिळवणं या सगळ्याला आलेला वेग, तरुण पिढीला शैक्षणिक करिअरसाठी उपलब्ध होणारे अधिकाधिक पर्याय याचा थेट परिणाम म्हणून तुझ्यासारखे ग्रामीण भागातले विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांकडे वळताना दिसतात. भारतात आजघडीला सुमारे ३५ कोटी लोकसंख्या वीस वर्षाच्या युवकांची आहे.  त्यात तुझ्यासारखी  ग्रामीण, निमशहरी भागातली मुलं-मुली बहुसंख्येने आहेत. तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करून पुण्यासारख्या शहरात नोकरी-व्यवसायाला सुरूवात करता. आपलं गावातलं आधीचं जगणं मागे टाकत तुम्हाला एका नव्या शहरी जगण्याची सुरूवात करायची असते. कुटुंबाच्या परंपरा, रीतीभाती, गावसमाजाचे काच यांच्यापासून स्वतंत्र, मोकळं असं हे जगणं. आशा, तूही अशीच या मोठ्या अवकाशात आलीस. व्यक्ती म्हणून तुला इथे नवी ओळख मिळाली.
ग्रामीण भागात जन्माला येऊन सर्व प्रतिकूलतेवर मात करत स्व-विकासाची स्वप्न पाहाणार्‍या, उज्ज्वल भविष्याची अशा बाळगणार्‍या लाखो युवतींपैकीच तू एक. आशा शंकर शिंदे. मोठ्या शहरात काम सुरू केल्यावर तू अनुभवलंस एक विस्तारलेलं, खुलं जग. पण त्याच वेळी  तुझ्या बापाचं (आणि कदाचित आईचंही) होतं एक दुसरं जग. स्वतःच निर्माण केलेल्या जात-धर्माच्या, स्त्री-पुरूष भेदाच्या कुंपणात बंदिस्त, खुजं होऊन राहिलेलं. न बदललेलं, बदलाकडे डोळे उघडून बघायचंच नाही आणि जुन्यालाच चिकटून रहायचं असा अट्टाहास बाळगणार्‍यांचं जग. बदल म्हणजे काहीतरी भयंकर आणि आपल्याला उघड्यावर टाकणारी गोष्ट आहे असं वाटणार्‍यांचं. स्वतःचा विकास करून घेण्यासाठी धडपडणारी तुझ्यासारखी तरुण मुलं-मुली आमचं का ऐकत नाहीत अशी सततची तक्रार करणार्‍यांचं. आणि तुम्हा मुला-मुलींनी कुटुंबाच्या, जातसमाजाच्या चौकटीतच राहूनच लग्न केलं पाहिजे असा अट्टाहास धरणार्‍यांच. तुझ्यासारख्या स्त्रियांचं मोकळेपणाने जगणं, आत्मविश्वासाने वावरणं, नवनव्या संधींचा लाभ घेण्यासाठी सक्षम होणं, स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतःच घेणं हे सहन न होणार्‍यांचं. आशा, तुला कल्पना असणारच की या जगातले लोक स्त्रियांना शक्यतो जन्मालाच येऊ देत नाहीत. आणि तरीही जन्मल्याच जर लेकीबाळी; तर त्यांना ते परंपरांशी जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुझ्यासारख्या एखादीने परंपरची पायरी ओलांडायचा प्रयत्न केला की संपवलंच जातं तिला. आता तुझ्याच बापाने तुझ्यासारख्या पंचविशीतल्या, शिकल्या-सवरलेल्या जाणत्या मुलीला ठार मारून टाकणं हे महाराष्ट्रात अपवादाने घडलं असेल. पण मुलीने स्वतःच्या पसंतीने लग्नासाठी मुलाची निवड करणं या दुसर्‍या जगात मानलं जात नाही. आणि मुलीची पसंती जातीबाहेरच्या मुलासाठी असेल; तर कुंटुंबाची प्रतिष्ठाच पणाला लागली असं मानलं जातं. स्वतःच्या पसंतीने लग्न करण्याचा, जातीबाहेरची मुलगी निवडण्याचा अधिकार मुलग्यांनाही नसतोच. पण मुलींनी तसं करणं हे अधिक झोंबणारं.
जगभरात स्त्रियांना दिलं जाणारं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांचं कौटुंबिक, सामाजिक स्थान याची पाहाणी करून लिंगभाव विषमतेबाबतचा वार्षिक अहवाल युनोकडून प्रसिद्ध केला जातो. २०११ च्या या अहवालात लिंगभाव विषमतेबाबत १४६ देशांमध्ये भारताचा १२९ व्या क्रमांकावर आहे. या अहवालात नमूद केल्यानुसार आपले शेजारी देश आपल्या पुढे आहेत. म्हणजेच तिथे लिंगभाव विषमता आपल्या देशाच्या तुलनेत कमी आहे.(नेपाळ ११३ श्रीलंका ७४ पाकिस्तान ११५, बांग्ला देस ११२, चीन ३५, )

महाराष्ट्रातल्या छोट्या गावा-शहरांतून आलेले कित्येक तरूण-तरूणी आज पुण्यात स्थायिक होताहेत. त्यांच्यापैकी काही मित्र-मैत्रिणींकडे हा विषय काढला. तेव्हा त्यांनी जे अनुभव सांगितले; ते व्यथित करणारे, चीड आणणारे आणि आपल्या समाजाच्या भवितव्याविषयी काळजी वाटायला लावणारे आहेत. हे सारेजण उच्चशिक्षित. डॉक्टर वा इंजिनिअर. किंवा आय टी क्षेत्रात काम करणारे. नवरा-बायको दोघेही बरोबरीने भरपूर कमावणारे. नोकरीमुळे जास्त काळ घराबाहेर राहाणं आणि कामाचा ताण यामुळे बाहेरचं खाणं, घरात कामाला नोकर, सुटीच्या दिवशी मौजमजा हीच जगण्याची शैली. मात्र ती त्यांच्या गावाकडच्या कुटुंबियांना, विशेषतः पालकांना मुळीच पसंत नसलेली. कामावरून रात्री नऊला परतणार्‍या सहा आकडी पगार मिळवणार्‍या मुलीने वा सुनेने घरी स्वयंपाक करावा, रीती पाळाव्यात ही अपेक्षा. कुटुंबियांचं एक ठीक. पण खुद्द या तरूण, नवविवाहीत पोरांनाही आपली बायको नवर्‍याच्या आणि कुटुंबियांच्या कलाने घेणारीच हवी. एकजण तर म्हणाला, “आम्ही आमच्या पत्नी, बहिणींना स्वातंत्र्य देतोय पण त्यांनी पायरी सांभाळून वागावं.”    

जाती, धर्म, त्यातून आलेल्या कुटंबाच्या चालीरीती, जात आणि गावसमाजाच्या चौकटी, आई-बापांची मतं, नवर्‍याचे आग्रह.......पायर्‍या तरी किती? अशा, अगं जग बदलंलय असं सारखं म्हणतो आहोत आपण. कॉलेजात शिकताना, पुण्यात नोकरी करताना, जाणीवा व्यापक होताना, जातीबाहेरच्या मित्राबरोबर संसाराची स्वप्नं रंगवताना त्या बदलेल्या जगाच्या सुखद झुळुका स्पर्शून गेल्या असतील तुला कुठे कुठे. पण तुझा बाप शंकर शिंदे आणि बायांनी पायरी सांभाळून दिलेलं स्वातंत्र्य उपभोगावं असं ठामपणे मानणारा तो युवक यांच्या संकुचित जगाने तुझे सर्व हक्क नाकारले, जगायच्या हक्कासकट. स्त्रीस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य, भारतीय घटनेने दिलेले अधिकार, इथल्या मातीतल्या जातीअंताच्या चळवळी यातलं काहीच तुझ्या बापाला तुझी हत्या करण्यापासून रोखू शकलं नाही. ती सारी मूल्यं, ते विचार जणू निरर्थक ठरलेत. तुला नाही आम्ही वाचवू शकलो आशा. पण तुझ्यासारख्या स्वातंत्र्यसन्मुख अशा आमच्या कितीतरी लेकीबाळी आहेत. त्यांच्यासाठी एक आश्वस्त जग निर्माण करणं शक्य होईल का आम्हाला? या प्रश्नाचं ठाम उत्तर नाही देऊ शकत या घडीला. तेव्हा इतकंच सांगते -  आशा, जमलं तर तू माफ कर आम्हाला!

14 August, 2012

देश म्हणजे देशातले लोक

 माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे” हे वाक्य शालेय पाठ्यपुस्तकातल्या पहिल्या पानावरच्या प्रतिज्ञेतलं. शाळेत असताना ही प्रतिज्ञा म्हणजे आपल्यासाठी फक्त पाठ करायची गोष्ट असते. पुढे मोठं होताना आपल्याला या प्रतिज्ञेचा अर्थ उलगडत जातो. आपली समजूत व्यापक होत जाताना विविधतेने नटलेल्या परंपरांसह टिकून राहिलेली आपल्या देशातली लोकशाही ही खरोखरच अभिमान बाळगण्याची गोष्ट होऊन जाते.
भारत-चीन बॉर्डर
आपलं व्यक्तिगत जगणं धर्म, धार्मिक रूढी, कर्मकांड, धर्मप्रभावातून तयार झालेले नीती-नियम, संकेत यांच्या प्रभावाखाली असतं. पण व्यक्तिगत जगण्यापलीकडे एक सामूहिक जीवनही असतं. संस्कृती उत्क्रांत होताना सामूहिक जगणं नियंत्रित करणारी एक रचना निर्माण होत गेली. यातूनच देश, राज्यघटना, कायदे, सरकारं, निवडणुका वगैरे व्यवस्था तयार झाल्या. व्यक्ती एकाच वेळी स्त्री अथवा पुरूष असते, विशिष्ट जातीची-धर्माची, विशिष्ट भाषा बोलणारी असते, कुटुंबाच्या परंपरा सांभाळणारी वा परंपरांची चौकट मोडणारी असू शकते. पण याच व्यक्तीने भारतीय नागरिक म्हणून  सामाजिक जीवन जगताना आपल्या संविधानाच्या मर्यादेत राहावं अशी अपेक्षा असते. खाजगी जगण्यात धर्म-रूढी-संकेत यांचं  वर्चस्व; तर संविधानात समता, सर्वधर्मसमभाव या आधुनिक मूल्यांचा  स्वीकार. सहाजिकच भारतीय समाजात  गोंधळ झाला, संघर्षही झाला. पण भारतीयांनी नवी मूल्यव्यवस्था स्वीकारली, जगण्यात उतरवली. अगदी शंभर टक्के नाही; पण आपल्याकडे सार्वजनिक जगण्यात बव्हंशी सर्वसमावेशकता आणि शांतता आहे. काश्मीर, नागा, मिझो, शीख अशा फुटीरतावादी चळवळी झाल्या, नक्षलवाद-माओवादाचा धोका वाढत चालला आहे. प्रादेशिक, भाषिक आणि जातीय अस्मिता धुमसत असतात. अण्णा, रामदेवबाबा अशांच्या चळवळींनी आपल्या संसदीय लोकशाहीलाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला, सुरू आहे. तरीही स्वतंत्र भारत अभंग राहिला आहे. समस्यांचं ओझं वाहातानाही कायम प्रगतीपथावर राहिला आहे. 
भारत स्वतंत्र झाला त्यावेळच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जगण्यात आता केवढे तरी बदल झाले आहेत.  सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक अशा सगळ्याच क्षेत्रांत बदलांचे चढ-उतार आपण अनुभवले आहेत. जातींमधल्या, कुटुंबांमधल्या उतरंडीला धक्का बसणं आणि वर्ण-लिंगवर्चस्ववाद झुगारला जाणं यामुळे खाजगी आणि सार्वजनिक नातेसंबंधांचा पोत पुरता बदलला आहे. जागतिकीकरणामुळे मोठी घुसळण होऊन भारत अख्ख्या जगाच्या नजरेत आला आहे. नवीन प्रश्न तयार होत आहेतच. त्यांची उत्तरं आपल्यापाशी या घडीला नसतीलसुद्धा. पण ती शोधावी लागतील. आणखी गोंधळ, संघर्ष आणि घुसळण होईल.  पण बदलांना सामोरं जात ते पचवून पुढे जाण्याचं बळ आपल्या लोकांमध्ये आहे.
१९७०ध्ये विनोबा भावे यांचा अमृत महोत्‍सव साजरा झाला होता. त्यावेळच्या भाषणात विनोबांनी म्हटलं होतं, पुढील काळात महानेता येतांना मला दिसत नाही. नेहरु हा शेवटचा होता. आता तुम्‍ही छोट्या छोट्या दिव्‍यांसाठी तयार रहा. तेच खरं गण-सेवकत्‍व. लोकशाहीत असंच व्‍हायला हवं” आणि खरोखरच असे उजळणारे दिवे आहेतच आपल्याकडे. पुरुषी वर्चस्वाखाली असणार्‍या अनेक अनेक क्षेत्रांत स्त्रिया स्वतःचा ठसा उमटवू लागल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या कारभाराचे प्राधान्यक्रम निवडून आलेल्या स्त्री सदस्यांच्या मतांवर ठरत आहेत. समाजात तळाशी राहिलेल्या वर्गाने वरच्या दिशेने झेप घ्यायला सुरुवात केली आहे. मालेगावसारख्या धार्मिक तेढीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या शहरातल्या घराचा उंबरठादेखील न ओलांडलेल्या मुस्लीम स्त्रिया आपापल्या वस्तीबाहेर पडून स्त्रियांमध्ये जाणीवजागृती करण्याचं काम करू शकताहेत.  
प्रथम ही प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारी संस्था २००५ पासून दर वर्षी असर” (ASER- Annual status  Education Report) हा ग्रामीण भारतातल्या शैक्षणिक वास्तवाच्या नोंदीचा वार्षिक अहवाल प्रसिध्द करते.  भारतातल्या शैक्षणिक परिस्थितीचा राज्यवार तपशील यात मिळतो.  २००५ पासून यातल्या प्रत्येक अहवालामध्ये एक गोष्ट अधोरेखित झाली आहे.  शिकण्याबद्दलची ऊर्मी भारतीय समाजात, विशेषतः ग्रामीण गरीब कुटुंबांमध्ये वाढत चालली आहे.  गावातून तालुक्याकडे, जिल्ह्याकडेबर्‍या शाळेतून अधिक बर्‍या शाळेकडे,  छोट्या शाळेतून मोठ्या शाळेकडे, सरकारी शाळेतून खाजगी शाळेकडे विद्यार्थ्याचा ओघ चालला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे शिक्षणाचं महत्त्व, शिक्षण आणि विकास यांचा परस्परसंबध विविध मार्गांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचत आहे. सरकारच्या अनेक योजना त्यांच्या अंमलबजावणीतले अडथळे गृहीत धरले तरीही लोकांपर्यंत पोहचताहेत. बदलणार्‍या जगात सर्वसामान्य तरुण-तरुणींना शिक्षणाच्या आणि स्वविकासाच्या संधीचा लाभ मिळण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
अकाशवाणी गंगटोक, सिक्कीम : झेंडावंदन
गडचिरोली या मागास समजल्या जाणार्‍या आदिवासी जिल्ह्यातल्या मेंढालेखा नावाच्या गावाने अभिनव सामूहिक निर्णयप्रकिया घडवल्या आहेत. सततचा संवाद आणि चर्चा हा त्या प्रक्रियांचा गाभा आहे. भारताने स्वीकारलेल्या संसदीय लोकशाहीतल्या उणीवांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न मेंढावासीयांनी चालवले आहेत.
दारिद्र्य, सामाजिक विषमता या समस्यांना आपण अजूनही हटवू शकलेलो नाही. सत्ताधारी मंडळींचे हितसंबंध सर्वसामान्यांच्या विकासाच्या आड येतात. सरकारी धोरणांची दिशा काय असावी याबद्दल अपल्याकडे सतत उलट-सुलट मतप्रदर्शन सुरू असतं.  भारतीय राज्यघटना सांगते की देश म्हणजे देशातले लोक! हे जर आपण मानत असू तर फक्त सरकारकडे कसं बोट दाखवणार? आपण निवडून दिलेलं मुंबई-दिल्लीतलं प्रातिनिधिक सरकार कायदे करतं, धोरणं-योजना  आखतं. या कायद्या-योजनांची अंमलबजावणी कोणी करायची? सरकार तर आपलंच आहे. तेव्हा जबाबदारी आपल्याकडेही येते. निवडणुकीत मतदान करत आपल्याला पसंत नसलेलं सरकार बदलण्याचा अधिकार बजावून आपण सुजाण नागरिक असल्याचं अनेकदा सिद्ध केलं आहे.
दर पाच वर्षांनी मतदान करण्याहून कितीतरी अधिक जाणतेपणाची अपेक्षा आता आपल्याकडून आहे. स्वतःच्या जीवनावर, भोवतालावर स्वतःचंच नियंत्रण रहावं म्हणून दक्ष राहाणं, आपसातले मतभेद, विषमता, समस्या यापलीकडे जाऊन व्यापक हिताचा विचार करणं आणि राजकीय पक्ष आणि पुढार्‍यांना सर्वांच्या हिताचं राजकारण करायला भाग पाडणं हा नागरिक म्हणून शहाणं होण्याचा मार्ग आहे.   
राजकारण्यांची एकमेकांवर कुरघोडी, निवडणूक प्रचाराची रणधुमाळी, खून-मारामार्‍या, गैरव्यवहार-भ्रष्टाचार-घोटाळे यांचे खटले, कडव्या धर्मवाद्यांचे फतवे-आदेश अशा वृत्तपत्रातल्या बातम्या वाचताना वा एखाद्या वृत्तवाहिनीच्या बातम्या ऎकता-पाहाताना भारतात अराजकाचीच स्थिती आहे असं कुणाला वाटू शकतं. पण हे सारं म्हणजे भारत नव्हे. 
खरा भारत म्हणजे भारतातले सामान्य लोक; जे अनेक धाग्यांनी एकमेकांशी बांधलेले असतात. घटनेने दिलेलं देशात कुठेही  राहाण्याचं, येण्या-जाण्याचं, नोकरी-व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य उपभोगत असतात. अलीकडच्या काळात खाजगी क्षेत्राची झालेली वाढ आणि माहिती-तंत्रज्ञानाचा झपाटा यामुळे भारतीयांचे परस्परांशी आणि जगाशी असलेले बंध बळकट झाले आहेत. कोकणात बिहारचा मजूर, कर्नाटकात उत्तरप्रदेशातले न्हावी, आसामचे डॉक्टर्स मुंबईत अशी सरमिसळ वाढते आहे.  वडापाव, इडली सांबार, खमणढोकळा, भेपुरी, पिझ्झा-बर्गर वगैरे अणि बंगाली साड्या, पंजाबी ड्रेस, जीन्स इत्यादि सर्व आपल्याकडे सुखाने नांदत आहे.
“व्ह्याय धिस व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी डी” हे अलिकडचं प्रचंड लोकप्रिय झालेलं इंग्लीशमिश्रीत तमीळ गाणं. हे गाणं चांगलं की वाईट याची चर्चा बाजुला ठेवू. पण या गाण्याची अन्य भारतीय भाषांमध्ये - मराठीतल्या “तांबडा रस्सा पांढरा रस्सा कोल्हापुरी कोल्हापुरी ग” पासून पंजाबीतल्या “इक कुडी पिंकी मोगेवाली कलोल कर दी”  पर्यंत ज्या वेगाने रूपांतरं झाली; तो वेग भारतीयांच्या एकात्मतेचं आगळं-वेगळं दर्शन घडवणारा आणि म्हणूनच आश्वस्त करणारा आहे. ऑलिंपिकमधली पदकं सार्‍या देशाने आनंदाने मिरवली. कारण सुशीलकुमार वा मेरी कोम हे कुणा एका राज्याचे नव्हते, सार्‍या देशाचे होते. मेरी कोमचं स्वागत जल्लोशात करणार्‍या आणि आपापल्या भाषेत ‘कोलावेरी’ गाणार्‍या भारतीयांच्या देशाला फारसा धोका संभवत नाही असं दिसतं. 
(दिव्य मराठीसाठी २६ जाने १२ रोजी लिहिलेला लेख)



  

29 July, 2012

आणि त्याने बाप दाखवला !


एक बड़ा राजकीय पुढारी, त्याचे एका तरूणीशी जुळलेले बिनलग्नाचे संबंध, त्यातून जन्मलेल्या मुलाने मोठे झाल्यावर पित्यापाशी नात्याचा अधिकार मागणे, पित्याने तो नाकारणे, अखेरीस बाप-मुलात संघर्ष होऊन मुलाचा विजय होणे - ही एखाद्या चित्रपटाची कहाणी शोभावी! पण ही खरीखुरी घटना आहे. गेल्या आठवड्यातल्या या बातमीने आपले जरा जास्तच लक्ष वेधून घेतले.

श्री नारायण दत्त तिवारी (वय ८६) यांच्यावर पितृत्वासंबंधात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल गेल्या शुक्रवारी लागला. तिवारी यांच्या DNA (deoxyribonucleic acid) चाचणीचा अहवाल दिल्ली उच्च न्यायालयाने जाहीर केला. त्यानुसार रोहित या युवकाचे तिवारी हे जैविक पिता असल्याचे उघड झाले. रोहितने हा दावा न्यायालयात २००८मध्ये दाखल केला होता. अनेक कारणांसाठी हा निकाल लक्षवेधी ठरतो. सर्वात पहिले कारण तिवारींचे राजकीय वजन. नारायण दत्त तिवारी हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते. एके काळचे पंतप्राधानपदाचे आकांक्षी, केंद्रात परराष्ट्रमंत्रीपद, उत्तरप्रदेशचे तीनदा, उत्तराखंडचे एकदा मुख्यमंत्रीपद आणि आंध्र प्रदेशचे राज्यपालपद भूषवलेले! अशा तालेवार व्यक्तीला न्यायालयात खेचणारा रोहित तसा सामान्य माणूस. पण त्याने निर्भयपणे, चिवटपणे न्यायालयीन लढा दिला आणि तिवारींना उघडे पाडले.

या प्रकरणाचा तपशील असा – तिवारी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांचे कॉंग्रेसचेच एक मंत्री शेरसिंग यांची कन्या उज्ज्वला हिच्याशी संबंध जुळले. या संबंधातून रोहितचा जन्म झाला. पुढे अनेक वर्षे तिवारींनी उज्ज्वलाच्या घरी जाणे-येणे, लहानग्या रोहितचे वाढदिवस एकत्र साजरे करणे यातून हे संबंध सांभाळले. कालांतराने संबंध कमी होत गेले. रोहितला समज आल्यावर त्याने आपल्या आईला तिवारींशी असलेल्या नात्याची विचारणा केली. तिने ते त्याचे वडील असल्याचे मोकळेपणे सांगितले. हे कळल्यावर रोहित याने तिवारींच्या घरी जाऊन नात्याचा अधिकार प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले. रोहितला सत्य कळले आहे; हे लक्षात येताच तिवारींनी त्याला झिडकारायला सुरूवात केली. तेव्हा तो १६ वर्षांचा होता. (आता तो ३२ वर्षांचा आहे) आपल्या बापापाशी जाण्याच्या प्रत्येक प्रयत्नात त्याच्या वाट्याला अपमान, तिरस्कार आला.

निरुपायाने त्याने तिवारी यांच्या पितृत्वासंबंधात याचिका दाखल केली. २०१० साली दिल्ली उच्च न्यायालयाने तिवारी यांना नोटिस बजावली. तिवारी सत्य नाकारतच होते. पुढे न्यायालयाने DNA चाचणीचा आदेश दिला. या चाचणीतून माणसाच्या जैविक वैशिष्ट्यांचा आराखडा उपलब्ध होतो. माणसाच्या शरीराच्या पेशीत हा DNA असतो. गर्भधारणा होते; तेव्हा गर्भाच्या पेशीत माता आणि पिता यांच्या DNAचा प्रत्येकी निम्मा हिस्सा येत असतो. त्यामुळेच या चाचणीद्वारे जैविक मातृत्व-पितृत्व सिद्ध करणे शक्य होते.

तिवारी यांनी प्रथम न्यायालयाने दिलेला DNA चाचणीचा आदेश धुडकावण्याचा प्रयत्न केला. याचिकेतून सुटका करून घेण्यासाठी स्वतःचे राजकीय वज़न खर्ची घातले. रोहित आणि त्याची आई उज्ज्वला यांनाही थांबवण्याचा प्रयत्न साम-दंड-भेद वापरून केला. पण रोहित हटला नाही. आईची साथ होतीच. अखेरीस न्यायालयाने DNA चाचणी जबदरस्तीने करण्यात येईल असे फर्मान काढल्याने तिवारींचा नाईलाज झाला. या चाचणीच्या निष्कर्षाची खात्री असल्यानेच भीतीपोटी तिवारींनी तो गुप्त ठेवला जावा अशी गळ सर्वोच्च न्यायालयाला घातली. ही मागणीही फेटाळली गेली. अखेरीस DNA चाचणीतून तिवारी रोहितचे बाप असल्याचे सिद्ध झाले आणि ते न्यायालयाने जाहीरच करून टाकले.

हे जाहीर झाल्यावर रोहित याने पत्रकारांना सांगितले; की त्याला न्याय मिळाला आहे. अनेक वर्षे त्याने सोसलेल्या अपमानाची, उपेक्षेची थोडी तरी भरपाई यामुळे होईल. रोहितने आपल्या आईचे, ती या प्रकरणात जाहीरपणे भूमिका घेऊन उभी राहिल्याबद्दल कौतुकही केले. रोहितची आई उज्ज्वला यांनी सांगितले की जे सत्य होते; ते न्यायालयात सिद्ध झाल्याने आम्हाला सर्व काही मिळाले. तिवारी यांनी एक पत्रक काढून जाहीर केले; की ही त्यांची खाजगी बाब असून काही हितशत्रूंनी त्यांची बदनामी करण्यासाठी हे सर्व कारस्थान रचले.

राजकारणातून येणार्‍या सत्तेचा वापर, नातेसंबंध निभावण्याबाबतचा स्त्री-पुरुषांचा दृष्टिकोन, बाप नसलेल्या मुलाची, पुरुषाशी लग्नाबाहेरचे संबंध ठेवणार्‍या स्त्रीची समाजातली पत, कायदे, वैद्यकशास्त्र, प्रसारमाध्यमे अशा अनेक अनेक बाजूंनी या प्रकरणाकडे पाहाता येते. 

या प्रकरणात तसे नवे काहीच नाही. सतेचा वापर करून पुरूषांनी स्त्रियांना वश करून घेणे पूर्वापार चालत आले आहे. विवाहित पुरूषांनी दुसरा घरोबा करणे, अनेक लग्ने करणे किंवा लग्न न करताच लग्न केल्याप्रमाणे राहाणे हेही चालत आले आहेच. असे करणार्‍या राजकारण, उद्योग, साहित्य, कलाक्षेत्रात नावाजलेल्या अनेक व्यक्ती आपल्याला माहीत असतात. प्रकरण सार्वजनिक होते; तेव्हा चर्चा सुरू होते. अशा प्रकरणाची चर्चा करताना चांगले-वाईट, नैतिक-अनैतिक यात जाण्यात अर्थ नसतो. कारण या भूमिका व्यक्तीसापेक्ष असतात. मात्र व्यापक सामाजिक संदर्भात हे प्रकरण पाहिले पाहिजे.

बड़ा नेता असूनही तिवारींना न्यायालयाचे आदेश पाळावे लागले. कायद्यापुढे सर्व समान या तत्त्वावरचा विश्वास यामुळे पक्का झाला. सामान्य लोकांसाठी हे दिलासादायक आहे. तिवारींसारखे व्यवहार करणार्‍यांना यामुळे जरब बसली; तर ती आणखी मोठी गोष्ट ठरेल. अन्यथा आज सत्ताबळाने माजलेल्यांना वठणीवर कोण आणि कसे आणणार?

तिवारींच्या बरोबरीने रोहितची आई उज्ज्वला हीसुद्धा या नातेसंबंधांना जबाबदार होतीच. स्री-पुरूष या दोघांच्याही इच्छेने जेव्हा संबंध प्रस्थापित होतात; तेव्हा दोघांपेकी एकाला झुकते माप देण्याची गरज नसते. परंतु असे सबंध जेव्हा बिघडतात, तुटतात; तेव्हा पुरूष पटकन नामानिराळा होतो. त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेवर ओरखडाही उमटत नाही. आणि संबंधित स्त्रीला मात्र गुन्हेगार ठरवले जाते. बर्‍याच प्रकरणांत, अगदी लग्नाच्या संबंधांमध्येही दिसते की अपत्याची जबाबदारी पुरूष सहजच झटकून टाकतो. आणि स्त्री मात्र तिचे आईपण सर्व प्रतिकूलतेवर मात करत निभावून नेते. उज्ज्वलाने सामाजिक प्रतिष्ठेची तमा न बाळगता जाहीर भूमिका घेणे, उघडपणे रोहितला साथ देणे हे धाडसाचेच म्हणावे लागेल.

एकट्या पुरूषाला समाज विनासायास सामावून घेतो. एकट्या स्त्रीला स्वीकारले जात नाही. त्यातही एकट्या स्त्रीच्या पदरी अपत्य असेल; तर तिच्या अवहेलनेत आणखीच भर पडते. अनाथाश्रमातील मुलांविषयी वात्सल्याचे पान्हे फुटणार्‍या समाजाला मुलांच्या अनाथपणाच्या मूळ कारणांशी जायला नको असते. तिवारी प्रकरणाच्या बातम्यांमध्ये औरस-अनौरस हे शब्द सतत वापरले गेले. रोहित अनौरस कसा? कोणतेही मूल अनौरस असूच शकत नाही. कारण त्याला आई-बाप असतातच. त्याच्या आई-बापाच्या आपसातल्या कायदेशीर संबंधांवरून त्याचे सामाजिक स्थान ठरत असते.  रोहितला आई-बाप दोघेही होतेच. बापाने ते नाते झिडकारल्याने रोहितल्या न्यायालयाची मदत घ्यावी लागली इतकेच.

काळ बदलतो, समाज बदलतो; तसा कायदाही बदलाला कवेत घेत असतो. आता कायद्याने लग्नाच्या बंधनाशिवाय असलेल्या live in relationship चीही नोंद घेतली आहे. अशा नात्यांतून जन्माला येणारी मुले, अशा नात्यांत स्त्रीवर होणारे अत्याचार यांचीही दखल बदलेला कायदा घेतो. पुरूषाचे एका वा अधिक स्त्रियांशी विवाहातून वा विवाहाशिवाय तयार झालेले नातेसंबंध, त्यातून जन्माला येणारी मुले, त्यांची उपेक्षा, पत्नी वा पुढच्या स्त्रियांवर होणारा अन्याय, मालमत्ताविषयक वाद, खटले इ वर्षानुवर्षे चालत आले आहे. मात्र आता प्रगत वैद्यकशास्त्रामुळे ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ ही वेळ खरोखरच आली आहे.

जुन्या मराठी चित्रपटांपासून आताच्या ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’ पर्यंत सत्ताधुंद पुरूषांच्या स्त्रियांशी असलेल्या संबंधांचे चित्रण आहे. आजच्या वासेपुरी गॅंग्जच्या तुलनेत पूर्वीच्या मराठी चित्रपटातले प्रसंग भलतेच साधेसभ्य वाटावेत असे. याचाच अर्थ सत्ता भोगण्याचे नवनवे आणि अश्लाघ्य मार्ग सत्ताधारी (सर्वच क्षेत्रातले) अवलंबताहेत असे दिसते. स्त्री-पुरुष संबंधही गुंतागुंतीचे होत चाललेत. तिवारी प्रकरणाचा पिच्छा मिडियाने पुरवला नसता; तर त्याचा असा वेध घेता आला नसता. प्रकरण ‘गॉसिप’ म्हणून चघळण्यापेक्षा त्यातील गुंतागुंत उलगडून दाखवण्याची प्रसारमाध्यमांची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे; हेही या तिवारी-प्रकरणाने पुन्हा जाणवले. 

18 July, 2012

जिम पोरी जिम


आज जिममध्ये माझ्या प्रशिक्षकाने मला नवे व्यायाम शिकवले. खूप मजा आली. लहान मुलाला एखादं नवं खेळणं मिळाल्यावर वाटत असेल; अगदी तसंच वाटलं. व्यायाम पूर्ण करून घरी परतताना रोजच्यापेक्षा जास्त उत्साह आणि आनंद वाटला.

मी जिममध्ये जायला सुरूवात केली; त्याला दोन वर्ष पूर्ण होतील. यापैकी एकूण पाऊण वर्ष विविध कारणांमुळे जिमला जाणं होऊ शकलं नाही. सुरुवातीचा कंटाळा, कधी घरातल्या अडचणी, माझे मुंबईबाहेरचे दौरे आणि माझ्या दोन शस्त्रक्रिया. खरं तर जिम घरापासून अवघ्या चार मिनिटांवर आहे. त्यामुळे दांडी मारायला तितकंच सबळ कारण लागतं! सहजी बुडवता येत नाही.

घरातल्या आणि बाहेरच्या कामांसाठी (पोटासाठी) करावी लागणारी ऊठबस सोडल्यास मी शरीराला फार तोशीस कधी दिली नव्हती. मुळात पिंड बैठेपणाकडे झुकणारा. (आता पिंडही बदलला!) घरात वाचनाचा वारसा होता. व्यायामाचा नव्हता. पण नोकरी सोडताना (जून २००९) आता स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं असा एक संकल्प केला होता. पण म्हणून लगेच जिम सुरू करायची तत्परता दाखवली असं झालं नाही. नोकरी सोडल्याने रोजचं रेल्वेने जाणं-येणं बंद झालं. त्या प्रवासाचा ताण एकदम संपला. सहाजिकच सकाळी सावकाशीने उठणं, चहापान, वृत्तपत्र वाचन असं सुरू केलं. ‘संपर्क’च्या काही कामांची जबाबदारी, त्यासाठीचे दौरे इ सुरू होतंच. पण ऑफिसची रोजची धावधाव नव्हती. त्यामुळे शरीर आळसावायला सुरूवात झाली. सकाळी उठल्या-उठल्याच मला कंटाळवाणं, क्वचित विफल वाटू लागायचं. (त्याला काही खाजगी, कौटुंबिक कारणंही होती. पण ती माझ्या नियंत्रणापलीकडची होती.) दिनक्रम बेशिस्तीचा होऊ लागला. मला त्यावर नियंत्रण आणायचं होतं. तरीही एक वर्ष तसंच गेलं. आळसाची, वाढत चाललेल्या वजनाची चर्चा एकदा नेहाशी करत होते; तेव्हा तिने ‘समोरच आणि इतक्या जवळ’ असलेल्या जिममध्ये नाव घालायचं सुचवलं. आणि तिचं म्हणणं मी ताबडतोब मनावर घेतलं. ती फिटनेसच्या बाबतीत चांगली तत्पर आणि अभ्यासू मुलगी आहे. माझा नोकरीत संघर्ष सुरू असतानाच्या काळात नेहाने कामं करून चार पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात गोरेगावातल्याच दुसर्‍या एका जिममध्ये जाऊन ट्रेनरचं प्रशिक्षण घेत नोकरीही केली होती. तेव्हाच मी जिम कशी असते; ते आतून पाहिलं होतं. त्यावेळी मला ते एक नव्या काळातलं नवश्रीमंतांचं चंगळवादी फॅड वाटलं होतं. तसल्या ठिकाणी मी कधी जाईन, त्या वातावरणाशी माझं कधी जुळेल; असं वाटणंच तेव्हा शक्य नव्हतं.
पण आता “पाहू तर खरं जाऊन...” असं वाटलं. आणि मी चौकशी करायला गेले. फीचा आकडा ऎकून दचकलेच. त्याखेरीज बूट इ विकत घ्यायचा खर्च! पण एखादा महिना जाऊन बघावंच असं वाटलं. एकदाची फी भरली. स्वस्तातले बूट घेतले. सकाळचा वेळ ठरवून घेतला आणि मनाचा हिय्या वगैरे करून जायला सुरूवात केली. (जुलै २०१०)

ट्रेडमिल या यंत्राची घरी थोडी सवय होती. नेहानेच ते हट्टाने विकत घ्यायला लावलं होतं. (पुढे तिच्या लग्नानंतर मी ते तिच्या घरी पाठवलं).

सुरूवातीला वेगळा अनुभव म्हणून जीममध्ये बरंच वाटलं. तिथे येणारी माणसं मला आधी निराळीच वाटली. कारण ती माझ्या नेहमीच्या संपर्कातली, ‘सामाजिकते’तली नव्हती. हळुहळु व्यायामाने बरं वाटायला सुरूवात झाली. मी तिथे काय काय करते, शिकते ते नेहा अधनं-मधनं विचारायची. तिने मला जमिनीवर करण्याचे (यंत्रांशिवायचे) व्यायामप्रकारही नक्की शिकून घे; असं सांगितल्यावर मी तेही सुरू केलं. तरीही मी तिथे एखादं काम उरकल्यासारखंच जात होते.

तीन महिन्यांनंतर नीट शिकण्यासाठी जादा पैसे भरून प्रशिक्षक घ्यायचं ठरवलं. तेव्हापासून हर्षद साखरे हा माझ्या मुलीहूनही लहान वयाचा मुलगा माझा व्यायामशिक्षक आहे. मी त्याला गंमतीत ‘गुरूजी’ म्हणते. माझं वय, कुवत, मूड या सगळ्याचा विचार करून त्याने मला शिकवायला सुरूवात केली. सोप्या व्यायामप्रकारांपासून कठीण, कमी वजनापासून जास्त, एका सेटमध्ये ५ पासून सुरूवात करून २०-२५ पर्यंत  असा व्यायामप्रवास सुरू झाला. मी या शिकण्यात चांगलीच प्रगती केली आहे आणि मी एक चांगली शिष्या आहे असं त्याचं म्हणणं असतं. तो जे सांगतो; ते मी खरोखरच तसंच करण्याचा प्रयत्न करते. कुणीतरी आपल्याला काहीतरी शिकवतंय याची मला मोठी गंमतच वाटते. (आपणच दुसर्‍याला शिकवायचं किंवा आपल्याला काय आहे आता शिकण्यासारखं...? – या अहंकाराची ऎशी की तैशी!)  मी ते शिकणं अगदी एन्जॉय करते. त्याला शंका विचारते, त्याच्याकडून नवी माहिती घेते. त्याचं मी ऎकते.

या सगळ्या काळात व्यायामाचं तंत्र समजलं. श्वास कधी आणि कसा घ्यायचा- सोडायचा, शरीराची योग्य स्थिती, गती इ तपशील, कार्डिओ, वर्क आऊट, ऎरोबिक्स करण्याच्या योग्य पद्धती, स्वतःला कंटाळा येऊ नये म्हणून व्यायामप्रकारात करण्याचे बदल इ तपशील कळला.  याच जिममध्ये योगा, साल्सा, किक बॉक्सिंग, स्पिनिंग इ प्रकारही शिकवले जातात. मी कॉलेजात असताना निंबाळकरांच्या शिबिरात योगासनं शिकले होते आणि ते शिकलेलं विसरूनही गेले होते. मी योगाही सुरू केलं. तिथे माझी प्रशिक्षक सुजाता निकम ही चाळीशीतली शांत स्वभावाची मुलगी. मजा आणखी वाढली. आपल्या शरीराला हात-पाय, मान-खांदे, मांड्या, टाचा इ अवयव आहेत; एवढंच काय...सूर्यनमस्कार घालताना पाठीमध्ये कणा आहे; हे पहिल्यांदाच कळलं जणू. प्राणायाम शिकताना छातीत श्वासनलिका असल्याचंही नव्याने जाणवलं!  सुरुवातीला गुडघे दुमडून पालथं / उपडं बसणं दोन सेकंदही जमत नव्हतं. आता अर्धा तासही आरामात बसते. शरीर आपलंच असतं. त्याला जीव लावला की ते सहकार्य करायला सुरूवात करतं. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं की मात्र ते मख्खपणा करतं, जराही लवचिकपणा दाखवत नाही.  पाय समोर ठेवून एकेका गुडघ्याला डोकं लावताना शरीर जराही वाकत नसे. आता अगदी सहज डोकं गुडघ्यापर्यंत पोचतं. आता एखादा नवा, अवघड व्यायामप्रकार शिकताना शरीर जेव्हा साथ देतं; तेव्हा मी मनोमन त्याचे आभार मानते.  शरीराशी असा संवाद सुरू झाला, आयुष्यात प्रथमच!

पाच-सहा महिन्यांत माझ्या शरीराच्या मोजमापांत काही इंचांचा फरक पडायला सुरूवात झाली. डाएट्ची जोड दिली होती; त्यामुळे वजनही हटायला सुरूवात झाली. (वजनापेक्षा इंच कमी होण्यालाच तिथे जास्त महत्व दिलं जातं) माझा स्पॉन्डिलॉसिस नाहीसाच झाला. High BP साठीचं औषध घेणं मी बंद केलं. त्याची गरजच उरली नाही.

आणखी मोठा लाभ झाला - माझ्या मानसिकतेत खूप फरक पडला. मला दिवसभर प्रसन्न वाटू लागलं. ताणांचा त्रास कमीकमी होणं सुरू झालं. आळस-कंटाळा कुठच्या कुठे पळून गेले. चालायला, शारीरिक श्रम करायला मजा वाटू लागली. तशी संधीच मी शोधू लागले. जवळपासच्या बाजारात, बॅंकेत पूर्वी मी रिक्षाने जात असे; तिथे मी पायी जाऊ लागले. दिवसातून कितीही वेळा बाहेर जायला लागलं तरी त्याचं काहीच वाटेनासं झालं. असं पायी फिरू लागल्याने आसपासच्या परिसराशीही एक नातं जुळायला सुरूवात झाली. सकाळ-संध्याकाळी इमारतीच्या आसपास येणारा पोपटांचा थवासुद्धा याआधी मी नीट पाहिला नव्हता. आमच्या गृहनिर्माण संकुलातील असुविधा, अस्वच्छता डोळ्याला बोचू लागली. अख्ख्या महाराष्ट्राच्या, देशाच्या वा जगाच्या समस्यांबद्दल जागरुक असलेल्या मला आमच्या परिसरातल्या समस्यांची नीटशी ओळखच नव्हती. रहिवाशांनी एकत्र येण्याची निकड वाटू लागली. समविचारी रहिवाशांशी मी हे बोलायला सुरूवात केली. त्यातून ‘शिवधाम संकुल नागरिक मंचा’ची स्थापना झाली. मंचाने सफाईचं, परिसरव्यवस्थापनाचं काम हाती घेतलं, नगरसेवक-महापालिका यंत्रणा यांच्याशी संवाद सुरू केला. माझा यात पुढाकार राहिला. शरीर-मन सक्रीय राहिल्याने हे सारं घडलं. पुस्तक लिखाण, प्रशिक्षणं घेणं इ माझी अन्य कामं या काळात सुरू होतीच.
जिम माझ्यासाठी थोडी महागडीच आहे. डिस्काउंट वगैरे तिथेही असतोच. पण माझ्या फीमधला काही भाग तिथल्या तरूण प्रशिक्षकांना मिळतो; ही समाधानाची बाब. कारण या क्षेत्रात येणारी हर्षदसारखी मुलं-मुली गरीब आणि अल्पशिक्षित घरांमधून आलेली असतात. त्यांना करिअर घडवण्यासाठी शारीरिक कष्ट घेण्याबरोबरच स्वतःचं ज्ञान वाढवणं, अद्ययावत ठेवणं हेही करावं लागतं. आणि ते ही मुलं आनंदाने करत असतात. घरातली पुस्तकं या मुलांना वाचायला द्यायलाही मी सुरुवात केली आहे.

जेव्हा जिमला जाणं शक्य नसतं; तेव्हा मी घरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करते. पण घरी अनेक अडथळे पार करत ते करावं लागतं. कामानिमित्त मुंबईबाहेर असते; तेव्हा बाहेर चालायला तर नक्कीच जाते. अलिकडे मी खुल्ताबादला गेले होते; तेव्हा बाजुच्या डोंगरावर गेले, भरपूर चालले, योगासनं केली आणि शिकवलीसुद्धा. कुडाळला गेले होते; तेव्हा तर दररोज सात-आठ किमी सहजच चालत होते. नुकतीच पावसात कोकणात गेले होते; तेव्हा हलका ट्रेकही केला. गेल्या वर्षी सिक्कीमला गेले असतानाही भरपूर चालणं आणि थोडा बर्फातला ट्रेक करू शकले. मला आता चालण्यातली मजा कळली आहे; हे महत्त्वाचं.

मी जिमला जाते ती सकाळची वेळ स्त्रिया-पुरूषांसाठी सामायिक असते. माझ्या वयाचे (५६) फार कमीजण येतात. त्यावेळी येणार्‍या माझ्या वयाच्या स्त्रिया तर थोड्याच. त्यामुळे तिथल्या तरूण तुर्कांमध्ये आम्ही थोडेजण असलेले “म्हातारे” उठून दिसतो. सुरूवातीला मला अवघडल्यासारखं व्हायचं. पण मग पाहिलं की तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती त्या ठराविक वेळात जास्तीत जास्त चांगला व्यायाम कसा करता येईल ते बघत असते. त्यामुळे अनोळखी स्त्री-पुरुष एकत्र आल्याने येणार्‍या अवघडलेपणाला तिथे मुळीच थारा नसतो. हे तर मला फारच आवडतं. मी अर्ध्या बाह्यांचा, बंद गळ्याचा टॉप आणि पॅंट घालते. तिथे येणार्‍या तरूण कन्या तर बिनबाह्यांचे, मोकळ्या गळ्याचे कपडे, काहीजणी तर वर फक्त स्पोर्ट्स ब्रा घालतात, मुली-पुरूष अर्ध्या पॅंट्स घालतात. पण तिथे कुणी कुणाच्या उघड्या शरीराकडे बघत बसत नाही. सेक्सच्या पलीकडंचं असं मोकळं वातावरण असतं. (कुणाकुणाच्या एकमेकांशी लाइनी असतात. पण त्याचा संबंध या पोषाखाशी नाही.) सगळेजण ताजेतवाने असतात. एकाद्या प्रासंगिक विषयावर (अण्णांचं आंदोलन, आमीरचा कार्यक्रम, राजेश खन्ना इ) मधूनच चर्चा सुरू होते. एखाद्याने दांडी मारली असली तर त्याची विचारपूस असं चालतं. चालू चित्रपटांवर मल्लीनाथी असते. फिटनेस, डाएट यावर भरपूर बोलणं सुरू असतं. माझंही फिटनेस, आरोग्य या विषयावरचं वाचन (पुस्तक आणि इंटरनेट) वाढलं. गांधीजी-विनोबा यांचं याही विषयातलं काम- सांगणं याचं नव्याने मोल वाटू लागलं. वानगीदाखल हे:
विनोबांनी लिहिलंय – ‘प्रभाते करदर्शनम्‍’ पेक्षा ‘प्रभाते मलदर्शनम्‍’ महत्त्वाचं! (किती खरं आहे ना हे!)
महात्मा गांधींनी आहारशास्त्राची सुंदर व्याख्या केली आहे – “ज्या वस्तू नासतात, सडतात, खराब होवू शकतात त्या वस्तू बहुधा आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या वस्तू नासत- सडत नाही, खराब होत नाही त्या वस्तू आरोग्यासाठी बहुधा चांगल्या नसतात.” आज बनविलेली पोळी, भाकरी, भाजी उद्या बुरशी येवून खराब होते; म्हणून पोळी, भाकरी, भाजी खाणं आरोग्यासाठी चांगले. याउलट बिस्किटसारख्या पॅकिंगच्या वस्तू या महिनोन्‍ महिने टिकतात म्हणून त्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. (काय खावं अणि काय खाऊ नये याची याहून सोपी कसोटी आणखी काय असू शकणार?

मी रोज सकाळी ७-७.३० ला घरातून जिमचं सामान (चांगलासा टॉवेल – भरपूर येणारा घाम पुसण्यासाठी, बूट, पाण्याची बाटली – तिथे चांगलं पाणी असतं; ते आपल्या बाटलीत भरून व्यायाम करताना जवळ ठेवायचं. कारण व्यायाम करताना भरपूर तहान लागत असते आणि सतत पाणी प्यावं लागतं.) घेऊन निघते. आत गेल्यावर बूट घालते. मोबाइलसह बाकीचं अनावश्यक सामान बाजुला ठवते. फ्लोअरवर प्रवेश करते. ओळखीचा माहोल. यंत्र आणि माणसं एका  गतीत संचलन करत असतात. तालबद्ध गाण्याचे सूर कानावर पडतात. माझं शरीर नेहमीच्या लयीच्या ओढीने काम सुरू करतं.  तास-सव्वा तास भरपूर व्यायाम करते. अध्यात्मात निर्विचार मनोवस्थेचं वर्णन असतं. केशवसुतांनी वर्णन केल्यानुसार “विसरुनी गेलो अखिला भेदा ऎकत असता दिड दा दिड दा”   (कविता: सतारीचे बोल) अशीच काहीशी अवस्था असते माझी. व्यायाम संपतो. घामाने निथळल्यावर अगदी ‘पवित्र’ वाटतं. ज्या शरीराच्या माध्यमातून आपण सगळी सुखं भोगतो; त्या शरीराचं देणं फेडल्यासारखं वाटतं. छान वाटतं. म्हणूनच दुसर्‍या दिवशी पुन्हा जावंसं वाटतं.