प्रिय आशा,
काही महिन्यांपूर्वी हरयाणामध्ये जातीबाहेर लग्न करणार्या
तरूण जोडप्याला कुटुंबियांनीच गावकर्यांच्या साथीने ठार मारून टाकल्याच्या घटनेने खळबळ झाली होती. अशा घटना, तिथल्या
’खाप” पंचायती यांची चर्चा करताना आपण महाराष्ट्रातले लोक हरियाणा, उत्तर प्रदेश
अशा राज्यांना मागास ठरवून मोकळे होत असतो. पण आपल्या महाराष्ट्रात सगळं ठीक आहे
का? आशा, नुकत्याच घडलेल्या तुझ्या खून प्रकरणाने महाराष्ट्राची वैचारिकता आणि
मानसिकता पुरती खरवडून काढली आहे.
अजन्मा मुलींनी जन्माला यावं यासाठी प्रयत्न करणारा जिल्हा
ही तुझ्या सातार्याची गेल्या दशकभरात ठळक झालेली ओळख. सातार्याचं कौतुक झालं
होतं
२०११ साल संपताना; जेव्हा तिथला मुलींचा जन्मदर २००१ मधल्या ८७८ वरून ८८१ वर आला होता. २००० साली
गर्भलिंगनिदान करून मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करून देणार्या केंद्रांचं
महाराष्ट्रात पेव फुटलं होतं.
गर्भलिंग निदानाचा धंदा तेजीत होता. सातार्यासह
सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि बीड या जिल्ह्यांत परिस्थिती
गंभीर होती. आशा, तुला आठवत असेल की स्त्रीभृणहत्याविरोधी
कायदा प्रभावीपणे अंमलात यावा म्हणून मुख्यतः तुझ्या सातार्यात
सामाजिक संघटनांनी “लेक लाडकी अभियान” सारखी अनेक आंदोलनं केली.
प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले. छुप्या कारवाया (स्टिंग ऑपरेशन) करत डॉक्टरांना रंगेहाथ
पकडलं. विशिष्ट डॉक्टरवर कारवाई होऊ नये यासाठी बड्या राजकीय
नेत्यांचा दबाव असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास प्रशासनाला भाग
पाडलं. शेकडो सोनोग्राफी सेंटर्सना नोटिसा
बजावल्यानंतर राजरोसपणे चाललेला गर्भलिंगनिदानाचा धंदा बंद झाला.
अभियानाच्या निमित्तानं निर्माण झालेलं वातावरण टिकवण्यासाठी युवक-युवतींचं जलदगती
कृतीदल कार्यरत राहिलं. तू समाजकार्याची पदवी
घेतलेली. त्यामुळे तुला माहीतच असेल की या सर्व प्रयत्नांतून आज या
भागात
मुलींचा जन्मदर वाढला आहे. अशा
सातारा जिल्ह्यातली तू. नाव: आशा शिंदे. गाव: औंध. छोट्या शहरातून येत सातारा
शहरातल्या समाजकार्य महाविद्यालयात MSW ची पदवी तू मिळवलीस. आणि
पुण्यासारख्या मोठ्या शहरात आपल्या करिअरची सुरुवात केलीस.
माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे माणसांचा संवाद, देवाण-घेवाण,
नवी माहिती मिळवणं या सगळ्याला
आलेला
वेग, तरुण पिढीला शैक्षणिक करिअरसाठी उपलब्ध होणारे अधिकाधिक पर्याय याचा
थेट परिणाम म्हणून तुझ्यासारखे ग्रामीण भागातले विद्यार्थी
वेगवेगळ्या अभ्यासक्रमांकडे वळताना दिसतात. भारतात आजघडीला
सुमारे ३५ कोटी लोकसंख्या वीस वर्षाच्या युवकांची आहे. त्यात तुझ्यासारखी ग्रामीण, निमशहरी भागातली
मुलं-मुली
बहुसंख्येने आहेत. तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करून पुण्यासारख्या शहरात
नोकरी-व्यवसायाला सुरूवात करता. आपलं गावातलं आधीचं जगणं मागे टाकत तुम्हाला एका
नव्या शहरी जगण्याची सुरूवात करायची असते. कुटुंबाच्या परंपरा, रीतीभाती,
गावसमाजाचे काच यांच्यापासून स्वतंत्र, मोकळं असं हे जगणं. आशा, तूही अशीच या
मोठ्या अवकाशात आलीस. व्यक्ती म्हणून तुला इथे नवी ओळख मिळाली.
ग्रामीण भागात जन्माला येऊन सर्व
प्रतिकूलतेवर मात करत स्व-विकासाची स्वप्न पाहाणार्या, उज्ज्वल भविष्याची अशा
बाळगणार्या लाखो युवतींपैकीच तू एक. आशा शंकर शिंदे. मोठ्या शहरात काम सुरू
केल्यावर तू अनुभवलंस एक विस्तारलेलं, खुलं जग. पण त्याच वेळी तुझ्या बापाचं (आणि कदाचित आईचंही) होतं एक
दुसरं जग. स्वतःच निर्माण केलेल्या जात-धर्माच्या, स्त्री-पुरूष भेदाच्या कुंपणात
बंदिस्त, खुजं होऊन राहिलेलं. न बदललेलं, बदलाकडे डोळे उघडून बघायचंच नाही आणि
जुन्यालाच चिकटून रहायचं असा अट्टाहास बाळगणार्यांचं जग. बदल म्हणजे काहीतरी
भयंकर आणि आपल्याला उघड्यावर टाकणारी गोष्ट आहे असं वाटणार्यांचं. स्वतःचा विकास
करून घेण्यासाठी धडपडणारी तुझ्यासारखी तरुण मुलं-मुली आमचं का ऐकत नाहीत अशी सततची
तक्रार करणार्यांचं. आणि तुम्हा मुला-मुलींनी कुटुंबाच्या, जातसमाजाच्या चौकटीतच
राहूनच लग्न केलं पाहिजे असा अट्टाहास धरणार्यांच. तुझ्यासारख्या स्त्रियांचं
मोकळेपणाने जगणं, आत्मविश्वासाने वावरणं, नवनव्या संधींचा लाभ घेण्यासाठी सक्षम
होणं, स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतःच घेणं हे सहन न होणार्यांचं. आशा, तुला
कल्पना असणारच की या जगातले लोक स्त्रियांना शक्यतो जन्मालाच येऊ देत नाहीत. आणि
तरीही जन्मल्याच जर लेकीबाळी; तर त्यांना ते परंपरांशी जखडून ठेवण्याचा प्रयत्न
करतात. तुझ्यासारख्या एखादीने परंपरची पायरी ओलांडायचा प्रयत्न केला की संपवलंच
जातं तिला. आता तुझ्याच बापाने तुझ्यासारख्या पंचविशीतल्या, शिकल्या-सवरलेल्या
जाणत्या मुलीला ठार मारून टाकणं हे महाराष्ट्रात अपवादाने घडलं असेल. पण मुलीने
स्वतःच्या पसंतीने लग्नासाठी मुलाची निवड करणं या दुसर्या जगात मानलं जात नाही.
आणि मुलीची पसंती जातीबाहेरच्या मुलासाठी असेल; तर कुंटुंबाची प्रतिष्ठाच पणाला
लागली असं मानलं जातं. स्वतःच्या पसंतीने लग्न करण्याचा, जातीबाहेरची मुलगी
निवडण्याचा अधिकार मुलग्यांनाही नसतोच. पण मुलींनी तसं करणं हे अधिक झोंबणारं.
जगभरात स्त्रियांना दिलं जाणारं शिक्षण, त्यांचं आरोग्य,
त्यांचं कौटुंबिक, सामाजिक स्थान याची पाहाणी करून लिंगभाव विषमतेबाबतचा वार्षिक
अहवाल युनोकडून प्रसिद्ध केला जातो. २०११ च्या या अहवालात लिंगभाव विषमतेबाबत १४६
देशांमध्ये भारताचा १२९ व्या क्रमांकावर आहे. या अहवालात नमूद केल्यानुसार आपले शेजारी
देश आपल्या पुढे आहेत. म्हणजेच तिथे लिंगभाव विषमता आपल्या देशाच्या तुलनेत कमी
आहे.(नेपाळ ११३ श्रीलंका ७४ पाकिस्तान ११५, बांग्ला देस ११२, चीन ३५, )
महाराष्ट्रातल्या छोट्या गावा-शहरांतून आलेले कित्येक तरूण-तरूणी आज पुण्यात
स्थायिक होताहेत. त्यांच्यापैकी काही मित्र-मैत्रिणींकडे हा विषय काढला. तेव्हा
त्यांनी जे अनुभव सांगितले; ते व्यथित करणारे, चीड आणणारे आणि आपल्या समाजाच्या
भवितव्याविषयी काळजी वाटायला लावणारे आहेत. हे सारेजण उच्चशिक्षित. डॉक्टर वा
इंजिनिअर. किंवा आय टी क्षेत्रात काम करणारे. नवरा-बायको दोघेही बरोबरीने भरपूर
कमावणारे. नोकरीमुळे जास्त काळ घराबाहेर राहाणं आणि कामाचा ताण यामुळे बाहेरचं
खाणं, घरात कामाला नोकर, सुटीच्या दिवशी मौजमजा हीच जगण्याची शैली. मात्र ती त्यांच्या
गावाकडच्या कुटुंबियांना, विशेषतः पालकांना मुळीच पसंत नसलेली. कामावरून रात्री
नऊला परतणार्या सहा आकडी पगार मिळवणार्या मुलीने वा सुनेने घरी स्वयंपाक करावा,
रीती पाळाव्यात ही अपेक्षा. कुटुंबियांचं एक ठीक. पण खुद्द या तरूण, नवविवाहीत
पोरांनाही आपली बायको नवर्याच्या आणि कुटुंबियांच्या कलाने घेणारीच हवी. एकजण तर
म्हणाला, “आम्ही आमच्या पत्नी, बहिणींना स्वातंत्र्य देतोय पण त्यांनी पायरी
सांभाळून वागावं.”
जाती, धर्म, त्यातून आलेल्या कुटंबाच्या चालीरीती, जात आणि
गावसमाजाच्या चौकटी, आई-बापांची मतं, नवर्याचे आग्रह.......पायर्या तरी किती? अशा,
अगं जग बदलंलय असं सारखं म्हणतो आहोत आपण. कॉलेजात शिकताना, पुण्यात नोकरी करताना,
जाणीवा व्यापक होताना, जातीबाहेरच्या मित्राबरोबर संसाराची स्वप्नं रंगवताना त्या
बदलेल्या जगाच्या सुखद झुळुका स्पर्शून गेल्या असतील तुला कुठे कुठे. पण तुझा बाप
शंकर शिंदे आणि बायांनी पायरी सांभाळून दिलेलं स्वातंत्र्य उपभोगावं असं ठामपणे
मानणारा तो युवक यांच्या संकुचित जगाने तुझे सर्व हक्क नाकारले, जगायच्या
हक्कासकट. स्त्रीस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य, भारतीय घटनेने दिलेले अधिकार,
इथल्या मातीतल्या जातीअंताच्या चळवळी यातलं काहीच तुझ्या बापाला तुझी हत्या
करण्यापासून रोखू शकलं नाही. ती सारी मूल्यं, ते विचार जणू निरर्थक ठरलेत. तुला
नाही आम्ही वाचवू शकलो आशा. पण तुझ्यासारख्या स्वातंत्र्यसन्मुख अशा आमच्या
कितीतरी लेकीबाळी आहेत. त्यांच्यासाठी एक आश्वस्त जग निर्माण करणं शक्य होईल का
आम्हाला? या प्रश्नाचं ठाम उत्तर नाही देऊ शकत या घडीला. तेव्हा इतकंच सांगते
- आशा, जमलं तर तू माफ कर आम्हाला!