05 May, 2014

चिदंबरम,चिवडा आणि ॥जय महाराष्ट्र॥

चिदंबरम,चिवडा आणि ॥जय महाराष्ट्रII

तामीळनाडू राज्यात चिदंबरम नावाचं एक शहर आहे.  माझ्या मुलीच्या अभ्यासप्रकल्पाच्या निमित्ताने या शहरात तीन आठवडे राहण्याची संधी मला मिळाली.  पण म्हणून मी लगेच प्रवासवर्णन लिहायला बसलेले नाही. तिकडचं वास्तव्य, आसपास केलेली भटकंती, स्थानिकांशी केलेल्या गप्पागोष्टी, स्थानिक वृत्तपत्रांचं वाचन आणि स्वतःचं निरीक्षण यातून तमीळ अस्मितेबद्द्ल असंख्य प्रश्नांची गर्दी आणि न्यूनगंडाच्या वळणाने जाणारी अस्वस्थता घेऊन मी परत आले.

या अस्वस्थतेला वाट करुन दिल्याशिवाय इलाज नसल्याने मनातले प्रश्न कागदावर ठेवत आहे.

नेहाचं, माझ्या मुलीचं काम तिथल्या अन्नामलाई युनिव्हर्सिटीत होतं.  चिदंबरम शहरात अन्नामलाईचं दूरशिक्षण केंद्र आहे.  आम्हाला चिदंबरमलाच मुक्काम करुन राहायचं होतं. दक्षिण भारतातल्या तमीळनाडू राज्याशी कन्याकुमारी पाहाण्यापुरताच माझा संबंध आला होता. शिवाय आता टूरिस्ट म्हणून जायचं नव्हतं.  नेहा दिवसाचे बारा-चौदा तास कामात असणार होती आणि मी तिला सोबत करायला जाणार होते.

जायचं ठरल्यावर तिथली माहिती मिळवायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा प्रभावित झाले तमीळनाडूच्या एकाहून एक सुंदर वेबसाइट्स पाहून.  चिदंबरम हे एक खरोखरच योजनापूर्वक भेट देण्याजोगं ठिकाण निघालं. कावेरीच्या एका उपनदीच्या खोर्‍यातलं हे शहर.  नटराज मंदिरासाठी प्रसिध्द असलेलं शिवलिंग तिथे आहे.  यालाच चिदंबरम रहस्य असं म्हणतात आणि या शिवलिंगाचं दर्शन घेतल्याने मोक्षप्राप्तीचा रस्ता लवकर सापडतो अशी भाविकांची श्रध्दा आहे. मोक्षाचं माहीत नाही; पण माझ्यासाठी चिदंबरमला जाणं हे स्वजाणीवेच्या रस्त्याला लागणं मात्र ठरलं आणि हे सगळं अवचित घडल्याने माझ्यासाठी हेच चिदंबरम रहस्य!

चेन्नईच्या दक्षिणेला २४० कि मी अंतरावरचं चिदंबरम.  तिथून दोन-तीन तासांच्या अंतरावर तंजावर, पॉंडेचरी, कुंभकोणम, त्रिची अशी रम्य ठिकाणं.  आम्ही जाणार होतो तो काळ तिथल्या दुसर्‍या मान्सूनचा.  (पहिला मान्सूनः जुलै-ऑगस्ट, दुसराः ऑक्टो-डिसें ) इंटरनेट्वरच्या माहितीखेरीज लाईव्हमाहिती पुरवली मुंबईतल्या माझ्या कार्यालयातल्या तमीळ मैत्रिणीने आणि चेन्नई आकाशवाणीतल्या सहकार्‍याने.   मुंबईतल्या मैत्रिणाने आमच्यासोबत तिचा चेन्नईला जाण्याचा कार्यक्रम ठरवला.  ती आणि चेन्नई आकाशवाणीतला सहकारी या दोघांनी आम्हाला चिदंबरमपर्यत नेऊन पोचवलं.  आधी चेन्नईत मुक्काम आणि मग चिदंबरमपर्यत पाच-सहा तासांचा रस्त्यावरचा प्रवास.  त्यामुळे अस्मितेविषयीच्या आमच्या चर्चा चेन्नईपासूनच सुरु झाल्या.

पुढे चिदंबरममध्ये निर्मला शंकर ही दिल्लीस्थित तमीळ मैत्रीण माझ्याप्रमाणेच तिच्या मुलीच्या सोबतीला आली होती.  तंजावर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये निर्मलाचा माहेर-सासरचा मोठा गोतावळा आहे.     स्थानिक लोकांना भेटण्यातला आणि तमीळ संस्कृतीविषयी जाणून घेण्यातला माझा रस ओळखून तिने माझी त्या मुक्कामात चांगली सोबत केली.  तिच्याबरोबर मी गावांमध्ये गेले, तमिळ कुटुंबांमध्ये मिसळले, चविष्ट पदार्थ मनसोक्त चाखले, भरपूर गप्पा, चर्चा केल्या, देवळं पाहिली, बाजारात फिरले. तमीळ संस्कृतीचा रास्त अभिमान आणि बाहेरच्या जगाबद्दल स्वतःला अद्ययावत ठेवण्याची इच्छा निर्मलाकडे असल्याने आमची गट्टी जमली.

चेन्नई विमानतळाच्या बाहेर आल्यापासून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी तमीळनाडूचं अस्तित्व अंगावर यायला सुरुवात होते.  राजकीय पोस्टर्सवरची भाषा समजली नाही तरी राज्यकर्त्या घराण्यांच्या सदस्यांचे चेहरे सहज ओळखू येतात. चेन्नई आता आय टी हब वगैरे बनलं असलं तरी मुंबईतून नोकरीनिमित्त तिकडे राहायला गेलेल्या तरुण-तरुणींचा अनुभव असा की तमीळ भाषा येत नसल्याने पावलोपावली अडतं.  तसचं अगदी चेन्नई शहरातल्या हॉट्लांमध्ये किंवा कार्यालयांच्या कॅंटीनमध्येही तमीळ खाद्यपदार्थापलीकडे खास काही मिळत नाही.

आपण (फक्त मुंबईने नाही तर अख्ख्या महाराष्ट्राने) किती तत्परतेने इडली-डोसा आपलासा केलाय. आपल्या जिल्हा-तालुक्यात तर चायनीजही पोचलंय, पण तिकडे अगदी पर्यटकांची मर्जी सांभाळण्यासाठीसुध्दा बटाटावडा अथवा पावभाजी नाही.  जशी हिंदी भाषा नाही तसंच हेही नाही.

तमिळनाडूचे दिवंगत नेते अण्णा दुराई यांचं १९६० मधलं एक भाषण सापडलं. हिंदीला राष्ट्रभाषा करणार्‍या केंद्राच्या निर्णयाला विरोध करताना त्यांनी म्हट्लं होतं इंग्लिश हा जगाला जोडणारा म्हणून मोठा दरवाजा.  आणि हिंदी हा छोटा दरवाजा.  मोठा दरवाजा असताना लहान निवडणं अव्यवहार्य आहे.   शिवाय एकदा हिंदी घुसली की तमिळ भाषेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह आणि तमिळनाडूतल्या कोणत्याही भागात तमिळ भाषेविना व्यहार होताच कामा नयेत असं आमचं म्हणणं आहे.   मात्र जगाला जोडून घेण्यासाठी आम्ही इंग्लिश स्वीकारतो आहोत."

मुंबईत (आणि आता पाठोपाठ पुण्यातही) एकही शब्द मराठीतून बोलल्याविना सर्व व्यवहार सुरळीत होऊ शकतात.  या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर अण्णा दुराईच्या भूमिकेतलं द्रष्टेपण नक्कीच जाणवतं.  पुढे डीएमकेने भाषेचं, तमिळ अस्मितेचं राजकारण जरुर केलं.  पण त्यामुळे तमिळ अस्मिता तितकीच तीव्रपणे जपली गेली.  त्यामुळे राज्याने गमावलं काहीच नाही. उलट कमावलं.

आज तमिळनाडूमधला साक्षरता दर, शिक्षण-आरोग्य सुविधा, माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार, रस्त्यांचं जाळं हे सगळं पाहिल्यावर राज्य किती आघाडीवर आहे ते जाणवतं. चिदंबरम हे जेमतेम तीन लाख लोकवस्तीचं तालुक्याचं ठिकाण (जिल्हाः कुड्ड्लोर) तिथल स्त्री-पुरुष प्रमाण ५१:४९ आहे. साक्षरता दर ८० ट्क्क्यांहून अधिक आणि स्त्री साक्षरता दर ७५ ट्क्क्यांहून जास्त.

आपल्याकडेही शिवसेनेने मराठी अस्मितेची गर्जना केली.  राजकारणही केलं.  मात्र आपल्याकडे ना मराठी भाषा आणि संस्कृति जोपसली गेली ना आपण भौतिक प्रगतीत आघाडी गाठली. संस्कृती जपणं, परंपरा सांभाळणं म्हणजे प्रतिगामीपणा वा सुधारणावादाला विरोध किंवा परंपरा आणि  भौतिक प्रगति या जणू एकमेकांच्या विरोधात जाणार्‍या गोष्टी असा संस्कार आपल्याकडच्या सुधारणावादी चळवळींनी आपल्यावर केला म्हणून आपलं असं झालं असावं का? की सर्वसमावेशकपणाची आपली प्रतिमाच आपल्याला अधिक प्रिय वाटते?

सर्वसमावेशक असणं, इतरांना सामावून घेणं, वैचारिक मोकळेपणा हे खंर तर आपले गुण. (का हेही आपलं लंगडं समर्थ किंवा डरपोकपणाचं दुसरं नाव?)  पण आता मराठी संस्कृती उदध्वस्त होता असताना हे गुण नसून आपल्या मर्यादा आहेत, दुबळेपणा आहे, असं वाटू लागतं. तिकडे सगळीकडे फिरताना मी माझी ओळख मुंबईकर अशी करुन देत होते.  मला जाणवलं की लोकांना मुंबईचं कौतुक आहे. पण महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे, त्याचा मुंबई हा भाग आहे हे लोकांना माहीत नाही.  त्याच्याशी त्यांना फार देणं-घेणंही नाही.  मला जाणवलं आपल्याच राज्यात आपण मुंबईकर मराठी, कोकणी मराठी, पुणेकर मराठी, वैदर्भीय मराठी असे मराठीपणाचे तुकडे वागवतो आहोत.  शिवाय वर्‍हाडी, खानदेशी, मराठवाडी हे प्रकार आहेतच.   याला काही भौगोलोक, ऎतिहासिक कारणं नक्कीच आहेत. पण महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी काळातही आपण मराठी म्हणून एकत्र बांधले गेलेलो नाही याची सल मला दूर तमिळनाडूत खूप जाणवली.

तमिळनाडूमधली अतिभव्य सुंदर मंदिरं, तिथली शिल्पकला, स्थापत्यकला, नृत्य, संगीत हे सगळं महाराष्ट्राच्या तुलनेत अतिप्राचीन आणि थोरच! आणखी एक जाणवलं. एरव्ही देवाधर्माशी निगडीत वाटणार्‍या चालीरीती दाक्षिणात्यांच्या रोजच्या जगण्यात मुरल्यात. हीच त्यांची ओळख.

अन्नामलाई विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागात आम्ही काही माहिती मिळवण्यासाठी गेलो होतो.  आतलं दृष्य पाहून मी दरवाजातच  दचकले.  सर्वच्या सर्व स्त्री-पुरुष कर्मचारी कपाळावर गंध लावलेले.  सर्वच्या सर्व स्त्रिया साडी नेसलेल्या, त्यातही सिल्कच्या साड्या.  स्त्रियांनी केसात गरजे माळलेले.  निर्मलाला माझ्या दचकण्याचा अर्थ समजेना.  मी तिला तो उलगडून सांगितला. म्हटलं, आमच्याकडे एखाद्या तहसील कार्यालयातही एखादा सण समारंभ, पूजा, हळदीकुंकू वगैरे असलं तरच असं दॄष्य दिसतं.  तिचं म्हणणं देवपूजा, देवळात जाणं हा आमच्या दिनचर्येचाच भाग आहे.  त्यामुळे हे सगळं सहज केलं जातं.

नायकरस्वामींच्या प्रखर ब्राह्मणविरोधी आंदोलनाची पार्श्वभूमी तामीळनाडूला आहे.  पण ही कर्मकांडं सर्व जातीजमाती निष्ठेने पाळत असल्याने टिकून आहेत.  त्यांना ती टिकवून ठेवायची आहेत. माझ्या तिथल्या मुक्कामात कार्तिक पौर्णिमेचा दीपम्‍ उत्सव तिथे साजरा झाला.   सर्व जाती-धर्मातल्यांची आणि गरीब-श्रीमंतांची घरं त्या दिवशी पणत्यांनी उजळली होती.

अन्नामलाई विद्यापीठाचं भव्यपण आणि काळाबरोबर राहणं पाहून मला महाराष्ट्राचा शैक्षणिक मागासलेपणा टोचायला लागला. आपल्याकडे असं एखादं भव्य विद्यापीठ का नाही निर्माण झालं?
आपल्याकडे महात्मा फुलेंनी काढलेली शाळा, टिळक-आगरकरांच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणसंस्था, महर्षी कर्वेचं महिला विद्यापीठ, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठ्ल रामजी शिंदे यांच्या शैक्षणिक चळवळी हा उज्ज्वल इतिहास.   त्यानंतर एकदम शिक्षणसम्राटांच्या संस्था अथवा एखादं सिंबायोसिस.....

मला तिथे कायम एका प्रश्नाला सामोरं जावं लागलं.   तुमच्या महाराष्ट्रात काय आहे बघण्यासारखं? महाराष्ट्राची ओळख कशात आहे? पुढेपुढे हा प्रश्न मला चुकवावासा वटू लागला. कारण या प्रश्नाला माझ्याकडे नीटसं उत्तर नव्हतं.   तिथलं तमीळ ऎकताना मला आपल्या इंग्रजी-हिंदी अतिक्रमित मराठीची कीव वाटू लागली.  भाषा गेली म्हणजे बाकी सगळं संपलंच की! 

तिथल्या आबालवृध्दांमध्ये रजनीकांतबद्दलचं ममत्व पाहून आपल्याकडे सकस मराठी अभिनेत्यांपेक्षा आपल्याला अमिताभ वा शाहरुखची जास्त क्रेझ असल्याचं मला बोचू लागलं. तमीळ लोकांनी तमीळ भाषा, कला, संस्कृती जगवलेली आणि जोपासलेली पाहताना मला आपल्याकडच्या मराठीच्या पीछेहाटीबद्दल खंत वाटली आणि साहित्यसंमेलनाच्या तोंडावर होणार्‍या मोसमी चर्चा आठवल्या.

तंजावरला तिथल्या मंदिरांचा शिल्पकलेचा, शीलालेखांचा अभ्यास करायला आलेला तमीळ विद्यार्थ्याचा गट भेटला.   मी मराठी आहे हे कळल्यावर त्यांनी शिवाजीराजांबद्दल बोलणं काढ्लं.  ते कसे थोर साहसी द्रष्टे होते, तंजावरपर्यत पोचले होते वगैरे.....मी त्यावेळी मनातल्या मनात महाराजांची माफी मागितली.   शिवरायांनी जे आपल्याला दिलंय, त्यातलं आपण काहीच शिल्लक ठेवलेलं नाही. त्यांच्याच राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या चढ्त्या श्रेणीत होताहेत आणि ते विद्यार्थी महाराष्ट्राला शिवाजीचं राज्य म्हणून ओळखत होते!

केवळ माझा सह्यकडाअसं आवेगाने आणि आवेशाने वसंत बापटांनी कवितेत लिहून ठेवलंय खरं.  पण आता सह्याद्रीबद्दल आपलेपणा नाही आणि हिमालय तर दिल्लीप्रमाणे खूप दूरच आहे असं महाराष्ट्राचं वास्तव मला अस्वस्थ करु लागलं.

त्याहीपेक्षा मला त्रास झाला हे वास्तव आपल्या अंगवळणी पडलंय त्याचा.  म्हणजे मी चिदंबरमला गेले नसते, तमीळ अस्मितेची ओळख याप्रमाणे मला झाली नसती तर मी महाराष्ट्रात निवांतच राहिले असते.  मराठीच्या पीछेहाटीच्या, अस्मिता विझल्याच्या चर्चा वाचल्या असत्या.  सभासंमेलनाला हजेरी लावून टाळ्याही वाजवल्या असत्या.

हे सगळं झाल्यावर आपण पुन्हा इडली सांबार, खमणढोकळा, भेपुरी वगैरे खायला (बनवायलाही) मोकळे.  पुन्हा आपलं बंगाली साड्या, पंजाबी ड्रेस खरेदी करणं आणि रिक्षावाल्याशी हिंदीत बोलणं सुरु. मागे अरुण साधूंनी बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रात मराठीतून बोलण्याचा फतवा काढण्याची विनंती केली होती.  पुढे काहीच झालं नाही.  हे कोणतं राजकारणसमजा शिवसेनेने घेतलं मनावर आणि दिलीच तशी हाक तर आपण मानू का ते? की नव्या अर्थव्यवस्थेत आपल्याला अशी कोणती स्व-ओळख नकोच आहे?
चिंदबरमहून परतले इतक्यात उस्मानाबादच्या पत्रकार मित्राचा फोन आला. तो तिथल्या तेरच्या प्राचीन प्रागतिक संस्कृतीवर फिल्म बनवत असल्याचं सागंत होता.  मी त्याला म्ह्टलं - अरे, या सगळ्याचा नीट अभ्यास कर.  फिल्म बनव. लिही. ही महाराष्ट्राची ओळख आहे.

निरोप घेताना निर्मलाला मी औपचारिकता पाळण्यासाठी महाराष्ट्रात यायचं आमंत्रण दिलं.   महाराष्ट्रात मी तिला पंढरपूरला घेऊन जाईन आणि कर्नाटकुविठ्ठ्लाबरोबरच जेजुरीच्या खंडोबाचं दर्शनही घडवेन.   तिला मराठी जेवण खाऊ घालताना मला हॉटेलांची शोधाशोध करावी लागेल. हे सगळं मी कसं तरी जमवेन.  पण मराठी बोलणारी माणसं दाखवण्यासाठी मला तिला घेऊन बराच प्रवास करावा लागेल.

नाही म्हणायला आपला भाजलेल्या पोह्यांचा चिवडा तिला चिदंबरममध्येच खिलवून मी मराठीपणाचा प्रसार करायला सुरुवात केली आहे. चिवडा खूप चविष्ट वाटल्याचं प्रशस्तिपत्रही तिने मला तिथेच दिलं.   मी तिला लगेच चिवड्याची रेसिपीही लिहून दिली आणि हा लेख लिहिताना तिने मला फोन करुन तिच्या तमीळ घरात मराठी चिवडा बनवल्याचं आणि नवर्‍याला खाऊ घातल्याचंही सांगितलं ॥जय महाराष्ट्र ॥
                                                                         

‘शोधग्राम’ मधलं मोहाचं झाड

शोधग्राममधलं मोहाचं झाड
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात राहुन आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजासाठी करणार्‍या डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग या जोडप्याच्या कार्याचा नुकताच महाराष्ट्रभूषणया पुरस्काराने गौरव करण्यात आला. डॉ. राणी बंग या गडचिरोली जिल्ह्यातल्या  पहिल्या स्त्रीरोगतज्ज्ञ. आदिवासी स्त्रियांकरता समरसून झटणार्‍या या ॠजू, प्रसन्न व्यक्तिमत्वाची ही ओळख.

भय आणि राणी यांना २००३ या वर्षीचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मुंबईहून शोधग्रामला फोन केला. तेव्हा राणीशी बोलताना जाणवलं की तिने हरवून, आनंदून जावं अशी ही घटना नक्कीच नाही. असा एखादा पुरस्कार किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेने वा तज्ज्ञांनी केलेला गौरव यपेक्षा तिला आनंदाचं भरतं यावं अशा घटना निराळ्या असतात. संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरच्या एखाद्या गावातल्या बायांनी स्वतःहून दाई / आरोग्यदूत प्रशिक्षणाचा आग्रह धरणं, एखाद्या दाई / ताईने गावातली बाळंतपणाची अवघड केस यशस्वीपणे हाताळणं, एखाद्या साध्यासुध्या व्यक्तीने संस्थेच्या मदतीसाठी छोट्यात छोटी -अगदी शंभर रुपयांची देणगी  देणं, एखाद्या व्यसनी व्यक्तिला व्यसनमुक्ती कार्यकर्त्याने नीटपणे बाहेर काढणं, राणीला घरकामात मदत करणार्‍या शोभाने लिहायला शिकायचं ठरवणं, शोधग्रामची कार्यकर्ती चेतना हिने तिला शिकवणं आणि या प्रयत्नातून राणीच्या दोन ओळींच्या चिठ्ठीला शोभाने एका ओळीचं उत्तर लिहिणं, राणीला हवं असलेलं एखादं रोप कुणी आणून देणं, तिने घातलेलं रायआवळ्याचं मोहरीच्या तेलातलं  लोणचं झकास जमणं, ते अनेकांना वाटता येणं (मी स्वतः ते गडचिरोली टू रत्नागिरी व्हाया मुंबई घेऊन गेले आहे.) शोधग्राममधल्या मां दंतेश्र्वरी या आदिवासींच्या देवीसाठी फुलांचा मनाजोगता हार माळायला राणीला पुरेसा वेळ मिळणं...... या आणि अशासारख्या कितीतरी गोष्टींसाठी राणी हरखून गेलेली मी अनेकदा पाहिलंय. यावरुन तिच्या श्रीमंत मनाचा, समृध्द व्यक्तिमत्वाचा परिचय व्हावा.

तेलुगु समाजातल्या धनवान अय्यंगार कुटुंबातली ही लाडाची लेक. तिने सेवाग्राम मधल्या गांधीवादी बंग परिवारातली सून होऊन येणं, तिने माहेरघरच्या सगळ्या श्रीमंती थाटाचा सहजपणे त्याग करणं, खादी वापरण्यापासून समाजसेवेपर्यंतची बंग कुटुंबाची सगळी व्रतं आनंदाने स्वीकारणं... हे सारं आख्यायिकेत शोभण्यासारखं.

अभय आणि राणीने डॉक्टरकीच्या पदवीचा उपयोग पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी न करता आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजासाठी करायचं ठरवणं, त्यातही गडचिरोलीसारखं मागासपणाचा शिक्का बसलेलं ठिकाण निवडून काम  करणं - हेही स्वातंत्र्यचळवळीतल्या काळातलं आहे. आपल्या काळातलं आहे. इतकं जवळच की या दोघांनीही नुकती पन्नाशी ओलांडली  आहे.

खरं तर आपल्या परिचयाच्या, सवयीच्या नसलेल्या जीवनशैलीशी जुळवून घेणं महाअवघड! परिस्थितीवश घेतलचं जुळवून तर आपण त्याचा किती बाऊ करतो! तोच आपला मोठेपणा म्हणून मिरवतो! पण राणीने ते सहजपणे स्वीकारलं. त्याचा उल्लेख, उच्चारही नाही. तिने हा खडतरपणाही आपलासा करुन टाकला. डॉक्टरीच्या माध्यमातून रुग्णसेवाही ठीकच. पण गडचिरोली  जिल्हा दारुमुक्ती आंदोलनात तर राणी रस्त्यावर येऊन लढली.

राणीला न्याहाळायच्या, समजून घ्यायच्या, तिच्याशी संवाद करण्याच्या काही खास जागा आहेत. सकाळी तिच्यासोबत शोधग्रामच्या बाहेरच्या जंगलात फिरायला जावं. जंगलातल्या एकेका झाडाची माहिती तिच्या मुखातून ऎकावी. त्या त्या झाडाचं वनस्पतीशास्त्रातलं नाव, वर्गवारी, आदिवासींनी दिलेलं नाव, त्या नावाचा अर्थ, त्याचे सांस्कृतिक संदर्भ, झाडांचे इतिहास, भूगोल, त्या  झाडाशी जोडलेली आदिवासींची एखादी कथा, एखादं गाणं, आदिवासी बायांचं त्या झाडाशी नातं, त्या झाडाचे औषधी गुणधर्म, झाडाच्या पाना-फळांच्या भाजीची रेसिपी (काय सांगावं? राणी दुपारच्या जेवणात ती भाजी स्वतःच्या हाताने बनवून आपल्याला चक्क खाऊसुद्धा घालेलं!) त्या त्या झाडांची माहिती तिला स्वतःला कधी,कशी,कुणा बायांकडून कळली, त्या बायांनी कोणत्या शब्दांत तिला सांगितली  याच्याही स्वतंत्र काहाण्या असतातच. तिचं हे सगळं सांगण इतकं गोड ,रसाळ असतं की अपल्यापुढे एकेक झाड माणसासारखं उभं राहतं आणि जाणवतं गडचिरोलीच्या आदिवासी समाजाशी, जीवनाशी आणि त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या जंगलाशी, जंगलातल्या झाडा-पाना-फुलांची असलेली राणीची घट्ट दोस्ती.

राणीला जाणून घ्यायची आणखी एक जागा आहे. शोधग्राममधल्या अभय-राणीच्या घरातली मागच्या बाजूची गॅलरी. आणि वेळ  राणी देवीसाठी हार गुंफत बसते तेव्हाची! एरव्ही अभय-राणी एकत्र असताना काही विषय बोलायची राहून गेलेले असतात. काही चक्क अभयच्या अनुपस्थितीत बोलायचे असतात. नवराअभयसंबंधी बायकोराणीच्या तक्रारी, कॉमेंटस वगैरे. अर्थातच तेही सारं अभयबद्दलच्या जीव तुटण्यातून आलेलं. इथे राणी थोडी हळवी होते. तिलाही माझ्यासारख्या ऎकणार्‍या मैत्रिणीची गरज असल्याचं जाणवतं. सर्चच्या कामात मदत करणार्‍या बाहेरच्या व्यक्तींचे आलेले बरे-वाईट अनुभव, कुणाकडून झालेले भ्रमनिरास, दिल्लीच्या किंवा परदेशी पाहुण्यांचे अनुभव, शोधग्रामातले कार्यकर्ते कर्मचारी यांच्या कामाचं खास कौतुक, कामातला एखादा नवा अनुभव असे प्रासंगिक विषय तर असतातच. पण काही जुन्या आठवणीही असतात.
लग्नानंतर वर्ध्याच्या सेवाग्रामात बंगांच्या घरात राहताना चेहर्‍याला पावडर लावण्यावरुन अभयने दाखवलेल्या नाराजीपासून अमेरिकेत जॉन हॉपकिन्स विद्यापीठातले शिक्षक-विद्यार्थी अभयचं प्रेझेंटेशन ऎकायला कसे उत्सुकतेने गर्दी करायचे....इथपर्यत! अभयला पटत नसतानाही गडचिरोलीच्या घरात गणपती आणायला आपण कशी सुरुवात केली हेही त्यात असतं. आता डॉक्टर झालेल्या मोठ्या  मुलाची आनंदची खबर असते, धाकट्या अमृतने बारावीनंतर काय करावं याची काय चर्चा होते त्याचा वृत्तांत असतो.

अशा गप्पांमध्ये काही कौटुंबिक किस्सेही असतात. अमेरिकेतल्या सख्ख्या भावाने साडी घेण्यासाठी पाठवलेली मोठी रक्कम! एवढ्यामोठ्या रक्कमेची साडी राणी घेणं शक्यच नाही. मग नव्याने सुरु झालेल्या गावात ते पैसे वापरण्यासाठी भावाकडून घेतलेली परवानगी वगैरे. राणीच्या दिवंगत वडिलांनी तिच्यासाठी ठेवलेले पैसे, वस्तु वगैरे तिने एका शिक्षणसंस्थेला त्यांच्याच नावे देणगी म्हणून देऊन  टाकल्याचंही अशाच गप्पांमधून कळत. साधनाताई आमटे यांनी शिवसेनेकडून घेतलेल्या पुरस्कारावरची टिपणी असते. एका पेशंट तरुणीने सुरु केलेल्या ब्युटीपार्लर जाणं हे आयुष्यात पहिल्यांदा ब्युटीपार्लर मध्ये जाणं ठरल्याचंही ती सांगते.

अभयच्या अनुपस्थितीत आणि उपस्थितीसुध्दा त्याच्या शिस्तप्रियतेची, (अति)काटेकोरपणाची थोडीशी मस्करी करणंही गमती-गमतीत चालतं. माझा साक्षात्कारी ह्र्दयरोगपुस्तकानंतर वाढलेली अभयची फॅनमेल हाही राणीने त्याला चिडवण्याचा विषय झाला आहे. खरं तर राणी स्वतःच्या कामात तितकीच चोख आहे. पण तिच्या वागण्या-बोलण्यातल्या अघळपघळपणामुळे ती शोधग्रामवासीयांना जवळची वाटते. अभयच्या धाकामुळे किंवा अभयची नाराजी, राग ओढवल्यावर त्याच्यापर्यंत थेट पोहणं ज्यांना जमत नाही ते राणीमार्फत पोहण्याचा प्रयत्न करु पाहतात.
शोधग्रामसारखं काम उभं करण्यासाठी अभयच्या शिस्तीची गरज असते हे खरचं. पण हा सगळा डोलारा सांभाळला जातो, शोधग्रामातलं वातावरण आता आहे तसं जिवंत, प्रसन्न, सुगंधी राहतं इतरांना आपलंसं करुन टकणार्‍या राणीमुळेच.

कित्येक वर्षापर्यंत राणी ही गडचिरोली जिल्ह्यात असलेली एकमेव स्त्रीरोगतज्ज्ञ होती. राणीला तासन्‍ तास न्याहाळावं अशी एक जागा म्हणजे तिची ओपीडी.  पेशंटची प्रचंड गर्दी. सकाळी दहापासून दुपारी अडीच-तीन-साडेतीनेपर्यंत त्यांना प्रसन्नपणे तपासणारी राणी. दवाखान्यात राणीने एक छान टीम तयार केली आहे. सहकारी सुनंदा आणि आणखी दोघीजणी. विशेष म्हणजे सुनंदाचा नवरा तुषार हा अभयचा सहकारी. तो सर्चच्या कार्यालयाची जबाबदारी सांभाळत असतो. स्वच्छ, सुंदर, नीटनेटक्या अशा राणीच्या दवाखान्यात एकेका पेशंट स्त्रीशी तिचं संभाषण ऎकण्यात मी अनेक तास घालवले आहेत. तिथे तयार होणारा पेशंटचा केसपेपर हा तिथल्या स्त्रीजीवनाचा, समाजजीवनाचा दस्तऎवज ठरावा इतका तपशीलवार आणि महत्वाचा असतो. आणि राणीच्या बायांशी होणर्‍या संभाषणातून एकेक कुटुंबकथा उलगडत असते. त्या बाईची सुख-दुःखं, तिचे हळवे कोपरे, तिचे नातेसंबंध, रुढी - श्रध्दांचा तिच्यावरचा पगडा, हसण्या-रडण्याचे तिचे क्षण....सगळंच!

पेशंट स्त्रिया खरं तर राणीकडून तपासून तपासून घेण्यापेक्षा तिला भेटायला म्हणूनच येतात. तपासून घेणं हे निमित्त असावं. बंगबाईही त्यांची डॉक्टर! त्याहीपेक्षा सल्लागार, भरवशाची सखी! आपल्या भोवतालच्या लोकांची काळजी घेणं या राणीच्या स्वभाववैशिष्ट्यामुळे पेशंट बाया तिच्यापाशी आल्यावर निवांत होऊन जातात. आदिवासी स्त्रियांच्या आरोग्याविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य आकलन तयार करणार्‍या राणीच्या गाजलेल्या संशोधनाचा पाया असा अत्यंत मानवी आणि सह्र्दय आहे. अतिग्रामीण भागातल्या स्त्रियांचं गर्भनिरोधनाचं एकमेव साधन गर्भपात हेच कसं असतं, ज्या विवाहेतर संबंधावर, लैंगिक विषयांवर टीव्ही चॅनल्स मालिकाच्या मालिका सादर करतात आणि लोक त्या चवीने बघतात त्याबद्दल आदिवासी समाजात किती आणि कसा खुलेपणा आहे, रोखठोक विचार आहे, दवाखान्यात येणं हे सुध्दा स्त्रियांसाठी घराबाहेर पडण्याची एक दुर्मिळ संधी असल्याने  त्या कशा सजून येतात, मुंबईतली मंगळसूत्राची फॅशन गडचिरोलीत कशी वेगाने पोचते....अशा अनेक विषयांवर स्वतःच्या पेशंटचे दाखले देत राणी भाष्य करत असते.

गावागावात सर्चने प्रशिक्षत केलेल्या दाया (सुईणी) आरोग्यदूत ताया या राणीच्या खास लाडक्या, मर्जीतल्या! या सार्‍यांचं  राणीवरचं प्रेम अक्षरशः उतू चाललेलं असतं. आपापल्या गावातून त्या महिन्यातून एकदा शोधग्रामला येतात. त्यांची परीक्षा आणि उजळणी प्रशिक्षण असा कार्यक्रम तिथे असतो. शोधग्रामला जाण्याचा दिवस कधी एकदा येतो असं त्यांना होऊन गेलेलं असतं. ते त्यांचं माहेर असल्याचं त्या सांगतात आणि राणीला त्या आई म्हणून हाक मारतात. खरोखरच माहेराला आलेल्या लेकींसारखं त्यांचं कौतुक शोधग्राममध्ये होतं. परीक्षा मात्र फार कडक असते. त्यात नापास झालं तर गावात काम करणं बंद असा नियम आहे. कामाच्या विलक्षण ओढीने परीक्षेत पास होण्याची त्या शर्थ करतात आणि पास होतातही. शोधग्राममधल्या कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रत्येक दाईचा, ताईचा असे  शेकडो फोटो लावलेत. शोधग्रामच्या प्रत्येक भेटीच्या वेळी त्या तिथे येऊन आपला फोटो नक्की आहे ना याची खात्री करुन घेतात, तिथे आलेल्या पाहुण्यांना आपापला फोटो दाखवतात. तो फोटो त्या मिरवतात. त्यांच्यासाठी ती अभिमानाची बाब आहे. नवजात बाळांना वाचवून बालमृत्यु रोखणं हे त्यांचं मिशन आहे. आणि या कामात त्यांच्या जगण्याची सार्थकता आहे. स्वतःच्या आयुष्याचं सार्थक करता करता राणी अभयने अशा शेकडो साध्यासुध्या बायापुरुषांना त्यांच्या अस्तित्वाचं भान दिलं आहे. त्यांच्या साध्यासुध्या आयुष्याला सुंदर अर्थ दिला आहे.

शोधग्राममध्ये शिरल्यापासून तिथला निरोप घेईपर्यंत प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी शिस्त आणि विलक्षण आपलेपणा यांचा आपण प्रत्यय घेत असतो. पाहुण्यांचं हवं-नको बघणारे तिथले सारेजण, सार्‍याजणी राणीच्याच आपलेपणाने वागत असतात, राणीचीच जिव्हाळ्याची भाषा बोलत असतात. तिकडे राणी ओपीडीमध्ये तासन्‍ तास गुंतलेली असते. पण तिने घरात बोलावल्यावर करावी इतकी अगत्याची पाहुण्यांची देखभाल शोधग्राममधले कार्यकर्ते, कर्मचारी करत असतात. गेल्या काही वर्षामध्ये या व्यवस्थेला एक व्यावसायिक सफाईदारपणा येत चाललेला दिसतो. पण त्यातला घरेलू गोडवा (राणी टच) जराही कमी झालेला नाही, हे किती ग्रेट!

महाराष्ट्रभूषण पारितोषक स्वीकारल्यानंतरचं अधिकृत भाषण अभय करणार हे ठरवल्यासारखंच होतं, अपेक्षित होतं. राणीलाही आग्रह केला गेला. छोट्याशा भाषणातलं तिचं पहिलं वाक्य होतं- अभयने त्याच्या भाषणात आता जे सांगितलं त्यापेक्षा वेगळं काही मला सांगायचं नाहीये... हेही अपेक्षितचं.
खरोखरच एकमेकांहून वेगळं असं काही त्यांच्यापाशी नाहीच. अभिन्नच आहेत ते. प्रेयसी-प्रियकर, मित्र, पती-पत्नी तर आहेतच. पण मोठं सार्वजनिक काम पेलण्यासाठी एक टीम लागते. राणी- अभय एक आदर्श टीम ठरु शकतात. अशा टीमने केलेल्या कामात विशिष्ट कामाचं श्रेय कुणा एकाला देणं अवघड होऊन बसतं. यशापयशाची भागीदार अख्खी टीमच असते. त्यामुळे सगळं काही त्या दोघांचंही असतं.

१९९१-९२ पासून गडचिरोली जिल्हा दारुमुक्ती आंदोलनात सहभागी होण्याच्या निमित्ताने राणी-अभयशी झालेल्या माझ्या परिचयाचं रुपांतर मैत्रीत, स्नेहात, त्यांच्या टीमची, शोधग्राम परिवाराची एक सदस्य बनण्यात होणं हा माझ्यासाठी फार मोठा ठेवा ठरला आहे. काही निमित घडतं किंवा निमिताविनाही शोधग्रामची वारी होते. तिथून परतताना प्रत्येक वेळी डोळे भरुन येतात, पावलं जड होतात.

आपण सवयीने ‘राणीने अभयला साथ दिली...’ वगैरे म्हणतो. पण खरं तर दोघंही एकमेकांना साथ देताहेत हेच खरं. नागपूर मेडिकल कॉलेजपासून ही साथ सुरु झाली आहे. कधी अभय पहिल्या क्रमांकावर तर कधी राणी अशी मार्कांची चढाओढ त्यांच्यात असायची. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर या स्पर्धकांचं रुपांतर टीममध्ये एकमेकांना पूरक होण्यात झालं. सांगोवांगीत असंही ऎकलयं की राणीचं प्रेम जिंकण्यासाठी अभयला काही स्पर्धकही होते. पण अभय ध्येय गाठल्याशिवाय कसा राहाणार? अजूनही अभय राणीबद्दल ज्या कौतुकाने बोलत असतो. त्यावरुन वाटतं की तो रोज नव्याने राणीच्या प्रेमात पडत असणार. (ह्रदयविकाराच्या झटक्यातून सावरल्यानंतर पुन्हा एकदा राणीच्या प्रेमात पडल्याचं अभयने माझा साक्षात्कारी ह्रदयरोगया पुस्तकात लिहूनच ठेवलयं!)  या दोघांच्या परस्परांवरल्या प्रेमाचंच विस्तारित रुप म्हणजे त्यांचं काम आहे. हे प्रेम इतकं विशाल की फक्त आपली मुलं, आपलं घर या मर्यादेत ते राहाणं शक्यच नव्हतं. या दोघांच्या घराचाच विस्तार आहे शोधग्राम आणि या दोघांच्या टीमनेच जोडला आहे गडचिरोलीबाहेरचा थेट जिनिव्हापर्यंतचा सर्चचा मित्रपरीवार.

मोहफुलांनी झाड डवरतं, सजून जातं. आणि भोवतालच्या हवेत या फुलांचा मोहक सुगंध मिसळून जातो. पुढे झाडाची फुलं टपाटपा जमिनीवर, मातीत पडू लागतात. मोहाच्या झाडाखाली ही फुलं वेचणारे आदिवासी पाहिले की वाटतं- झाड त्यांच्यासाठी ही फुलं वाटून टाकतंय. झाडाला आदिवासींबद्दल इतकी माया आहे, त्यांच्या भविष्याची, त्यांच्या पोरापोरींची इतकी काळजी आहे की एकही फूल त्याला स्वतःपाशी ठेवायचंच नाहीये. मोहाच्या झाडाची फुलं-पानं-फळं-फांद्या सगळं काही आदिवासींच्या उपयोगाचं असतं. आदिवासींच्या जीवनाचं चक्र मोहाच्या झाडाशी, त्याच्या ऋतुंशी जोडलं गेलेलं असतं. मोह हा त्यांचा सखा, देव, सर्वस्व.
राणीला शोधग्राममधलं मोहाचं झाड म्हणावसं वाटतं ते यासाठीच!