पोस्ट्स फारसे टाकत नसले; तरी मी FB ला बर्यापैकी नियमित भेट देत असते. आणि मुख्य म्हणजे
भिंतीवरचा मजकूर मन लावून वाचत असते. विविध प्रासंगिक विषयांवर वेळोवेळी होणार्या
चर्चांत एखादी नवीच माहिती मिळणं, घटनेकडे बघण्याचं एखादं नवंच परिमाण मिळणं
......असं बर्याचदा होत असतं. अनेकदा माझ्या विचार-मताला पुष्टी देणार्या
पोस्ट्स वाचायला मिळणंही होतं. माझ्या मताविरोधी पोस्ट्सनीही माझ्या माहितीत भरच
टाकली आहे. मुख्य म्हणजे इंटरनेट वापरणार्या ‘लिहित्या-बोलक्या’ समाजाचं; ज्यात तरूणवर्ग
मोठ्या संख्येने आहे... दर्शन इथे घडतं. आणि जरी इथल्या पोस्ट्स प्रासंगिक,
उत्स्फूर्त आणि अल्पाक्षरी असल्या; तरी इथल्या मंडळींचा कौल कोणत्या बाजुला झुकतोय
याचा अंदाज येतो. (कालांतराने ज्य़ेष्ठ नागरिकांची संख्या तरुणांच्या संख्येशी
स्पर्धा करणार आहे!)
अनेकदा मुख्य प्रवाहातल्या मिडियात वृत्तपत्रांचे
तावच्या ताव वाचून वा चॅनल्सचं भरपूर सर्फिंग करूनही नवं काही हाती लगत नाही. पण
इथे पटकन काहीतरी मिळून जातं. स्वतःचं काम सांभाळून या भिंतीवर लेखन करत राहाणार्यांचं,
त्यात सातत्य राखणार्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि भिंतीवर एखादी पोस्ट
पडल्यानंतर हिरिरीने आणि आसुसून मतप्रदर्शन करणार्यांचं खास अभिनंदन करावसं
वाटतं. एखादी घटना घडल्यावर अल्पकाळात घटनेची माहिती, तपशील पुरवणं, त्या घटनेच्या
विविध बाजू थोडक्यात पण मुद्देसूदपणे मांडणं, माहिती-मताला
फोटो-व्यंगचित्रं-ग्राफिक्स इ ची जोड देणं...ही कम्युनिकेशनमधली विशेष कौशल्य बाळगणारे
या भिंतीवर भेटतात. रेडिओची नोकरी सोडली
नसती; तर मैत्रप्रवाह – Friend stream सारखा कार्यक्रमही तिथे केला असता. असो.
२०१२ चा निरोप घेताना मी या सर्व FB लेखकुंविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहे. चव्हाटा-उठाठेव
यांचा विशेष उल्लेख करायला हवा. इथला माझा ‘परिवार’ वाढता आहे. तो वाढता राहो. २०१३ मध्येही मी तुमच्या
पोस्टस अशाच मन लावून वाचणार आहे; हे कृपया लक्षात असू द्या!
No comments:
Post a Comment