05 May, 2014

काळ येई काळ जाई देव आहे तैसा राही !

काळ येई काळ जाई देव आहे तैसा राही !

कोणतीही चेंगराचेंगरीचीची घटना घडली की २७ ऑगस्ट २००३ रोजी नाशिकच्या कुंभमेळ्यातली  दुर्घटना आठवते. त्यावेळी मी आकाशवाणीत काम करत होते. कुंभमेळ्याच्या लाइव्ह रिपोर्टिंगसाठी नाशिकमध्येच होते. जुलै ते सप्टेंबर २००३ या कालावधीत झालेल्या त्या कुंभमेळ्यातला २७ ऑगस्ट सर्वाधिक पवित्र दिवस होता. त्या दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी शाही स्नानं असणार होती.  चार महिन्यांच्या कालावधीतली सर्वाधिक गर्दी त्या दिवशी जमणार होती. कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमांसाठी नेहमीच लाखोंची गर्दी जमते. या भाविकांचे रक्षण यंत्रणांना करायचे असते. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, नगरपालिका, पोलीस अशा अनेक यंत्रणांच्या समन्वयाने हे व्यवस्थापन केले जाते. कुंभमेळ्याच्या कव्हरेजच्या तयारीसाठी माझे नाशिकला बर्‍याचदा जाणे होत असे. तिथे जमणारा तो लोकसमुदाय, गोदावरी नदीत डुबकी मारायला आलेले ते देशभरातले गोरगरीब भाविक.  प्रत्येक वेळी तिथली सुसज्ज तयारी बघून आपल्या यंत्रणांचे, त्यात काम करणार्‍या माणसांचे कौतुक वाटत असे. रस्ते, पाणी, शौचालये, निवास, भाविकांनी  काळजी घेण्याविषयी सूचनाफलक, मदतकेंद्रे  इ सर्व काही चोख झालेले.

२७ ऑगस्ट. शाही स्नान संपल्यावर मोठा जनसमुदाय गोदाकाठावरून शहरात परतत होता. काळाराम मंदिरापासचा अरुंद रस्ता. गर्दी नियंत्रणासाठी बांबुचे कठडे बांधलेले.  सर्व काही सुरळीतपणे सुरू असलेले. दुपारची वेळ. लाइव्ह कव्हरेज आटोपून आम्हीही त्याच रस्त्याने चालत येऊन पुढे आकाशवाणी केंद्राच्या दिशेने निघालेलो. आम्ही केंद्रात पोचतो न्‍ पोचतो इतक्यात त्याच जागी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याची बातमी आमच्यापर्यंत पोलिसांकडून पोचली. अशा वेळी माध्यमाने जे काम करायचे असते त्या कामाला आम्ही लगेच लागलोदेखील. सर्व चोख व्यवस्था असतानाही हा अपघात का घडला? प्रथेप्रमाणे मिरवणुकीत साधूंनी प्रसाद म्हणून पैसे उधळायला  सुरूवात केली आणि ते झेलण्याच्या वा खाली वाकून  मिळवण्याच्या खटाटोपात झालेल्या चेंगराचेंगरीने ३९ जणांचे जीव घेतले, ९४ लोक जखमी झाले. यात महिलांची संख्या जास्त होती. आम्ही थोड्याच वेळाने घटनास्थळी पोचलो तेव्हा तिथले दृष्य बघून जीव गलबलला, आतडे तुटले.
ही काही एक घटना नाही.

२००५ला मांढरदेवी यात्रेदरम्यान घडलेली भीषण चेंगराचेंगरी अजूनही ताजी आहे. मागे एकदा हज यात्रेत साप निघाल्याची अफवा पसरल्यामुळे चेंगराचेंगरी झाली होती. कोल्हापूरजवळील चंदगड तालुक्यात तुरकेवाडी आणि मुरकुटवाडी गावांची ग्रामदेवता असलेल्या महालक्ष्मीचा रथ एका बाजूने तुरकेवाडीग्रामस्थ तर दुस-या बाजूने मुरकुटवाडीग्रामस्थ ओढत होतेअचानक रथाचा दोर तुटला, गोंधळ उडाला, चेंगराचेंगरी झाली. रथाखाली चिरडल्या गेलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी जीवितहानी टळली. उत्तर प्रदेशातील सीतापूरात मशिदीत झालेल्या चेंगराचेंगरीत ४० जण गंभीर जखमी झाले होते. मशिदीतील काही भागात वीजप्रवाह पसरला आहे अशी अफवा पसरल्याने हे घडले.

तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सवात घटस्थापनेपूर्वी भवानी ज्योत घेऊन जाण्याची प्रथा  आहे. गेल्या काही वर्षांपासून भवानी ज्योत प्रज्वलीत करून घेण्यासाठी येणार्‍या गर्दीचे प्रमाण वाढत चालले आहे. तिथे चेंगराचेंगरीत एका भाविकाचा मृत्यू झाला. मौनी अमावस्येनिमित्त कुंभमेळ्यात गंगास्नानासाठी गेलेले लाखो भाविक परतत असताना अलाहाबाद रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ भाविकांना प्राण गमवावे लागले होते. याच प्रकारात मोडणारी गेल्या आठवड्यात दसर्‍याच्या दिवशी मध्यप्रदेशातील दतिया जिल्ह्यातल्या रतनगड माता मंदिरात चेंगराचेंगरीपायी झालेली दुर्घटना.

उडिशातल्या फायलीन चक्रीवादळाचा सामना ज्या सरकारी यंत्रणांनी अतिशय कार्यक्षमतेने केला, त्याच यंत्रणा अशा धार्मिक उत्सवांचे व्यवस्थापनही करत असतात. पण दुर्घटनांचा अभ्यास केला तर लक्षात येते की यंत्रणांनी काम चोख केले असले तरी प्रत्येक ठिकाणी काहीतरी अनपेक्षित घडले होते. कधी अफवा पसरणे, कधी बॅरिकेड कोसळणे, दोर तुटणे यासारखे अपघातसुद्धा.
अभिनेते आणि क्रिकेटवीर यांना देवत्व बहाल करणार्‍या भारतीय समाजात चेंगराचेंगरीच्या दुर्घटना घडायला देवदर्शनाचेच निमित्त हवे असे नाही.  मागे चंदिगड आणि लुधियाना इथे बॉलिवूडहिरो सलमान खानला याचि डोळा पाहण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली आणि तिथल्या एका छोटेखानी मॉलचे अक्षरश: रणांगण होऊन गेले. बिहारमध्ये संजूबाबाच्या दर्शनासाठी झालेली तुफानी गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली होती. बिहार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान सेहवाग, गंभीर यांना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीत  चेंगराचेंगरी होऊन चाहते जखमी झाले होते. दिल्लीजवळ नोयडा इथे ’इंडियन आयडॉल’च्या ऑडिशनसाठी जमलेल्या तरुणांच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली होती.  मुंबईत तर हल्ली ‘मॉल’देवांचीही  ‘सबसे सस्ते दिन जत्रा असते. तिथे ग्राहकांच्या  गर्दीमुळे  कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो.
जत्रेत, मोर्च्यात, खरेदीसाठी, नोकरभरतीसाठी वा सेलिब्रेटीसाठी जमलेल्या गर्दीची एक मानसिकता असते. ते भावुक, काहीसे उत्तेजित, संमोहित झालेले असतात. हातघाईवर आलेले असतात. त्यामुळे सरासार विचार करण्याच्या मनोवस्थेत नसतात. अशा गर्दीचे व्यवस्थापन करणे फार जोखमीचे असते. तरीही खूप काही करण्यासारखे आहे. जिथे गर्दी जमणार याची कल्पना असते तिथे मोठी मोकळी जागा ठेवणे, भोवलालची अतिक्रमणे हटवणे (महाराष्ट्रात देवस्थानांभोवती मोकळ्या जागा नाहीत), वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनतळ दूर अंतरावर ठेवणे, वाहनातून  उतरून इच्छित स्थळी चालत जाण्याची तयारी लोकांनी ठेवणे, वाहनतळापासून इच्छित स्थळी ने-आण करण्यासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था, दुकानांना दूर अंतरावर ठेवणे, दारूबंदी आवश्यक, वशिल्याच्या रांगा टाळणे, व्हीआयपींनी उत्सवकाळात अशा ठिकाणी जाणे स्वतःहून  टाळणे (१९५४ मध्ये पंतप्रधान नेहरु कुंभमेळ्यात एका शाही स्नानदरम्यान गेल्याने त्यांना बघणार्‍यांची गर्दी झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. नंतर नेहरुंनी “शाही स्नानाच्या दिवशी कुंभमेळ्यात जाऊ नये” अशी विनंती स्वतः सर्व नेत्यांना केली होती.)  तेल-तूप-गुलाल-भंडारा इ मुळे होणारी अस्वच्छता टाळणे, मोठ्या आवाजात गाणी लावण्यावर बंदी, गर्दीव्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन गणवेशधारी स्वयंसेवकांची फौज ठेवणे, सूचना देण्यासाठी स्थानिक भाषेचा वापर, लोकांपर्यंत पोचण्यासाठी स्थानिक रेडिओ केंद्राची मदत घेणे, वैद्यकीय सुविधासज्जता, चेक पोस्ट, सीसीटिव्ही, संगणक प्रणाली अशा अद्ययावत व्यवस्थांची मदत इ करणे गरजेचेच आहे.
भारतीय मन मुळात श्रद्धाळू. त्यात विविध कारणांनी वेढणारी असुरक्षितता. त्यातून सुटका करून घेण्यासाठी आपला सणा-उत्सवांकडे वाढता ओढा. त्याला बाजाराची साथ. अशा वातावरणात देव मूर्तीत न मावणारा, मंदिरी न गावणारा आणि चराचरी व्यापणारा असतो ही संतांची शिकवण त्यांच्या पचनी कशी पडावी? त्यांची मने बदलण्यासाठी, मते पालटण्यासाठी प्रयत्न तर करायचेच. तोपर्यंत गर्दीचे काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापन याला पर्याय नाहीच.


No comments:

Post a Comment