05 May, 2014

हरी अनंत I हरीकथा अनंत II

हरी अनंत I  हरीकथा अनंत II

नव्वदीच्या वयातल्या श्री नारायणभाई देसाई यांनी ताठ बसून सलग तीन तास सांगितलेली गांधीकथा मी ऐकली. गांधीजयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम मुंबई सर्वोदय मंडळ आणि महात्मा गांधी सेवा मंदिर यांनी मुंबईत आयोजला होता. सर्वोदय मंडळाच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम नेटक्या रूपात साकारला. गांधीजींचे वैयक्तिक सचिव आणि चरित्रकार महादेवभाई देसाई यांचे पुत्र नारायणभाई बालपणापासून गांधींसोबत वावरलेले, साबरमती आश्रमात लहानाचे मोठे झालेले. २००२ मधल्या गुजरातमधल्या दंगलींनी व्यथित झालेल्या नारायणभाईंनी हे कथन लोकांसाठी सुरू केलं. ते सांगतात -  २००२ में गुजरात में जो घटनाएं हुईं, उससे मुझे बहुत वेदना हुई. फिर मुझे लगा कि केवल निंदा करना या आक्रोश प्रकट करना ही काफी नहीं है, बल्कि कुछ रचनात्मक होना चाहिए. गुजरात दंगों को मैं सामाजिक पाप मानता हूं और स्वयं को इससे अलग नहीं रखता. यही वेदना मुझे घूम-घूमकर गांधी कथा करने के लिए विवश करती है.” म्हणजे थेट अगदी गांधींसारखंच - नुसता संघर्ष नाही; तर रचनात्मक काम! २००४ पासून नारायणभाईंनी सुरू केलेल्या गांधीचरित्रकथनाचे आजवर देशभरात शंभरच्यावर कार्यक्रम झाले आहेत. रोज तीन तास असं सलग पाच दिवस कथन. साथीला प्रसंगानुरूप गाणी गाणार्‍या गायक-वादकांच्या ताफा आणि तीन तासांच्या कार्यक्रमात दहा मिनिटांचं मध्यांतर हे कार्यक्रमाचं स्वरूप आहे.

मी गांधीकथा ऐकली त्या दिवशीचा भाग होता दक्षिण आफ्रिकेहून परतल्यानंतर गांधींनी भारतात कसं काम सुरू केलं आणि काही वर्षांतच त्यांचं नेतृत्व कसं प्रस्थापित झालं त्याचं विवेचन करणारा. गांधीचरित्र बर्‍यापैकी माहीत असलं तरी ते गोष्टीरूपाने ऐकणं चांगलं वाटतं. नारायणभाई संथपणे बोलतात. ते गोष्टीवेल्हाळ आजोबा आहेत. मात्र पाल्हाळ लावत नाहीत. “तुम्ही ऐकण्यासाठी भरपूर वेळ खर्च करून आला आहात. तो मी वाया जाऊ देणार नाही” – असंही ते सांगतात. ठराविक वेळात कथन आणि निरूपण बसवायचं कसब त्यांच्याकडे आहे. त्यांच्या कथनात वास्तव घटना, त्यावरचं निरूपण, क्वचित एखादा किस्सा हे सारं असतं. त्यांच्या हिंदी बोलण्यात दुसर्‍या भाषेची भेसळ नाही. असं हिंदी ऐकायला छान वाटतं. त्यांच्या कथनाचं ठळक वैशिष्ट्य असं की त्यांच्या बोलण्यात अभिनिवेश मुळीसुद्धा नाही. गांधींसाठी ते थोर, महान्‍ असली विशेषणंही वापरत नाहीत. अनेकदा गांधी आया – गया यासारखे एकेरी वाक्यप्रयोग ते करतात. त्यातून त्यांची गांधीं या माणसाशी असलेली आत्मीयता व्यक्त होते.

मुळात गांधीकार्य, गांधीविचार समजून घेण्यासाठी मदत करण्याची त्यांची भूमिका आहे. त्यात आग्रही प्रतिपादन नाही. आणि ‘मी...मी’ देखील नाही. उलट अनेकदा ही घटना मला अमक्याकडून कळली वा तमक्याने लिहून ठेवली आहे असा माहितीचा ‘सोर्स’ ते मोकळेपणे सांगतात. मी आकाशवाणीत काम केलं असल्याने मला श्रवणमाध्यमाची बलस्थानं चांगलीच माहीत आहेत. ऐकताना बुद्धीचा, विश्लेषणक्षमतेचा वापर जास्त होतो. ऐकण्यातली मजा काही निराळीच असते. त्याही दृष्टीने मला हा फॉर्म आवडला.  
गांधींच्या कार्यशैलीची काही वैशिष्ट्यं नारायणभाईंनी सूत्ररूपाने सांगितली.

गांधींच्या कार्यशैलीचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे विरोधकांशी संवाद करणं. कोणतीही चर्चा विवेकी भाषेत करावी, विरोधाने विनयाची कास सोडता कामा नये हा त्यांचा नियम होता. १९२४ मध्ये केरळमध्ये अस्पृश्यताविरोधी सत्याग्रह झाला होता. दीर्घ काळ (१४ महिने) चाललेल्या या सत्याग्रहादरम्यान ते तिथे गेले तेव्हा सर्वात आधी अस्पृश्यता पाळणार्‍या सवर्ण नेत्यांना भेटले. त्यानंतर प्रशासकीय आणि पोलीस अधिकार्‍यांना आणि सर्वात शेवटी सत्याग्रहींना भेटले. विरोध विचारांना; व्यक्तीला नाही हा त्यांचा आग्रह असायचा. आश्रमातल्या प्रार्थनेत या मुद्याचा समावेशही होता. माणसाचे विचार बदलणं हे हृदयपरिवर्तन आणि ते करण्याचा प्रयत्न हा सत्याग्रह होता. अहिंसा हा त्यांच्या सत्याग्रहाचा अविभाज्य घटक होता. म्हणूनच जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी आपल्या लोकांनी केलेल्या हिंसेच्या निषेधार्थही उपोषण केलं होतं. आणि असं प्रथमच घडलं होतं!

गांधींनी व्यक्तिगत गुणाला सामाजिक मूल्य बनवलं. उदा राजा हरिश्चंद्र या व्यक्तीचा सत्यवादी म्हणून आपण गौरव करतो आणि तिथेच थांबतो. गांधींनी सत्यवादी असण्याला चक्क चळवळीची रणनीती बनवलं आणि सत्याच्या आग्रहाला सामाजिक मूल्याची प्रतिष्ठा मिळवून दिली. अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह, व्यावहारिक तडजोडीसाठी तयार असणं, स्त्रियांचा सहभाग, नेतृत्व करताना स्वतःवर आणि आंदोलनावर पूर्ण नियंत्रण अशी त्यांच्या व्यूहरचनेची वैशिष्ट्यं सांगता येतील. आपला आतला आवाज मार्गदर्शक असल्याचं ते म्हणत असले तरी स्वतःच्या चुका सुधारायला तयार असणं हे त्यांचा मोठा गुण होता.

दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर १९२४, १९३२ आणि १९४२ अशी दर दहा वर्षांनी मोठी आंदोलनं त्यांनी केली. आणि प्रत्येक वेळी मधल्या काळात त्यांनी लोकांना रचनात्मक कार्यक्रम देत चळवळीतली रग आणि धग जिवंत ठेवली. नारायणभाईंची गांधीकथा ऐकताना आजच्या राजकारणातल्या विसंगती जाणवत राहातात. गांधी, सरदार पटेल यांची महात्म्य सोयीस्करपणे वापरलं जाणं खटकत राहातं. 

गांधीजींच्या कार्यशैलीचं सर्वात मौलिक वैशिष्ट्य होतं की आपल्याकडून चूक घडली तर ती मान्य करणं, त्यासाठी क्षमा मागणं, त्याहीपुढे जाऊन झालेली चूक सुधारणं हे गांधीजी सहजी करत असत. नेता चूक कबूल करतो, माफी मागतो याची तोवर लोकांना सवय नव्हती. आणि तसं करणारे गांधीजी लोकांसाठी आणखीच मोठे ठरले. ‘आधी केले मग सांगितले’ असे सत्याचे प्रयोग करणारा हा नेता. गांधीजींची सारी रूपं नारायणभाई श्रोत्यांसमोर उलगडत राहातात. जनसागरात स्वतःला झोकून देऊन लोकांशी एकरूप झालेला, निर्भय, निर्धारी, सामाजिक-धार्मिक-राजकीय अशा सार्‍याच गोष्टी स्वतःच्या कार्यकक्षेत आणणं....
हरी अनंतl हरीकथा अनंतll


No comments:

Post a Comment