05 May, 2014

चिदंबरम,चिवडा आणि ॥जय महाराष्ट्र॥

चिदंबरम,चिवडा आणि ॥जय महाराष्ट्रII

तामीळनाडू राज्यात चिदंबरम नावाचं एक शहर आहे.  माझ्या मुलीच्या अभ्यासप्रकल्पाच्या निमित्ताने या शहरात तीन आठवडे राहण्याची संधी मला मिळाली.  पण म्हणून मी लगेच प्रवासवर्णन लिहायला बसलेले नाही. तिकडचं वास्तव्य, आसपास केलेली भटकंती, स्थानिकांशी केलेल्या गप्पागोष्टी, स्थानिक वृत्तपत्रांचं वाचन आणि स्वतःचं निरीक्षण यातून तमीळ अस्मितेबद्द्ल असंख्य प्रश्नांची गर्दी आणि न्यूनगंडाच्या वळणाने जाणारी अस्वस्थता घेऊन मी परत आले.

या अस्वस्थतेला वाट करुन दिल्याशिवाय इलाज नसल्याने मनातले प्रश्न कागदावर ठेवत आहे.

नेहाचं, माझ्या मुलीचं काम तिथल्या अन्नामलाई युनिव्हर्सिटीत होतं.  चिदंबरम शहरात अन्नामलाईचं दूरशिक्षण केंद्र आहे.  आम्हाला चिदंबरमलाच मुक्काम करुन राहायचं होतं. दक्षिण भारतातल्या तमीळनाडू राज्याशी कन्याकुमारी पाहाण्यापुरताच माझा संबंध आला होता. शिवाय आता टूरिस्ट म्हणून जायचं नव्हतं.  नेहा दिवसाचे बारा-चौदा तास कामात असणार होती आणि मी तिला सोबत करायला जाणार होते.

जायचं ठरल्यावर तिथली माहिती मिळवायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा प्रभावित झाले तमीळनाडूच्या एकाहून एक सुंदर वेबसाइट्स पाहून.  चिदंबरम हे एक खरोखरच योजनापूर्वक भेट देण्याजोगं ठिकाण निघालं. कावेरीच्या एका उपनदीच्या खोर्‍यातलं हे शहर.  नटराज मंदिरासाठी प्रसिध्द असलेलं शिवलिंग तिथे आहे.  यालाच चिदंबरम रहस्य असं म्हणतात आणि या शिवलिंगाचं दर्शन घेतल्याने मोक्षप्राप्तीचा रस्ता लवकर सापडतो अशी भाविकांची श्रध्दा आहे. मोक्षाचं माहीत नाही; पण माझ्यासाठी चिदंबरमला जाणं हे स्वजाणीवेच्या रस्त्याला लागणं मात्र ठरलं आणि हे सगळं अवचित घडल्याने माझ्यासाठी हेच चिदंबरम रहस्य!

चेन्नईच्या दक्षिणेला २४० कि मी अंतरावरचं चिदंबरम.  तिथून दोन-तीन तासांच्या अंतरावर तंजावर, पॉंडेचरी, कुंभकोणम, त्रिची अशी रम्य ठिकाणं.  आम्ही जाणार होतो तो काळ तिथल्या दुसर्‍या मान्सूनचा.  (पहिला मान्सूनः जुलै-ऑगस्ट, दुसराः ऑक्टो-डिसें ) इंटरनेट्वरच्या माहितीखेरीज लाईव्हमाहिती पुरवली मुंबईतल्या माझ्या कार्यालयातल्या तमीळ मैत्रिणीने आणि चेन्नई आकाशवाणीतल्या सहकार्‍याने.   मुंबईतल्या मैत्रिणाने आमच्यासोबत तिचा चेन्नईला जाण्याचा कार्यक्रम ठरवला.  ती आणि चेन्नई आकाशवाणीतला सहकारी या दोघांनी आम्हाला चिदंबरमपर्यत नेऊन पोचवलं.  आधी चेन्नईत मुक्काम आणि मग चिदंबरमपर्यत पाच-सहा तासांचा रस्त्यावरचा प्रवास.  त्यामुळे अस्मितेविषयीच्या आमच्या चर्चा चेन्नईपासूनच सुरु झाल्या.

पुढे चिदंबरममध्ये निर्मला शंकर ही दिल्लीस्थित तमीळ मैत्रीण माझ्याप्रमाणेच तिच्या मुलीच्या सोबतीला आली होती.  तंजावर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये निर्मलाचा माहेर-सासरचा मोठा गोतावळा आहे.     स्थानिक लोकांना भेटण्यातला आणि तमीळ संस्कृतीविषयी जाणून घेण्यातला माझा रस ओळखून तिने माझी त्या मुक्कामात चांगली सोबत केली.  तिच्याबरोबर मी गावांमध्ये गेले, तमिळ कुटुंबांमध्ये मिसळले, चविष्ट पदार्थ मनसोक्त चाखले, भरपूर गप्पा, चर्चा केल्या, देवळं पाहिली, बाजारात फिरले. तमीळ संस्कृतीचा रास्त अभिमान आणि बाहेरच्या जगाबद्दल स्वतःला अद्ययावत ठेवण्याची इच्छा निर्मलाकडे असल्याने आमची गट्टी जमली.

चेन्नई विमानतळाच्या बाहेर आल्यापासून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी तमीळनाडूचं अस्तित्व अंगावर यायला सुरुवात होते.  राजकीय पोस्टर्सवरची भाषा समजली नाही तरी राज्यकर्त्या घराण्यांच्या सदस्यांचे चेहरे सहज ओळखू येतात. चेन्नई आता आय टी हब वगैरे बनलं असलं तरी मुंबईतून नोकरीनिमित्त तिकडे राहायला गेलेल्या तरुण-तरुणींचा अनुभव असा की तमीळ भाषा येत नसल्याने पावलोपावली अडतं.  तसचं अगदी चेन्नई शहरातल्या हॉट्लांमध्ये किंवा कार्यालयांच्या कॅंटीनमध्येही तमीळ खाद्यपदार्थापलीकडे खास काही मिळत नाही.

आपण (फक्त मुंबईने नाही तर अख्ख्या महाराष्ट्राने) किती तत्परतेने इडली-डोसा आपलासा केलाय. आपल्या जिल्हा-तालुक्यात तर चायनीजही पोचलंय, पण तिकडे अगदी पर्यटकांची मर्जी सांभाळण्यासाठीसुध्दा बटाटावडा अथवा पावभाजी नाही.  जशी हिंदी भाषा नाही तसंच हेही नाही.

तमिळनाडूचे दिवंगत नेते अण्णा दुराई यांचं १९६० मधलं एक भाषण सापडलं. हिंदीला राष्ट्रभाषा करणार्‍या केंद्राच्या निर्णयाला विरोध करताना त्यांनी म्हट्लं होतं इंग्लिश हा जगाला जोडणारा म्हणून मोठा दरवाजा.  आणि हिंदी हा छोटा दरवाजा.  मोठा दरवाजा असताना लहान निवडणं अव्यवहार्य आहे.   शिवाय एकदा हिंदी घुसली की तमिळ भाषेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह आणि तमिळनाडूतल्या कोणत्याही भागात तमिळ भाषेविना व्यहार होताच कामा नयेत असं आमचं म्हणणं आहे.   मात्र जगाला जोडून घेण्यासाठी आम्ही इंग्लिश स्वीकारतो आहोत."

मुंबईत (आणि आता पाठोपाठ पुण्यातही) एकही शब्द मराठीतून बोलल्याविना सर्व व्यवहार सुरळीत होऊ शकतात.  या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर अण्णा दुराईच्या भूमिकेतलं द्रष्टेपण नक्कीच जाणवतं.  पुढे डीएमकेने भाषेचं, तमिळ अस्मितेचं राजकारण जरुर केलं.  पण त्यामुळे तमिळ अस्मिता तितकीच तीव्रपणे जपली गेली.  त्यामुळे राज्याने गमावलं काहीच नाही. उलट कमावलं.

आज तमिळनाडूमधला साक्षरता दर, शिक्षण-आरोग्य सुविधा, माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार, रस्त्यांचं जाळं हे सगळं पाहिल्यावर राज्य किती आघाडीवर आहे ते जाणवतं. चिदंबरम हे जेमतेम तीन लाख लोकवस्तीचं तालुक्याचं ठिकाण (जिल्हाः कुड्ड्लोर) तिथल स्त्री-पुरुष प्रमाण ५१:४९ आहे. साक्षरता दर ८० ट्क्क्यांहून अधिक आणि स्त्री साक्षरता दर ७५ ट्क्क्यांहून जास्त.

आपल्याकडेही शिवसेनेने मराठी अस्मितेची गर्जना केली.  राजकारणही केलं.  मात्र आपल्याकडे ना मराठी भाषा आणि संस्कृति जोपसली गेली ना आपण भौतिक प्रगतीत आघाडी गाठली. संस्कृती जपणं, परंपरा सांभाळणं म्हणजे प्रतिगामीपणा वा सुधारणावादाला विरोध किंवा परंपरा आणि  भौतिक प्रगति या जणू एकमेकांच्या विरोधात जाणार्‍या गोष्टी असा संस्कार आपल्याकडच्या सुधारणावादी चळवळींनी आपल्यावर केला म्हणून आपलं असं झालं असावं का? की सर्वसमावेशकपणाची आपली प्रतिमाच आपल्याला अधिक प्रिय वाटते?

सर्वसमावेशक असणं, इतरांना सामावून घेणं, वैचारिक मोकळेपणा हे खंर तर आपले गुण. (का हेही आपलं लंगडं समर्थ किंवा डरपोकपणाचं दुसरं नाव?)  पण आता मराठी संस्कृती उदध्वस्त होता असताना हे गुण नसून आपल्या मर्यादा आहेत, दुबळेपणा आहे, असं वाटू लागतं. तिकडे सगळीकडे फिरताना मी माझी ओळख मुंबईकर अशी करुन देत होते.  मला जाणवलं की लोकांना मुंबईचं कौतुक आहे. पण महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे, त्याचा मुंबई हा भाग आहे हे लोकांना माहीत नाही.  त्याच्याशी त्यांना फार देणं-घेणंही नाही.  मला जाणवलं आपल्याच राज्यात आपण मुंबईकर मराठी, कोकणी मराठी, पुणेकर मराठी, वैदर्भीय मराठी असे मराठीपणाचे तुकडे वागवतो आहोत.  शिवाय वर्‍हाडी, खानदेशी, मराठवाडी हे प्रकार आहेतच.   याला काही भौगोलोक, ऎतिहासिक कारणं नक्कीच आहेत. पण महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी काळातही आपण मराठी म्हणून एकत्र बांधले गेलेलो नाही याची सल मला दूर तमिळनाडूत खूप जाणवली.

तमिळनाडूमधली अतिभव्य सुंदर मंदिरं, तिथली शिल्पकला, स्थापत्यकला, नृत्य, संगीत हे सगळं महाराष्ट्राच्या तुलनेत अतिप्राचीन आणि थोरच! आणखी एक जाणवलं. एरव्ही देवाधर्माशी निगडीत वाटणार्‍या चालीरीती दाक्षिणात्यांच्या रोजच्या जगण्यात मुरल्यात. हीच त्यांची ओळख.

अन्नामलाई विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागात आम्ही काही माहिती मिळवण्यासाठी गेलो होतो.  आतलं दृष्य पाहून मी दरवाजातच  दचकले.  सर्वच्या सर्व स्त्री-पुरुष कर्मचारी कपाळावर गंध लावलेले.  सर्वच्या सर्व स्त्रिया साडी नेसलेल्या, त्यातही सिल्कच्या साड्या.  स्त्रियांनी केसात गरजे माळलेले.  निर्मलाला माझ्या दचकण्याचा अर्थ समजेना.  मी तिला तो उलगडून सांगितला. म्हटलं, आमच्याकडे एखाद्या तहसील कार्यालयातही एखादा सण समारंभ, पूजा, हळदीकुंकू वगैरे असलं तरच असं दॄष्य दिसतं.  तिचं म्हणणं देवपूजा, देवळात जाणं हा आमच्या दिनचर्येचाच भाग आहे.  त्यामुळे हे सगळं सहज केलं जातं.

नायकरस्वामींच्या प्रखर ब्राह्मणविरोधी आंदोलनाची पार्श्वभूमी तामीळनाडूला आहे.  पण ही कर्मकांडं सर्व जातीजमाती निष्ठेने पाळत असल्याने टिकून आहेत.  त्यांना ती टिकवून ठेवायची आहेत. माझ्या तिथल्या मुक्कामात कार्तिक पौर्णिमेचा दीपम्‍ उत्सव तिथे साजरा झाला.   सर्व जाती-धर्मातल्यांची आणि गरीब-श्रीमंतांची घरं त्या दिवशी पणत्यांनी उजळली होती.

अन्नामलाई विद्यापीठाचं भव्यपण आणि काळाबरोबर राहणं पाहून मला महाराष्ट्राचा शैक्षणिक मागासलेपणा टोचायला लागला. आपल्याकडे असं एखादं भव्य विद्यापीठ का नाही निर्माण झालं?
आपल्याकडे महात्मा फुलेंनी काढलेली शाळा, टिळक-आगरकरांच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणसंस्था, महर्षी कर्वेचं महिला विद्यापीठ, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठ्ल रामजी शिंदे यांच्या शैक्षणिक चळवळी हा उज्ज्वल इतिहास.   त्यानंतर एकदम शिक्षणसम्राटांच्या संस्था अथवा एखादं सिंबायोसिस.....

मला तिथे कायम एका प्रश्नाला सामोरं जावं लागलं.   तुमच्या महाराष्ट्रात काय आहे बघण्यासारखं? महाराष्ट्राची ओळख कशात आहे? पुढेपुढे हा प्रश्न मला चुकवावासा वटू लागला. कारण या प्रश्नाला माझ्याकडे नीटसं उत्तर नव्हतं.   तिथलं तमीळ ऎकताना मला आपल्या इंग्रजी-हिंदी अतिक्रमित मराठीची कीव वाटू लागली.  भाषा गेली म्हणजे बाकी सगळं संपलंच की! 

तिथल्या आबालवृध्दांमध्ये रजनीकांतबद्दलचं ममत्व पाहून आपल्याकडे सकस मराठी अभिनेत्यांपेक्षा आपल्याला अमिताभ वा शाहरुखची जास्त क्रेझ असल्याचं मला बोचू लागलं. तमीळ लोकांनी तमीळ भाषा, कला, संस्कृती जगवलेली आणि जोपासलेली पाहताना मला आपल्याकडच्या मराठीच्या पीछेहाटीबद्दल खंत वाटली आणि साहित्यसंमेलनाच्या तोंडावर होणार्‍या मोसमी चर्चा आठवल्या.

तंजावरला तिथल्या मंदिरांचा शिल्पकलेचा, शीलालेखांचा अभ्यास करायला आलेला तमीळ विद्यार्थ्याचा गट भेटला.   मी मराठी आहे हे कळल्यावर त्यांनी शिवाजीराजांबद्दल बोलणं काढ्लं.  ते कसे थोर साहसी द्रष्टे होते, तंजावरपर्यत पोचले होते वगैरे.....मी त्यावेळी मनातल्या मनात महाराजांची माफी मागितली.   शिवरायांनी जे आपल्याला दिलंय, त्यातलं आपण काहीच शिल्लक ठेवलेलं नाही. त्यांच्याच राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या चढ्त्या श्रेणीत होताहेत आणि ते विद्यार्थी महाराष्ट्राला शिवाजीचं राज्य म्हणून ओळखत होते!

केवळ माझा सह्यकडाअसं आवेगाने आणि आवेशाने वसंत बापटांनी कवितेत लिहून ठेवलंय खरं.  पण आता सह्याद्रीबद्दल आपलेपणा नाही आणि हिमालय तर दिल्लीप्रमाणे खूप दूरच आहे असं महाराष्ट्राचं वास्तव मला अस्वस्थ करु लागलं.

त्याहीपेक्षा मला त्रास झाला हे वास्तव आपल्या अंगवळणी पडलंय त्याचा.  म्हणजे मी चिदंबरमला गेले नसते, तमीळ अस्मितेची ओळख याप्रमाणे मला झाली नसती तर मी महाराष्ट्रात निवांतच राहिले असते.  मराठीच्या पीछेहाटीच्या, अस्मिता विझल्याच्या चर्चा वाचल्या असत्या.  सभासंमेलनाला हजेरी लावून टाळ्याही वाजवल्या असत्या.

हे सगळं झाल्यावर आपण पुन्हा इडली सांबार, खमणढोकळा, भेपुरी वगैरे खायला (बनवायलाही) मोकळे.  पुन्हा आपलं बंगाली साड्या, पंजाबी ड्रेस खरेदी करणं आणि रिक्षावाल्याशी हिंदीत बोलणं सुरु. मागे अरुण साधूंनी बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रात मराठीतून बोलण्याचा फतवा काढण्याची विनंती केली होती.  पुढे काहीच झालं नाही.  हे कोणतं राजकारणसमजा शिवसेनेने घेतलं मनावर आणि दिलीच तशी हाक तर आपण मानू का ते? की नव्या अर्थव्यवस्थेत आपल्याला अशी कोणती स्व-ओळख नकोच आहे?
चिंदबरमहून परतले इतक्यात उस्मानाबादच्या पत्रकार मित्राचा फोन आला. तो तिथल्या तेरच्या प्राचीन प्रागतिक संस्कृतीवर फिल्म बनवत असल्याचं सागंत होता.  मी त्याला म्ह्टलं - अरे, या सगळ्याचा नीट अभ्यास कर.  फिल्म बनव. लिही. ही महाराष्ट्राची ओळख आहे.

निरोप घेताना निर्मलाला मी औपचारिकता पाळण्यासाठी महाराष्ट्रात यायचं आमंत्रण दिलं.   महाराष्ट्रात मी तिला पंढरपूरला घेऊन जाईन आणि कर्नाटकुविठ्ठ्लाबरोबरच जेजुरीच्या खंडोबाचं दर्शनही घडवेन.   तिला मराठी जेवण खाऊ घालताना मला हॉटेलांची शोधाशोध करावी लागेल. हे सगळं मी कसं तरी जमवेन.  पण मराठी बोलणारी माणसं दाखवण्यासाठी मला तिला घेऊन बराच प्रवास करावा लागेल.

नाही म्हणायला आपला भाजलेल्या पोह्यांचा चिवडा तिला चिदंबरममध्येच खिलवून मी मराठीपणाचा प्रसार करायला सुरुवात केली आहे. चिवडा खूप चविष्ट वाटल्याचं प्रशस्तिपत्रही तिने मला तिथेच दिलं.   मी तिला लगेच चिवड्याची रेसिपीही लिहून दिली आणि हा लेख लिहिताना तिने मला फोन करुन तिच्या तमीळ घरात मराठी चिवडा बनवल्याचं आणि नवर्‍याला खाऊ घातल्याचंही सांगितलं ॥जय महाराष्ट्र ॥
                                                                         

No comments:

Post a Comment