05 May, 2014

छोट्यांना सोबत करत राहाणारी कविता

छोट्यांना सोबत करत राहाणारी कविता

तीन वर्षांपूर्वीची ही आठवण. गोरेगाव इथल्या आरे कॉलनीत काही तरुणांनी तिथल्या छोट्या मुलांसाठी अभ्यासिका सुरू केली होती. गोरेगाव परिसर झगझगीत मॉल्स, मोठाली कॉर्पोरेट कार्यालयं, तीस-चाळीस मजल्यांचे टॉवर्स यांनी गजबजून गेला असला; तरी या झगमगाटामागच्या आरे कॉलनीतल्या वसाहतीत राहाणारे श्रमिक बर्‍याचशा सुविधांना पारखे राहिलेले. त्यांच्या मुलांसाठी स्थानिक बुद्धविहारात ही अभ्यासिका सुरू केली होती. शालेय अभ्यासासोबत मुलांची भाषिक कौशल्य वाढवणं हेही या उपक्रमाचं एक उद्दिष्ट होतंच. अभ्यासिकेचं उद्‍घाटन अनंतराव भावे यांच्या कवितावाचनाने झालं. त्यावेळी जमलेल्या मुलामुलींना अनंतरावांनी जो उत्कट आनंदानुभव दिला त्याची मी साक्षीदार आहे. त्या कार्यक्रमाचं वर्णन कवितावाचन अशा तोकड्या शब्दाने नकोच करायला. पहिल्या काही मिनिटांतच अनंतरावांनी (आधीचे भावेकाका आणि आता आजोबा!) मुलांना बोलतं-खेळतं-उसळतं केलं. त्यांना स्वतःसोबत रमायला लावलं त्या अनुभवात!
मुलं त्यांच्या कवितावाचनात रमतात कारण त्यात कवितेसोबत नाट्य, शब्दखेळ, विनोद आणि मुलांना आकर्षित करणारा (आणि मोठ्यांच्या कपाळावर आठी आणणारा) उनाडपणादेखील असतो. या सगळ्याची एक नेटकी रचना असते. त्यांच्या एका कवितेत मामांच्या सुपीक जमिनीचं वर्णन आहे.
मामांच्या जिमिनीत वाटाणे पेराल l दुसर्‍या दिवशी उसळ खाल l
मामांच्या जमिनीत मका पेराल l दुसर्‍या दिवशी कणसे खाल l
मामांच्या जमिनीत ऊस पेराल l दुसर्‍या दिवशी रस प्याल l
मामांच्या जमिनीत दगड पेराल l दुसर्‍या दिवशी डोंगर चढाल l

बालमानसशास्त्राने मुलांच्या बौद्धिक-भावनिक विकासासाठी शिफारस केलेलं सर्व काही इथे आहे. शब्दांची पुनरावृत्ती, मुलांच्या भावविश्वातली उदाहरणं, यमक-प्रास, चमत्कृती, कल्पनेच्या भरार्‍या मारायची प्रेरणा मुलांना देणारी रचना वगैरे वगैरे.
एका कार्यक्रमात त्यांनी ही मामांच्या सुपीक जमिनीची कविता म्हणून दाखवल्यावर एका मुलीने त्यात अशी भर टाकली –
मामांच्या जमिनीत चिंचोके पेराल l दुसर्‍या दिवशी चिंचा खाल l
दुसर्‍या एका मुलाला सुचलं –
मामांच्या जमिनीत बटाटे पेराल l दुसर्‍या दिवशी वडे खाल l
म्हणजे अनंतरावांची कविता वाचून दाखवल्यानंतर संपत नाही. ती मुलांना सोबत करत राहाते. त्यांच्यात नवनिर्मितीचं बीज रुजवते. त्यांच्या कल्पना शब्दांत बांधायला लावते. बालशिक्षण यापेक्षा वेगळं काय असतं? काय असायला हवं?
बालसाहित्यातील योगदानासाठी त्यांना यंदा साहित्य अकादमी पारितोषिकाने सन्मानित करण्यात येत आहे. बालवाङ्मय हा मराठीतल्या मुख्य साहित्य प्रवाहात दुर्लक्षित राहिलेला विषय. त्यामुळे अनंत भावे यांच्या बालसाहित्यसंपदेची मोजदाद केली गेली नसेल. १९६५ पासून बालवाङ्मयात मुशाफिरी सुरू करणार्‍या अनंतरावांच्या मुलांसाठीच्या पुस्तकांची संख्या चाळीसच्या घरात आहे. त्यात कथा-कादंबर्‍या आहेत. आणि कविता सर्वाधिक जवळपास २५० आहेत. आणि आणखी १००-१५० कविता अजून प्रकाशित झालेल्या नाहीत. व्यवसायाने प्राध्यापक, दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात मराठी बातम्यांच्या अभिनिवेशरहित सादरीकरणाचा वस्तुपाठ घालून देणारा वृत्तनिवेदक, ‘माणूस’सारख्या वैचारिक साप्ताहिकातल्या ‘सोलकढी’, ‘महाराष्ट्र टाईम्स’ दैनिकातल्या ‘स्वप्नामध्ये रचिल्या ओळी’, ‘आपलं महानगर’ सायंदैनिकातल्या ‘वडापाव’ या सदरांचे लेखक अशी अनंतरावांची प्रौढ वाचकांना असलेली ओळख. त्याखेरीज ‘एका पराभवाची कहाणी’, ‘बिस्मार्कची शिकार’, ‘दुरंगी हेराशी सामना’ या त्यांच्या अनुवादित युद्धकथा, ‘राशोमान’ आणि ‘शेवाळी रंगाची माणसं’ ही त्यांची अनुवादित नाटकं. त्यांच्या सदरांचे विषय साहित्यिक-सांस्कृतिक–सामाजिक असायचे. लेखनविषय गंभीर असले तरी त्यांच्या लिखाणाचा बाज वरून उनाडच असायचा. त्यांच्या एरवीच्या बोलण्यातही एक खट्याळपणा असतो. त्यांच्या या उनाडक्या, खोड्या यांना बालवाङ्मयात अनावर वाट मिळाली असं दिसतं. त्यांच्या पुस्तकांची नावंच बघा – ‘लालम्‍लाल’, ‘चिक्कीखाव चिक्कीखाव’, ‘अग्गडहत्ती तग्‍गडबंब’, ‘अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी’, ‘झिमझिम्पूरची झिम’, ‘सांगा सांगा ढगोजीबाप्पा’. आकाशवाणीच्या ‘बालदरबार’ कार्यक्रमासाठी त्यांनी लिहिलेल्या आणि नंतर पुस्तकरूपाने आलेल्या नाटकाचं शीर्षक आहे ‘चेंडुच्या फिरक्या’. नावांमधली धमाल कवितांमध्ये सुरूच राहाते.
रंग माझा लाल्‍ l  माझे लाल लाल गाल्‍ l
लाल्‍ माझ्या टोपीवरती l गोंडा लालम्‍ लाल्‍ l
कवितेपेक्षा हे गाणंच अधिक आहे. त्यांच्या अनेक कवितांमध्ये अद्‍भुताची कलाटणी असते. 
एके ठिकाणी एवढा उन्हाळा असतो
की तळहातावर पाव ठेवताच त्याचा म्हणे टोस्ट होतो l
एके ठिकाणी एवढी थंडी पडते
की तोंडाबाहेर जीभ काढली की जिभेचे आइस्फ्रूट होते
एके ठिकाणी एवढा पाऊस पडतो l
की तिथला बेडूक म्हणे बारमास रेनकोट घालतो l

अनंतरावांनी मुलांसाठी लिहायला सुरूवात केली ती मित्राच्या आग्रहावरून. सोमय्या महाविद्यालयातले त्यांचे सहकारी प्रा सुहास बापट यांनी स्वतःच्या छोट्या मुलांसाठी अनंत भावे यांना लिहिण्याची विनंती केली. अनंतरावांनी ते मनावर घेतलं आणि ते लिहीत सुटले. छोट्या मुलांसाठी  अनंतरावांनी मोठ्या प्रमाणावर केलेला एक प्रयोग म्हणजे जोडाक्षरविरहित कथा-कविता. ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ या मुलांना माहीत असलेल्या कथेला त्यांनी  नवं जोडाक्षरविरहित रूप दिलं आहे. ही ७५ पानी गोष्ट वाचताना मराठीत जोडाक्षरं आहेत हे विसरायलाच होतं. या गोष्टीतल्या म्हातारीला त्यांनी ठळक व्यक्तिमत्व  दिलं आहे. गोष्टीत भूत, माकड-माकडीण अशी नवी पात्रं आणली आहेत.
अनंत भावे यांची ही जोडाक्षरविरहित कविता वाचा –

कागदाचा करा ससा l कागदाचा करा मासा l
कागदाचा करा कावळा l कागदाचा करा बगळा l
कागदाचा करा घोडा l कागदाचा करा जोडा l
कागदाची  करा  होडी l कागदाची  करा शिडी l
शिकाल ओरिगामी l तर कागद येईल कामी l

मुलांना अनुकरण करावंस वाटेल आणि सहज खेळतखेळत त्यांना ते करताही येईल अशा या रचना आहेत. अशा पद्धतीने गोष्ट, कविता रचणं, गोष्टीतल्या घटनांचं, पात्रांचं वर्णन करणं, कवितेतल्या शब्दांची विशिष्ट लयीत रचना करणं हा मुलांसाठी मजेचा स्वाध्याय होऊ शकतो. त्यासाठी अनंत भावे यांनी शाळांमध्ये कार्यशाळाही घेतल्या आहेत. मुलांशी होणार्‍या त्यांच्या बोलण्यात एकही इंग्रजी शब्द नसतो. आणि त्यांचं मराठी अवघड संस्कृतप्रचुरही नसतं. सवयीने वापरल्या जाणार्‍या इंग्रजी शब्दांना साधे, चपखल मराठी शब्द शोधणं आणि ते वापरत राहाणं हा त्यांचा मोठाच गुण आहे. नादनिर्मिती करणारे शब्द, खटके, पुनरुक्ती असे भाषेचे प्रयोग करणार्‍या अनंतरावांच्या कविता मुलांच्या भावनांना स्पर्शून जातात. मिनीची ही कविता त्याचं उत्तम उदाहरण आहे.

मिनीला थंडी वाजते l मिनी कुडकुडते कुडकुडते l
मिनी घोंगडी पांघरते l तरी मिनी कुडकुडते कुडकुडते l
मिनी बंडी घालते l तरी मिनी कुडकुडते कुडकुडते l
मिनी लोकरीची टोपी घालते l तरी मिनी कुडकुडते कुडकुडते l
मिनी शेकोटीजवळ बसते l तरी मिनी कुडकुडते कुडकुडते l
मिनी गरम गरम पाणी पिते l तरी मिनी कुडकुडते कुडकुडते l
मिनी भाजी-भाकरी खाते l तरी मिनी कुडकुडते कुडकुडते l
आजी मिनीला कुशीमध्ये l घेते मिनीची थंडी पळून जाते l

‘साधना’च्या वाचकांसाठी अनंतरावांशी झालेल्या गप्पांमधून मराठी बालवाङ्मयाचं आजचं वास्तवही उलगडलं.
“करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे” अशी श्रद्धा बाळगून मुलांसाठी लेखन करणार्‍या साने गुरुजींनी मराठीत ८०-८५ वर्षांपूर्वी सुरू केलेली बालवाङ्मयाची परंपरा पुढे आचार्य अत्रे (नवयुग वाचनमाला), वि स खांडेकर (मंगल वाचनमाला), अनंत काणेकर (भारत वाचनमाला) यांनी सकसपणे सुरू ठेवली होती. त्यानंतरच्या काळात बालसाहित्यात योगदान दिलं विंदा करंदिकर, मंगेश पाडगावकर, काही प्रमाणात कुसुमाग्रज, सदानंद रेगे आणि चिं त्र्यं खानोलकर यांनी.  अलिकडच्या काळात अनिल अवचट, दिलीप प्रभावळकर, बाबा भांड, दासु वैद्‍य यांनीही मुलांसाठी भरीव लेखन केलं आहे. माधुरी पुरंदरे, प्रवीण दवणे, राजीव तांबे हेही मुलांसाठी लिहीत आलेत.  तरीही बालवाङ्मयाच्या कसदार परंपरेला ओहोटी लागल्याचं दिसतं.
मराठीत बालवाङ्मयाविषयीची अनास्था कशी सर्वदूर पसरली आहे आणि त्यापायी बालपिढीचं आपण किती नुकसान करत आहोत याची जाणीव अनंतराव भावे यांना भेटल्यावर झाली. या अनास्थेची बीजं महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर दूरदृष्टीचा अभाव असलेल्या धोरणात आहेत असं त्यांचं म्हणणं. मुलं पुढे मोठी होऊन मराठी भाषक नागरिक म्हणून वावरणार आहेत हे लक्षात घेऊन मराठी भाषेच्या विकासासंबधीचं धोरण ठरवायला हवं होतं. इंग्रजीचा रेटा वाढणार आहे हे लक्षात घेऊनच योजना आखायला हवी होती. मराठी भाषा, साहित्य, नाटक यांचं पोषण करण्यासाठी उपक्रम असायला हवे होते. रत्नाकर मतकरी, सुधा करमरकर यांनी बालनाट्याची चळवळ चालवली. पुढे तीही मंदावली. मोठ्यांसाठी जशा राज्य नाट्यस्पर्धा सुरू केल्या तशा राज्य बालनाट्यस्पर्धा का नाही सुरू करता आल्या? बंगाली भाषेत अनेक मोठ्या साहित्यिकांनी मुलांसाठी लिहिलं आहे. तिथे वा अन्य भाषांत बालवाङ्मयात नवं काही चाललं आहे का हे कळण्याची वा त्यांच्याशी देवाण-घेवाण करण्याची कोणतीही योजना नाही. मराठी वृत्तपत्रांत बालांसाठी असलेल्या पुरवण्या, बालकुमार साहित्य संमेलन, राज्य सरकारकडून देली जाणारी पारितोषिकं हे सारं सांकेतिकपणे सुरू आहे. भाषेचा संस्कार मुलांवर करायचा, जिवंतपणे भाषा वापरायला त्यांना शिकवायचं तर शाळाशाळांमध्ये जाऊन कविता-कथा वाचन,मुलांशी गप्पा, कार्यशाळा असे उपक्रम करणं गरजेचं आहे. त्यासाठी बेअरफ़ूट डॉक्टर्सप्रमाणे भाषेचे अनवाणी दूत म्हणून काही जणांनी झटून काम करण्याची गरज आहे.
आज परिस्थिती अशी आहे की बालवाङ्मय मुलांपर्यंत पोचवण्यासाठी ज्यांनी भागीदारी करायला हवी ते पालक, शाळाचालक, शिक्षक, शिक्षणाधिकारी, शासनयंत्रणा, आणि प्रकाशक-वितरक हेच उदासीन आहेत. प्रकाशकांना बालवाङ्मय नकोच असतं. त्याला बाजारात मागणी नाही असं कारण दिलं जातं. पण प्रकाशक-वितरकांकडे नव्या योजना नाहीत. किमान ‘साधना’कडून तरी बालवाङ्मयप्रसारासाठी प्रयत्न व्हावेत ही अपेक्षा करणं स्वाभाविकच नाही का?
बालवाङ्मय क्षेत्रात असलेल्या उदासीतही अनंतराव मोठ्या असोशीने मुलांमध्ये जात राहिले आहेत. म्हणून त्यांची खंतही आपण गंभीरपणे समजून घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षी चिपळूण साहित्य संमेलनात २५ हजार श्रोतृवृंदाने त्यांच्या बालकवितांना भरभरून दाद दिली. पण नंतर कोणी पालक, शिक्षक, शाळाचालक, एनजीओ यांनी  त्यामध्ये रस दाखवला नाही. प्रत्येक कार्यक्रमानंतर हाच अनुभव येतो. साहित्य अकादमीचं हे पारितोषिक मिळाल्यानंतरदेखील अभिनंदनाचे काही फोन वगळता फारशा उत्साही प्रतिक्रिया आल्या नाहीत.
शाळेत, घरात मुलांवर उपदेशाचा मारा केला जातो किंवा त्यांच्याशी फार लाडीगोडीत बोललं जातं. हे दोन्ही प्रकार मुलांना आवडत नाहीत. मुलांना भाषेशी, शब्दांशी, उच्चारांशी खेळायला आवडतं. यातूनच त्यांची भाषेशी खरी ओळख होते. पण अशाने मुलांची भाषा बिघडेल असं पालक, शिक्षक, भाषाशुद्धीवाले यांना वाटतं. ते धडपडतात मुलांची भाषा ‘सरळ’ करायला. अनंतराव म्हणतात की पालक-शिक्षकांचा हेतू असतो निर्मळ; पण त्याचे परिणाम होतात गढूळ. 
अनंत भावे यांची कळकळ माझ्यापर्यंत पोचत होती. वाटलं, लहानपणी वाचलेल्या ‘दिनूचं बिल’, ‘चांदोबाचा अंगरखा’ यासारख्या कथांनी आपली आयुष्यभर सोबत केली आहे. सध्याच्या बालपिढीला अशी सोबत करणार्‍या कथा-कविता मिळायल्या हव्यात, तो मुलांचा हक्कच नाही का?

(साधना साप्ताहिकात प्रकाशित - नोव्हेंबर १३)

No comments:

Post a Comment