05 May, 2014

प्रिय बाई



प्रिय बाई,
आत्ता हा मायना लिहिल्यानंतर जाणवलं की मी तुम्हाला पत्रं कधी लिहिलेलंच नाही. तसा कधी प्रसंगच आला नाही. कारण मी तुमच्या कायमच संपर्कात राहात आले. तर हे माझं पहिलंच पत्र आणि तेही एकदम जाहीर, वृत्तपत्रातून. निमित्त तुमची पंचाहत्तरी! (एक वर्षाने येणारी!!)

रुइया कॉलेजात पहिल्यांदा तुम्हाला बघितलं तेव्हाच भावलं तुमचं बाणेदार व्यक्तिमत्त्व, तुमच्या मंद रंगाच्या सुती साड्या, मोठ्या केसांचा आंबाडा. तुम्ही वर्गात शिकवायला लागलात की जाणवे तुमची स्वच्छ धारदार वाणी आणि तुम्ही आम्हाला देत असलेला साहित्याचा विचार करण्याचा निराळाच दृष्टिकोन. संगीत, साहित्य, नाटक, सिनेमा, सामाजिक चळवळी या सगळ्यात रस असणार्‍या घरातून आणि शारदाश्रम विद्यामंदिरसारख्या मूल्यशिक्षण देणार्‍या शाळेतून आलेल्या माझ्यासारखीला तुम्ही भेटणं हे खूपच पोषक ठरलं.

मराठी वाङ्मयाचा इतिहास शिकवताना चक्रधरांपासून मर्ढेकरांपर्यंतचा महाराष्ट्राचा सामाजिक इतिहासही तुम्ही सहज उलगडत होता. देवलांचं संगीत शारदा नाटक शिकवताना स्त्रीसमस्यांचा ऎतिहासिक संदर्भ आणि त्याकडे बघण्याची नजर तुम्ही दिली. एकूणच वाङ्मय-समाज यांचे संबंध, सामाजिक समस्यांचं ऎतिहासिक परिप्रेक्ष्य हे सारं तुम्ही शिकवण्याच्या ओघात सांगत होता. तुमचा शिकवण्याचा ओघ वेगवान प्रवाही असायचा. तसं तर कविवर्य वसंत बापट  यांनीही आम्हाला कॉलेजच्या पहिल्या वर्षी शिकवलं. तेही वर्गाला मंत्रमुग्ध करून टाकायचे. तुम्ही आम्हाला त्यापलीकडे नेलंत. विचार करायला शिकवलंत. विचारांची दिशा दाखवलीत. परंपरेचं भान देता देता नवता आणि विद्रोह याचंही मोल काय असतं ते तुम्ही आम्हाला सांगितलं.

१९७०-८०-९० या काळात विजया राजाध्यक्ष, सरोजिनी वैद्य आणि तुम्ही अशा तिघीजणींनी मराठीच्या प्राध्यापिका या नात्याने तुमच्या विद्यार्थ्यांवर मोठा प्रभाव टाकला. पुढे आकाशवाणीत काम करताना माझा विजयाबाई आणि सरोजिनीबाई यांच्याशीही संबंध आला. वयात फरक असला तरी तुम्हा तिघींत एक समान धागा होता.  अध्यापनाखेरीज तुम्हा तिघींचंही आणखी काही निराळं कार्यक्षेत्र होतं. विजयाबाई कथाकार आणि समीक्षक, सरोजिनीबाई समीक्षक आणि पुढे राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक. आणि तुम्ही तर अध्यापनाखेरीज नाटक, सिनेमा, समीक्षा, समाजकारण आणि राजकारण या सार्‍याशी जोडलेल्या होता.

केवढा गतिमान काळ होता तो! आणीबाणी, दलित साहित्याचा बहर, वाङमयीन अनियतकालिकं, माणूस साप्ताहिकातले गाजणारे विषय, ग्रंथालीच्या चळवळीची सुरूवात, आधी जुलूस आणि नंतर घाशीराम कोतवाल अशी नाटकं, भरात असलेलं छबिलदास, नवा प्रायोगिक सिनेमा, जोशातल्या स्त्री संघटना, दलितांचे लढे, मुंबईत गिरणी कामगारांचा पेटलेला विषय या सगळ्याशी माणसाच्या आणि स्त्रीत्वाच्या नात्याने माझाही संबंध आहे याची जाणीव बाई तुमच्यामुळे होऊ लागली. माझ्यासारख्या अशा कितीतरी जणी! म्हणूनच मेधा पाटकरदेखील रुइयाच्या दिवसांबद्दल बोलताना तुमची आठवण काढल्याशिवाय राहात नाही.

रुइयात अभ्यासापेक्षा अभ्यासेतर उपक्रमच जास्त असायचे. खरं तर अशाच उपक्रमांतून आमचा अभ्यास पक्का व्हायचा. परिक्षेतल्या गुणांच्या स्पर्धेत मागे राहाणार्‍या माझ्यासारखीला या उपक्रमांत अधिक रमायला व्हायचं. त्यावेळी नव्या नाटक-सिनेमाची चर्चा घडवून आणणारा एक उपक्रम तुम्ही सुरू केला होता. त्यात आम्हाला डॉ लागू, अमोल पालेकर, विजय तेंडुलकर अशांना भेटायची, त्यांना ऎकायची संधी मिळायची. रविवारी एकेका कवीवर आणि कवितेवर चर्चा करायची असाही तुम्ही सुरू केलेला एक उपक्रम आणि त्यातून  पु शि रेगे, विंदा करंदिकर, बा सी मर्ढेकर यांच्या कविता कशा समजत गेल्या ते मला चांगलंच आठवतं. विष्णुशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमालेला तुम्ही कालसुसंगत परिमाण दिलं. कॉलेजची वर्षं भुर्र्कन संपून गेली; तरी तुमच्याकडून मिळालेली शिदोरी आमच्याजवळ राहिलीच. म्हणूनच आमच्यापैकी अनेकजणी तुमच्या संपर्कात राहिल्या. आता आमची पन्नाशी उलटून गेली तरीही आम्ही तुमच्या संपर्कात आहोत.

खूप मोठा काळ आम्हाला तुमच्यासोबत पहायला, काम करायला मिळाला. वरून कडक वाटणार्‍या तुमच्या व्यक्तिमत्वातला मृदुपणा तुमच्या निकटच्या सहवासात आम्हाला जाणवला.  आमची तुम्हाला वाटणारी काळजी, आमच्या आयुष्यातल्या चढ-उतारात तुम्ही सोबत करणं हे सारं फार सुखकारक होतं आणि आहे. रुइयामध्ये बीए, विद्यापीठात एमए आणि नंतर बीएड केल्यावर मी  हंगामी नोकर्‍या करत होते. त्याचवेळी तुम्ही आकाशवाणीची जाहिरात माझ्या लक्षात आणून देऊन अर्ज करायला सुचवलं, मी ते केलं आणि आकाशवाणीत रुजूदेखील झाले. या सर्व काळात तुमच्या घरी येणं-जाणं असायचं. मग तुमच्या हातची कडक कॉफी आणि एखादा विशेष पदार्थ असं खाणं-पिणं व्हायचंच. स्वयंपाक करण्यातलं तुमचं रमणंही परिचयाचं झालं.

कितीतरी शाकाहारी–मांसाहारी पारंपरिक स्वादिष्ट पदार्थ तुम्ही उत्तमपणे करू शकता. त्याबद्दल सांगताही खूप छान. खरं तर तुम्ही त्यावर एक पुस्तकच लिहायला हवंय. फक्त रेसिपीजवर नाही; तर तुम्ही अनुभलेल्या काळाबद्दल तुम्ही लिहायला हवं असं आम्ही तुम्हाला सतत सांगत असतोच. तुमच्या साठीच्या आगेमागे आम्ही विद्यार्थिनींनी मिळून तुमचा वाढदिवस साजरा केला. त्या कार्यक्रमासाठी खास तुम्ही शिकलात त्या एलफिन्स्टन कॉलेजचे १९५६-५७ चे वार्षिकांक मिळवले होते. आणि त्यातली तुमची कविता आणि ललित लेख यांचं वाचन त्या कार्यक्रमात केलं होतं; आठवतं का तुम्हाला? असं सगळं अजूनही तुम्हाला लिहायचं आहे बाई.  ते तुम्ही कधी मनावर घेताय त्याची वाट बघतोय आम्ही!

तुमच्या जवळ आलेल्या आम्हा सर्वजणींना आपोआपच एक हक्काचा ज्येष्ठ मित्र मिळायचा – अनंत भावे. त्यांना आम्ही सुरुवातीला आदरपूर्वक सर म्हणत असू. पुढे त्यांचं ‘अनंतराव’ हे सर्वपरिचित नावच जवळचं वाटायचं. तुमच्या सर्वच कामांत, उपक्रमांत त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असायचा. आणि तरीही तुम्हा दोघांची दोन स्वतंत्र विश्वही होतीच. तुम्ही बनवलेल्या चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा तो त्यांनीच आणि तुम्हाला दाद द्यावी तीही त्यांनीच!  

कॉलेजच्या नोकरीतून मुक्त होताहोता तुम्ही अनेक अनेक कामांमध्ये गुंतला होतात. विद्यापीठांमध्ये स्त्री अभ्यासाची स्वतंत्र शाखा, सामाजिक कृतज्ञता निधी, महाराष्ट्र फाउंडेशन, केशव गोरे ट्रस्ट, यदि फडके संशोधन केंद्र, साने गुरूजी स्मारक ट्रस्ट, साहित्य अनुवाद केंद्र वगैरे वगैरे. मोबाइल फोन वापरणं तुम्ही चटकन अवगत केलं. त्यामुळे गडहिंग्लजपासून गडचिरोलीपर्यंत कुठेही तुमचे दौरे सुरू असताना तुमच्याशी संपर्क ठेवणं शक्य झालं. रमेश किणी प्रकरणात तुमची नवीच ओळख महाराष्ट्राला झाली. तुमच्या शेजारी राहाणार्‍या शीला किणी यांना साथ देण्यासाठी तुम्ही निर्भयपणे उभ्या राहिलात. कोर्टाच्या सुनावणीच्या वेळी एकदोनदा तुम्हाला सोबत करण्यासाठी आले असल्याने त्या काळात तुम्ही अनुभवलेल्या ताणाची मी साक्षीदार राहिले आहे.

अलिकडेच आपण दोघी बेळगावला गेलो होतो. म्हणजे कार्यक्रम तुमचा आणि मी तुमच्या सोबतीला. तिथल्या बसवराज कट्टीमनी प्रतिष्ठान आणि वाङ्मय चर्चा मंडळ या कन्नड आणि मराठी संस्थांनी एकत्रितपणे आयोजलेला कार्यक्रम. तुम्हाला ऎकण्यासाठी तिथले श्रोते किती उत्सुक होते; ते मी पाहिलं. तुमच्याकडून काहीतरी नवं, सकस, विचारप्रवण ऎकायला मिळणार यासाठी शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, विद्यार्थी यांनी केलेली गर्दी पाहिली आणि आणि मला खूप ग्रेट वाटलं. अथकपणे तुम्ही लोकांना एक दृष्टिकोन देण्याचं काम करत आहात बाई. महाराष्ट्रात आज सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवा उपक्रम तुमच्या मार्गदर्शनाविना पुढे जात नाही. तुम्हीसुद्धा काट्याकाळजीने सगळ्यांना मदत करत राहता, स्वतःचा मधुमेह सांभाळत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात, बाहेरही प्रवास करत राहाता. अजुनही साध्या एसटीने प्रवास करायची तुमची तयारी असते. आणि संकोचापोटी तुम्ही गैरसोयीही सहन करत राहाता. तुमच्याइतकं सोशल नेटवर्किंग तुमच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे सारं फार युनिक आहे. बाई, तुमच्या या युनिकपणाला माझा सलाम!

(लोकमतसाठी – मार्च १३)


No comments:

Post a Comment