16 December, 2009

Story of Mary in Uganda

२४ ऒक्टोबर - मेधा कुळकर्णी

युगांडामधल्या मेरीची सत्यकथा

माणसांचं एकमेकांपासूनचं अंतर कमी करण्याचं श्रेय कॊम्प्युटरपेक्षा मोबाइल फ़ोनला, टेलिकॊम क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाला जातं हे आपण सतत अनुभवत असतो. नवं तंत्रज्ञान हे मनोरंजन किंवा निव्वळ चैन म्हणून वापरलं गेलं असतं तर या क्षेत्राचा एवढा विकास झाला नसता. मोजक्या श्रीमंत देशांमध्ये तसं ते चैन म्हणून वापरलंही जात आहे. पण गरीब देशातल्या लोकांसाठी ते एक उपजीविकेचं साधन बनत चाललं आहे. आपल्याकडे भाजीवाल्या बाया, मासे विकणार्‍या कोळणी, इस्त्री करणारा भैय्ये, रिक्षा ड्रायव्हर अशा हातावर पोट घेऊन जगणार्‍यांनी मोबाइल फ़ोनचा उपयोग करून घेत आपला व्यवसाय कसा वाढवला आहे ते आपण बघतोच. परवा एक मैत्रीण सांगत होती की तिच्या ओळखीत एकजण खरवस बनवून देणारा आहे. त्याच्या मोबाइलवर फ़ोन करून ऒर्डर दिली की दुसर्‍या दिवशी खरवस हजर. मोबाइल फ़ोनच्या वापरामुळे भारतात गरीबांच्या, छोटे व्यवसाय करणार्‍यांच्या जीवनमानात होत असलेली सुधारणा हा अन्य देशांमध्ये चर्चेचा, कुतुहलाचा आणि अभ्यासाचा विषय ठरला आहे. भारतातलं मोबाइल टेलिफ़ोनीचं मॊडेल गरीब देशांसाठी अनुकरणीय ठरत आहे.

युगांडा देशातल्या एका खेड्यातल्या मेरी नावाच्या गरीब स्त्रीचं आयुष्य मोबाइल फ़ोनमुळे कसं बदलून गेलं त्याची गोष्ट नुकतीच इकॊनोमिस्टमध्ये वाचायला मिळाली. स्त्रियांची लग्न लवकर करण्याची परंपरा असलेल्या समाजातली मेरी साठीतच पतवंड खेळवते आहे. सध्याच्या आयुष्याबद्दल ती समाधानी आहे. हे समाधान कुठून आलं? तर आर्थिक विकासामुळे. आर्थिक विकास कशामुळे झाला? मोबाइल फ़ोन वापरल्यामुळे. हे नेमकं काय आणि कसं घडलं?

सन २००३ मध्ये युगांडातल्या ज्या पहिल्या पंधरा स्त्रियांना गावाची फ़ोन ऒपरेटर म्हणून काम करण्याची संधी दिली गेली त्यापैकी एक बुकावेका या गावातली मेरी. ही संधी तशी मोफ़त नव्हती मिळाली. मोबाइलचा हॆंडसेट, खात्रीशीर सिग्नल मिळण्यासाठी एंटेना आणि त्यावरचं छप्पर यासाठी तिला अल्प व्याजदराने कर्ज मिळालं. या भांडवलावर सुरु झाला तिचा फ़ोन कॊल्स विकण्याचा व्यवसाय. शेजारच्या खेड्यापाड्यात ती आपला मोबाइल फ़ोन घेऊन जात असे. लोकांनी केलेल्या प्रत्येक फ़ोनमागे तिचे थोडे थोडे पैसे सुटत गेले आणि तिचं सगळं कर्ज फ़िटून गेलं. आणखी थोडी कमाई झाल्यावर तिने चक्क दुसरा मोबाइल फ़ोन विकत घेतला. त्यातून मिळणार्‍या पैशातून तिने आपल्या घराजवळच बीअरची टपरी टाकली. हळुहळु तिथे म्यु्झिक-व्हिडिओचं दुकान सुरू केलं. त्याचबरोबर कुटुंबातल्या मुलांना शाळेत पाठवायला फ़ीची तरतूदही तिने केली.

गेल्या दोनेक वर्षात मेरीच्या फ़ोन कॊल्स विकण्याच्या धंद्याला मरगळ आली आहे. कारण मोबाइलचे कॊल्स आणि हॆंडसेट्स या दोहोंच्या किंमती उतरल्या आहेत. आणि मेरीच्या आणि आजुबाजुच्या खेडोपाडी खूप लोकांनी स्वतःचे मोबाइल फ़ोन्स विकत घेतले आहेत. तरीही मेरीच्या मिळकतीवर विपरीत परिणाम झालेला नाही. कारण तिला आता आर्थिक स्थैर्य मिळालं आहे. तिच्या दुकानाला चांगली मागणी आहे. फ़ोन कॊल्स विकण्याच्या व्यवसायामुळे, म्हणजेच मोबाइल फ़ोनमुळे आजुबाजुच्या गावात तिच्या भरपूर ओळखी-पाळखी झाल्या. याचा तिच्या दुकानाला चांगलाच फ़ायदा होतो. म्हणूनच मेरी अभिमानाने आणि आनंदाने सांगते - "मोबाइल फ़ोन हा माझा अन्नदाता, रक्षणकर्ता ठरला."

मेरीला ज्या मोबाइल फ़ोनमुळे आर्थिक स्थैर्य मिळालं त्या फ़ोनवरून कॊल्स घेणं किंवा कॊल्स करणं मेरी आणि तिच्यासारख्याच गरीब लोकांसाठी महत्वाचं होतं. इतकं महत्वाचं होतं की हे गरीबातले गरीबसुद्धा कॊल्ससाठी पैसे खर्च करत होते. खराब रस्ते, दळणवळणाच्या साधनांची कमतरता, भरवसा नसलेली टपाल सेवा आणि न चालणारे लॆंडफ़ोन्स या सार्‍यामुळे होत असलेल्या नुकसानाची भरपाई एका मोबाइल फ़ोनमुळे होऊ लागली. प्रवास करण्याला पर्याय ठरू लागला मोबाइल फ़ोन. संपर्क झाला सोपा. माहिती मिळण्या-देण्याला आला वेग. उद्योग-धंदा करण्यात रस असणार्‍या पण हाताशी फ़ारसं भांडवल नसणार्‍या गरीबांसाठी मोबाइल फ़ोनचं तंत्रज्ञान हे वरदानच ठरलं ते असं.

मोबाइल फ़ोनचा वापर हा आता समाजाचा, देशाचा आर्थिक विकास मोजण्याचा एक मापदंड ठरला आहे. अर्थशास्त्रज्ञ सांगतात की विकसनशील देशात प्रत्येक शंभर माणसांमागे मोबाइल फ़ोन्सची संख्या दहाने वाढली की त्या देशाचा जी डी पी प्रति व्यक्ती आठ दशांश टक्क्यांनी वाढतो. सन २००० मध्ये विकसनशील देशांचा मोबाइल फ़ोन्सचा वापर जगाच्या तुलनेत २५ टक्के होता. तर २००९ हे वर्ष सुरू होता होता तो ७५ टक्के झाला. वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्युटने केलेली पाहणी सांगते की विकसनशील देशांची मिळकत जसजशी वाढत जाते तसतसा घरटी मोबाइल फ़ोनवरचा खर्च अन्य वस्तुंपेक्षा, पाणी-वीज यांच्यापेक्षाही वाढत जातो. भारत, चीन, आफ़्रिका या देशांबरोबरच इंडोनेशिया, व्हिएटनाम, ब्राझील आणि रशियातही हे घडत आहे. त्यामुळे खूप मोठे, क्रांतिकारी ठरतील असे बदल सर्वाधिक गरीब देशांमध्ये घडून यायला सुरुवात झाली आहे. गरीबी हटवण्याचे पारंपारिक मार्ग आता आपल्याला बदलावे लागतील असं दिसतंय. नवं तंत्रज्ञान आपल्यासाठी नवे उपाय घेऊन आलं आहे.

Nairobi i have seen - Nov 09

आठव्या आंतरराष्ट्रीय नागरी आरोग्य परिषदेसाठी मी नैरोबीला जायला निघाले तेव्हा माझा मेलबॊक्स "कारिबु केनया" या संदेशाने भरून गेला होता. "कारिबु" म्हणजे केनयाच्या स्वाहिली भाषेत "स्वागत असो". केनया हा देश आफ़्रिकन सफ़ारीसाठी पर्यटकांना प्रिय आहे. आमचा तिथे जाण्याचा उद्देश जगभरातले नागरी आरोग्याचे प्रश्न समजून घेणं, त्या प्रश्नांवर काम करणार्या संस्थांबरोबर अनुभवांची देवाण घेवाण करणं, परिषदेतल्या तज्ञ व्यक्तींची भाषणं ऎकणं, केनयामधलं आणि पूर्व आफ़्रिकेतल्या अन्य देशांमधलं समाजकारण समजून घेणं, खुद्द नैरोबी या आंतरराष्ट्रीय शहरातल्या नागरी प्रश्नांची माहिती मिळवणं आणि हे सगळं करून राहिलेल्या वेळात जंगल सफ़ारीचा आनंद घेणं असा होता. तिथल्या वास्तव्याचे दहा दिवस कारणी लागावेत यासाठी आधीपासूनच ओळखी काढून भेटीगाठी ठरवल्या होत्या. आणि तिथल्या सर्व मंडळींनी "कारिबु.. कारिबु" म्हणत आमंत्रण दिलं होतं.

"पाथ" या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या शिष्टमंडळात माझ्यासोबत आणखी सहाजण होते. पाथचं महाराष्ट्रातल्या सात शहरांमध्ये माता आणि नवजात शिशु आरोग्य या विषयावर काम सुरू आहे. अशा तर्हेचं शहरी भागात सुरू असलेलं आपल्या देशातलं हे पहिलंच काम आहे. या कामातले अनुभव परिषदेत मांडायचे होते. पाथच्या राज्य संचालक डॊ. बेनझिर पाटील यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. परिषदेला एकूण ४५ देशांचे सुमारे आठशे प्रतिनिधी उपस्थित होते. केनयाचे शेजारी असलेल्या इथिओपिया, सोमालिया, टांझानिया, युगांडा, रवांडा, सुदान, घाना या देशातल्या प्रतिनिधींची उपस्थिती नजरेत भरत होती. आशिया, युरोप, अमेरिकेतून आलेलेही भरपूर प्रतिनिधी होते. केनयात फ़िरताना ओबामा स्पिरिट जाणवलं. ओबामा यांचं कौतुक करत ते आमच्यातलेच आहेत असं अभिमानाने सांगणारी माणसं भेटली.

परिषद सुरु होण्याच्या आदल्या दिवशी नैरोबीतल्या काही वस्त्यांना भेट देण्याचा कार्यक्रम होता. शहरी गरिबांचे प्रश्न थेट समजून घेण्याचा हा योग्य मार्ग होता. नैरोबी शहर मुंबईसारखंच वाटलं. त्यामुळे वस्त्यांमध्ये काय चित्र असणार त्याचा थोडासा अंदाज आलाच होता. तो दिवस होता २० ऒक्टोबर, केनया डे. वातावरण उत्सवी आणि उत्साही. "कोरोगोशो" नावाच्या एका मोठ्या वस्तीत आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांसोबत गेलो. लांब-लांब बोळ, दुतर्फ़ा कच्ची-पक्की घरं, कच्चे धूळभरले रस्ते, ठिकठिकाणी कचर्याचे ढीग, मातीत खेळणारी मुलं, पाणी भरणार्या बाया, नळाला पाणी आल्यामुळे त्यांची पाणी भरण्याची घाई चाललेली, दारूने झिंगलेले पुरुष वगैरे. आपल्या मालेगावातल्या वस्त्यांत शिरल्यासारखंच वाटलं. आणखीही काही होतं. झटून काम करणारे कार्यकर्ते होते. वस्ती विकासासाठी काम करणार्या संस्था होत्या. वस्तीचा कम्युनिटी रेडिओ होता. सरकारचे, नगरपालिकेचे शहर विकासाचे प्रकल्प होते. सोबतचे कार्यकर्ते सांगत होते - नैरोबी शहरात चार मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. तिथे सरकारी योजना आहेत. पण भ्रष्टाचारापायी लोकांपर्यंत त्या धड पोचत नाहीत. खासदार निधीचंही तेच. इथल्या लोकांचे आरोग्याचे प्रश्न फ़ार बिकट आहेत. कुपोषणापायी होणारे बालमृत्यु, गर्भावस्थेत, बाळंतपणात होणारे मातामृत्यु, मलेरिया जोरात. लोकांमध्ये पुरेशी जाण नाही. मच्छरदाण्या दिल्या तरी वापरत नाहीत. आरोग्यकेंद्रात जात नाहीत. ते गेले तर तिथे सुविधा नसतात.....समस्यांची न संपणारी साखळी. आपल्यासारखीच. अरबी समुद्र ओलांडून गेलेले आपण पुन्हा आपल्याच देशात परतलो की काय असं वाटण्याइतका सारखेपणा.

परिषदेच्या उदघाटनप्रसंगी इंटरनॆशनल सोसायटी ऒफ अर्बन हेल्थचे संस्थापक अध्यक्ष डॊ. डेव्हिड व्लाहोव म्हणाले - "एकोणीसावं शतक साम्राज्यांचं होतं; विसावं राष्ट्रांचं तर एकविसावं शतक शहरांचं असणार आहे." परिषदेत सादर झालेले पेपर्स, प्रदर्शित झालेली पोस्टर्स, सभागॄहात आणि बाहेरच्या भेटींमध्ये झालेल्या चर्चांमधून शहरीकरणातून उद्भवणार्या समस्यांचा उग्रपणा लक्षात येत होता. त्याचवेळी या समस्या हाताळण्यासाठी आपली सरकारं, धोरणं, आपल्या व्यवस्था सुसज्ज नाही हेही जाणवत होतं.

परिषदेच्या आयोजनात मुख्य भूमिका होती आफ़्रिकन पॊप्युलेशन ऎंड हेल्थ रिसर्च सेंटर (APHRC) ची. सबसहारन आफ़्रिकन देशातल्या समस्या हाताळायला योग्य धोरणं आखली जावीत यासाठी ही संस्था संशोधन करते. आणि या देशातल्या अभ्यासकांमध्ये संशोधन करण्यासाठी आवश्यक कौशल्य निर्माण व्हावीत आणि त्यांच्या संशोधनाची गुणवत्ता वाढावी यासाठी ही संस्था प्रयत्न करते. डॊ. ऎलेक्स एझ हे संस्थेचे कार्यकारी संचालक आहेत. नायजेरियातल्या छोट्या गावात निरक्षर आईच्या पोटी जन्मलेल्या, गरिबीचा दाहक अनुभव घेतलेल्या ऎलेक्स यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. या गरिबीनेच त्यांना सामाजिक क्षेत्रात आणलं. लोकसंख्या शास्त्र या विषयात अमेरिकेतल्या विद्यापीठात डॊक्टरेट करून ऎलेक्स आफ़्रिकेत परतले आणि त्यांनी तिथल्या समस्यांचा अभ्यास सुरू केला. आफ़्रिकन पॊप्युलेशन ऎंड हेल्थ रिसर्च सेंटरचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांना सर्वप्रथम संशोधनावर लक्ष द्यायची गरज वाटली. ऎलेक्स म्हणाले - "अमेरिकेतले अभ्यासक आमच्याकडे येऊन आमच्या प्रश्नांवर संशोधन करत असतात. पण ज्यांचे प्रश्न त्यांनीच अभ्यास करणं, उपाय शोधणं महत्वाचं वाटल्याने मी आफ़्रिकन संशोधकांची संशोधन क्षमता वाढवण्याचे प्रयत्न करायला सुरुवात केली. हे मोठं आव्हान होतं. आमची कौशल्य वाढणं, आमच्याकडे माहिती जमा होणं, ज्ञान निर्माण होणं, आमच्या संशोधकांची पिढी निर्माण करणं निकडीचं होतं. बाहेरच्या संशोधकांवर किती काळ अवलंबून राहायचं? तीन संशोधकांना हाताशी धरून मी सुरुवात केली होती. आता दोनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधक आज आमच्याकडे आहेत. आफ़्रिकेतल्या समस्या शोधणं, त्यांचा अभ्यास, दस्तऎवज तयार करणं, समस्या नेमकेपणाने प्रकाशात आणणं आणि ती सोडवण्यासाठी ठोस कृती सुचवणं ही APHRC च्या कामाची व्याप्ती आहे. झपाट्याने होत असलेलं शहरीकरण नीट हाताळता येणं हे आपल्यापुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. त्यातही शहराकडे स्थलांतरित होणार्या गरीब जनतेचे माता-बाल आरोग्याचे आणि मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न. APHRC ने आफ़्रिकन देशांमधल्या सरकारांच्या धोरण प्रक्रियेवर प्रभाव टाकायला सुरुवात केली आहे. मुलांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाविषयीचं धोरण, गरीब वस्त्यांमध्ये प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचे निकष सैल करणं, प्रसुतीत मदत करणार्या महिलांना सेल फ़ोन देणं, आरोग्य कार्यकर्त्यांसाठी सुधारित प्रशिक्षण असं काही APHRC च्या प्रयत्नांमुळे घडलं आहे. पण समस्या एवढ्या मोठ्या आहेत की APHRC सारख्या दहा संस्थासुध्दा कमीच पडतील."

"कोरोगोशो" या वस्तीत आमच्यासोबत त्या मतदारसंघाच्या तरुण तडफदार खासदार एलिझाबेथ ओरोंगो आल्या होत्या. केनया सरकारचं नैरोबी महानगरासाठी एक विभाग आहे. एलिझाबेथ या विभागाच्या सहाय्यक मंत्री आहेत. त्यांच्या पक्षाच्या त्या राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत. त्यांचं वस्तीतल्या लोकांमध्ये मिसळणं, प्रत्येकाची विचारपूस करणं, हसणं, समूहनृत्यात सहभागी होणं हे आम्हा परदेशी पाहुण्यांना थक्क करायला लावणारं होतं. त्यांच्याभोवती ठिकठिकाणी लोक गोळा होत होते. आणि त्या थांबत छोटेखानी भाषणं करत होत्या. त्यांची भाषणं ऐकून आमचं त्यांच्याबद्दलचं कुतूहल आणखी वाढलं. त्या प्रत्येक ठिकाणी ठासून सांगत होत्या - "मी तुमच्यातूनच आले आहे. मला तुमच्या समस्या समजतात. मी तुमच्यासाठी खूप काही करू इच्छिते. तेव्हा सहकार्य करा. धीर धरा. सरकारचा, माझा तुम्ही फ़ायदा करून घ्या." प्रत्येक ठिकाणी त्या योजनांची माहितीही देत होत्या. माता-बाल आरोग्य, मुलांचं शिक्षण, तरुणांसाठी संगणक प्रशिक्षण, रोजगार या विषयावरच्या योजना. आपल्याप्रमाणेच केनया सरकारमधल्याही भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या तिथे ऎकायला मिळाल्या. एलिझाबेथ यांनी त्यांच्या मतदार संघाला मिळालेला निधी भ्रष्टाचाराच्या गंगेत वाहून जाऊ नये आणि खर्चावर लोकांचं लक्ष रहावं म्हणून स्थानिक समित्या नेमल्यात. या समित्यांवर त्या स्वतः लक्ष ठेवतात असं दिसत होतं. खासदारपणा, मंत्रीपणा याची झूल त्या जराही वागवत नव्हत्या. म्हणूनच त्यांना भेटून सरळ विचारावसं वाटलं की भेटीसाठी, मुलाखतीसाठी वेळ द्याल का आणि त्यांनी ताबडतोब ते मान्यही केलं. नैरोबीहून निघायच्या आदल्या दिवशी त्यांनी मुलाखतीसाठी वेळ काढला. त्यांच्या कार्यालयात दोनेक तास आमच्या गप्प खूप रंगल्या. त्या ठामपणे मांडत होत्या - "रिकाम्या पोटी जे कधी झोपले नाहीत, एका शिलिंगची किंमत किती मोठी असते ते ज्यांना कधी कळलं नाही ते गरिबांसाठी योग्य धोरणं आखूच शकणार नाहीत. हा अनुभव मी घेतला आहे. लहानपणी कुटुंबियांवर अन्याय झालेला पाहिला. तरुणपणात अत्याचाराचा बळी मी स्वतः ठरले. तेव्हापासून खूप राग मनात भरून राहिला होता. नव्या व्यवस्था घडवायला पाहिजेत असं वाटू लागलं. आणि आता लोकप्रतिनिधी म्हणून आपण आखलेल्या धोरणांमुळे गरिबांच्या जीवनात फरक पडतो ही समाधानाची गोष्ट आहे. हेच माझं राजकारण आहे. राजकीय नेतृत्वातूनच समाजात बदल घडू शकतो यावर माझी श्रद्धा आहे. बराक ओबामा यांच्या विजयाने केनयामधल्या गरिबांना आणि माझ्यासारख्या समाजात बदल घडवून आणण्यासाठी राजकारणात आलेल्या व्यक्तीला मोठीच प्रेरणा मिळाली आहे. इतर राजकारण्यांसारखे ते ढोंगी नाहीत. शून्यातून सर्वोच्चपदी पोचलेत ते. भारतातल्या स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल, गर्भलिंग चाचणीच्या गैरवापराबद्दल त्यांनी आम्हाला प्रश्न विचारले. त्यांचं प्रेरणास्थान कोण या प्रश्नावर आपली निरक्षर, समाजसेवी आजी आणि मदर तेरेसा ही दोन नावं त्यांनी घेतली."

आंतरराष्ट्रीय नागरी आरोग्य परिषदेच्या समारोपाच्या वेळी त्यांनी केलेलं भाषण तर काळजाला हात घालणारं आणि राजकीय नेतृत्वाने वंचितविकासाचा विचार कसा केला पाहिजे ते सूचित करणारं होतं. तिथे जमलेल्या आंतरराष्ट्रीय समुदायापुढे त्यांनी स्वत: भोगलेलं बलात्कारासारख्या अत्याचाराचं वास्तव मोकळेपणाने कथन केलं आणि अविकसित देशांमधल्या गरिबांना कोणत्या विपरित परिस्थितीत जगावं लागतं ते स्पष्ट केलं.

एलिझाबेथ ओरोंगो सांगत होत्या - "हे गरिबीचं दुष्टचक्र भेदल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. माझ्या कुटुंबात मी ते भेदलं. त्यामुळे माझी आजी, आई यांच्यापेक्षा माझं आयुष्य निराळं झालं. स्त्रियांच्या कार्यक्रमात मी जाते तेव्हा आपल्या अन्याय-अत्याचाराचं रडगाणं पुरे करा आणि भविष्याची आखणी करा असं सांगते. माझ्यासारखंच आणखी स्त्रियांना राजकारणात आणण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. सरकारमध्ये स्त्रियांचं पुरेसं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. किंबहुना राजकारणच वुमेन फ़्रेंडली असावं असे प्रयत्न मी करत आहे. समाजाचा सर्वात मोठा घटक असतो स्त्रिया आणि बालकं. त्यांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न समाजात नक्कीच बदल घदवून आणतील."

नैरोबीच्या या परिषदेत पोटासाठी शहरांत स्थलांतरित होणार्या लोकांचे प्रश्न जगासमोर आणण्याचा प्रयत्न सुरू होता त्याच वेळी आपल्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले होते. आम्ही नैरोबीहून परतलो तोवर मुख्यमंत्री अशोक चव्हाण सूत्र हाती घेतल्याचं कळलं. गरीबी, अनारोग्य यांचा सर्वाधिक सामना करणारा आफ़्रिका खंड; त्यातही सबसहारन आफ़्रिकेतले अगोदर उल्लेख केलेले देश. त्याखालोखाल क्रमांक लागतो आशिया खंडाचा आणि लॆटिन अमेरिकेचा. अर्थात खुद्द आपल्या देशातही शहरांमध्ये लॆटिन अमेरिका आणि आफ़्रिकेइतक्या समस्याग्रस्त वस्त्या आहेतच. महाराष्ट्राचीही परिस्थिती चिंताजनकच आहे. महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक लॆटिन अमेरिकेतल्या सर्वाधिक गरीब आणि मागासलेल्या बोल्व्हिया या जगात ११४ व्या क्रमांकावर असलेल्या देशाइतका आहे. तर मुंबईचा मानव विकास निर्देशांक अमेरिकेतल्या जॊर्जिया या जगात १०० व्या क्रमांकावर असलेल्या देशाइतका आहे.

युनोच्या अंदाजानुसार येणार्या तीस वर्षात जगात होऊ घातलेली सगळी वाढ छोट्या अथवा मध्यम शहरांमध्ये होणार आहे. शहरीकरणाची आणि त्यासोबत येणार्या समस्यांची तीन प्रमुख केंद्र असणार आहेत सबसहारन आफ़्रिका, आशिया आणि लॆटिन अमेरिका. यासाठीच यंदाची परिषद प्रथमच युरोप-अमेरिकेच्या बाहेर घेतली गेली. लॆटिन अमेरिकन देशांमध्ये शहरीकरणाचा वेग भारताहून अधिक असल्याने त्यांना आत्ता भेडसावणारे प्रश्न आपल्याला येत्या पाच-दहा वर्षांत सतावणारच आहेत. आता राज्यात नव्या सरकारने कामाला सुरुवात केली आहे. तेव्हा शहरी आरोग्यासाठी, विशेषतः माता-बाल आरोग्यासाठी सरकारने पावलं उचलावीत अशी अपेक्षा आहे.

Goggle News, Bharat & his grandfapa

१७ ऒक्टोबर - मेधा कुळकर्णी

भरत, त्याचे आजोबा आणि गुगल न्युज.

नव्या तंत्रज्ञानाने आपल्याला सतत माहितीच्या शोधात आणि संपर्कात राहायची सवय लावली. पूर्वी दौर्‍यावर जाताना रोजची वर्तमानपत्रं वाचायला मिळणार नाहीत याचा त्रास व्हायचा. दौर्‍यावरून घरी परतल्यावर तेवढ्या दिवसांचा पेपरांचा गठ्ठा घेऊन वाचून, किमान चाळून काढायचं एक कामच असायचं. इतकं करूनही एखादी बातमी, एखादा लेख नजरेतून सुटायचाच. आता इंटरनेटमुळे बातम्या, घडामोडी कळण्याची सोय झालीच. आणि वर्तमानपत्रांच्या नेट आवृत्यांमुळे आपलं राहतं शहर सोडून कामासाठी कुठेही कितीही दिवसांसाठी गेलं तरी आपल्या शहरातला, आपल्या सवयीची वर्तमानपत्रं वाचता येण्याची सोय झाली. एवढच नाही तर आपल्याच शहरात राहून अन्य शहरांच्या आवृत्या बघण्याची सोयही या नेट आवृत्यांमुळे झाली. त्यामुळे मुंबईत बसल्या बसल्या एखाद्या वृत्तपत्राच्या पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, ऒरंगाबाद, सोलापूर वगैरे ठिकाणच्या आवृत्त्या वाचण्याची सोयही झाली. याहीपलीकडचं अंतर कापून जगभरातली महत्त्वाची दैनिकं, साप्ताहिकं आपापल्या जागी वाचता येण्याची सोय झाली.

छापील दैनिकं नेटवर वाचायला मिळणं हा नव्या तंत्रज्ञानाने करून दिलेला एक फ़ायदा. याही पुढे जाऊन ईंटरनेटवर वृत्तसेवाच सुरू झाल्या. म्हणजे आपली मेल चेक करता करता किंवा इंटरनेटवर माहिती शोधता शोधता ताज्या बातम्या कळू शकण्याची सोय होणं वगैरे. माहिती मिळण्याची सवय झाली की ती आणखी सुसूत्रपणे कशी मिळेल हे आपण बघतो. आपल्याला ज्या विषयात अधिक रस आहे त्या विषयातल्या नव्या घडामोडी आपल्याला कळायला हव्या असतात. आणि एकाच घटनेकडे विविध दृष्टीकोनातून कसं बघता येतं तेही समजून घ्यायला आपल्याला हवं असतं. आणि हे सारं कमीत कमी वेळात, जास्त खटाटोप न करता मिळायला हवं असतं. बराक ओबामा यांना शांतततेचं नोबेल पारितोषिक मिळालं त्यावर अमेरिका, युरोप, आशिया, आफ़्रिका, अफ़गाणिस्तान आणि अन्य मुस्लीम देश या सगळीकडच्या वृत्तपत्रांचं काय म्हणणं आहे हे समजून घ्यायचं तर आपण प्रत्येक ठिकाणच्या दैनिकांच्या नेट आवृत्त्या बघत बसायचं का?

असाच प्रश्न पडला भरत नावाच्या तरुण इंजिनिअरला ११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेवर झालेला अतिरेक्यांचा हल्ला बघताना. त्याने आपल्या घरात आजोबांना बातम्या वाचताना, रेडिओवर ऎकताना पाहिलं होतं. एकाच बातमीचं विविध कोनातून निरनिराळ्या अंगाने विश्लेषण वाचा-ऎकायला भरतच्या आजोबांना आवडत असे. एकाच वेळी स्थानिक आणि जागतिक दृष्टिकोन समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. भरतवरही तो संस्कार झाला होता. त्यामुळे ९/११ च्या हल्ल्यानंतर त्याने या घटनेचा अर्थ लावण्यासाठी खूप ठिकाणी सर्फ़िंग केलं. अनेक वेबसाइट्स पाहिल्या. त्याचवेळी त्याच्या लक्षात आलं की एका घटनेचा अर्थ समजून घेण्यासाठी माहितीचे अनेक अनेक स्रोत शोधावे, बघावे लागतात. हे सोपं कसं करता येईल याचा विचार त्याच्या डोक्यात सुरू झाला. त्यावेळी तो गुगलमधल्या संशोधन विभागात काम करत होता. त्याने माणूस आणि संगणक यांच्यातली देवाण-घेवाण या विषयात डॊक्टरेट केलं होतं. गुगलचे निर्माते लॆरी आणि सर्जी यांची कार्यपद्धती भरतला आवडली होती.

गुगलमध्ये एक पद्धत अशी होती की नेमून दिलेल्या वेळातला २० टक्के वेळ कर्मचार्‍यांनी स्वतःच्या आवडीच्या विषयासाठी द्यायचा. त्या वेळात त्यांनी काय केलं याचा रिपोर्ट वरिष्ठांनी त्यांच्याकडे मागायचा नाही. कर्मचार्‍यांच्या आवडीच्या विषयाचा गुगलला लाभ होण्यासारखा असेल तर त्या विषयाचा पाठपुरावा करता यावा म्हणून काही निधीही पुरवला जात असे. भरतला त्याचा विषय ९/११ च्या दुर्घटनेत सापडला. विविध स्रोत एकाच ठिकाणी आणून, विषयांचं वर्गीकरण करून माहिती सुसूत्रपणे देऊन बातम्या मिळवण्याचं, वाचण्याचं काम सोपं-सुलभ आणि अधिक अर्थपूर्ण करण्याचा ध्यासच भरतने घेतला. पत्रकार आणि बातम्यांचे वाचक या दोघांनाही हे उपयुक्त ठरेल याची भरतला पक्की खात्रीच होती.

भरतवर झालेले आजोबांचे संस्कार, भरतची स्वतःची समज, बातम्या समजून घेण्यात त्याला असणारा रस, संगणक आणि माणूस यांची एकमेकांशी देवाण-घेवाण कशी असायला हवी त्याचा भरतने केलेला विचार, अल्गोरिथम या गणितातल्या शाखेवर असलेलं त्याचं प्रभुत्व, ९/११ च्या घटनेनंतर जगभरात बातम्या वाचण्याचं लोकांमध्ये निर्माण झालेलं आकर्षण, नवनिर्मितीला पोषक असलेलं गुगलमधलं मोकळं वातावरण, जगभरातली माहिती सूत्रबद्धपणे आणि वेगाने वाचकांना उपलब्ध करून देणं हे गुगलचं ब्रीद या सगळ्यातून निर्माण झालं गुगल न्युज हे पोर्टल. या निर्मितीची कहाणी गुगल स्टोरी या पुस्तकात आहे.

आज गुगल न्युजच्या ४१ आवृत्त्या आहेत. १८ भाषांमध्ये इथे बातम्या वाचायला मिळतात. त्यापैकी एक हिंदी आहेच. या पोर्टलमध्ये काय काय आहे? खरं तर काय नाही? इथे एकाच बातमीचे विविध स्रोत आपल्यासाठी एकाच ठिकाणी आणून ठेवलेले असतात. गुगल न्युज या एकाच पोर्टलवर आपण जगभरातल्या विविध ठिकाणी (छापील, वेब, टीव्ही आणि रेडिओ या चारही माध्यमात) तयार होणार्‍या बातम्या, लेख, स्टोर्‍या पाहू-वाचू-ऎकू शकतो. बातम्यांच्या विषयांचं सुटसुटीत वर्गीकरण, सतत केलं जाणारं नूतनीकरण, आपल्या मेलवर, मोबाइलवर पाठवले जाणारे न्युज एलर्ट्स असं सगळंच इथे आहे. सर्वसामान्य वृत्तपत्र वाचकाला जे मिळतं त्याहून कितीतरी अधिक आणि मोलाचं गुगल न्युज वाचकाला देतं. भरतच्या आजोबांना हवं असायचं तसं आणि आजोबांसारख्या वाचकांना पत्रकार जसं द्यायचे तसं.