लोकांचा रेडिओ
एका गजबजलेल्या झोपडवस्तीतलं रेडिओ स्टेशन. स्टुडिओतून निवेदक कार्यक्रम सादर करत आहे. तो श्रोत्यांना विचारतोय त्यांच्या स्वप्नांविषयी, आकांक्षा, भविष्यातल्या योजनांविषयी. श्रोते फ़ोनवरून बोलताहेत किंवा एस एम एस पाठवताहेत. तरुणांना चांगली नोकरी हवी आहे. निवेदक नोकरी कशी कुठे मिळेल, त्यासाठी वस्तीत कधी कुठे प्रशिक्षण, मार्गदर्शन आयोजित केलंय ते सांगतोय. नोकरीनंतर छोकरी नको का असंही गंमतीत विचारतोय. लगोलग एच आय व्ही एडसबद्दल सावधगिरीची सूचना देतो. रक्त तपासणीची सोय कुठे असते, तपासणी का महत्वाची आहे, देशात, शहरात एडसग्रस्तांचं प्रमाण, स्थिती वगैरे. पोरं सांगताहेत त्यांना खूप शिकायचं आहे. आया सांगताहेत वस्तीत चांगली शाळा हवी. कोणी जन्माला येणार्या बाळांविषयी बोलताहेत. निवेदक त्या त्या विषयावर श्रोत्यांना माहिती देतोय. मधून सुयोग्य गाणीसुद्धा. सुरू आहे रंगतदार कार्यक्रम.
हा नैरोबी शहरातल्या पुमवानी नावाच्या वस्तीतला "घेट्टो" एफ़ एम कम्युनिटी रेडिओ. हा निव्वळ रेडिओ नाही. संपर्क, संवाद, माहितीची देवाण-घेवाण यांची ही पत्रकारिता आहे आणि या सगळ्यातून लोककल्याण साधणारी एक चळवळच आहे.
आपल्याकडे गाव-पाड्यात गेल्यावर लोकांशी बोलताना लक्षात येतं की पूर्वीच्या काळाच्या मनाने लोकांना बर्याच विषयांची माहिती असते. आणि ही माहिती कुठून मिळाली असं विचारलं की ते सांगतात टीव्हीवरून. तरुण मंडळी सांगतात कॊंप्युटरवरून, म्हणजेच इंटरनेटवरून काढली माहिती . माध्यमांच्या वाढत्या संख्येने लोकांच्या माहितीत भर घतली आहे हे नक्कीच. मागे निळू दामले यांनी भारतातल्या गावांत, शहरात हिंडून टीव्हीमुळे लोकांच्या वागण्या-जगण्यात काय फरक पडलाय त्याचा शोध घेतला होता. त्यांच्या "टेलिवर्तन" या पुस्तकात याविषयी त्यांनी लिहिलंय. लोकांवर जर माध्यमांचा एवढा प्रभाव पडत असेल तर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध माध्यमं कशी वापरता येतील याचा विचार माध्यम कार्यकर्ते करत असतात. मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना सर्वसमावेशक भूमिका घेऊनच काम करावं लागतं. विशिष्ट समाजगटापुरती भूमिका घेऊन त्यांचं भागत नाही. माध्यम चालवून नफा मिळवण्याच्या हेतुचा प्रभावही असतो. विशिष्ट समाजगटाचाच विचार करायचा तर वाचक-श्रोता-प्रेक्षक वर्ग कमी होईल, पर्यायाने नफ्यावरही विपरित परिणाम होईल ही भीती असतेच.
याला पर्याय शोधण्यातूनच कम्युनिटी रेडिओ, कम्युनिटी टीव्ही या कल्पना निघाल्या. एखादा समाजगट, वस्ती, गाव यांच्यासाठी त्यांच्या जगण्याविषयी बोलणारा, त्यांनीच चालवलेला रेडिओ म्हणजेच कम्युनिटी रेडिओ. आपल्याकडे विद्यापीठांच्या आवारात चालवले जाणारे रेडिओ आहेत. बारामतीच्या कृषी केंद्रात शेतकर्यांसाठी रेडिओ चालतो. बिहार, झारखंड इथे आकाशवाणीचाच वेळ विकत घेऊन विशिष्ट समाजगटांसाठी कार्यक्रम प्रसारित केले जातात. नेपाळमध्ये काठमांडू शहरात नागरी समस्यांना वाचा फ़ोडणारा रेडिओ आहे.
खर्या अर्थाने कम्युनिटी रेडिओ म्हणता येईल असे तीन कम्युनिटी रेडिओ नैरोबी शहरात नुकतेच बघायला मिळाले. नैरोबी हे केनया या पूर्व आफ्रिकेतल्या देशाच्या राजधानीचं शहर. आपल्या मुंबईसारखंच आंतरराष्ट्रीय. गरीबी, निरक्षरता, अनारोग्य यांचा सर्वाधिक सामना करत आहे आफ़्रिका खंड. त्यातही सबसहारन आफ़्रिकेतले केनयाचे शेजारी असलेले इथिओपिया, सोमालिया, टांझानिया, युगांडा, रवांडा, सुदान, घाना हे देश. नैरोबी इथे नुकतीच आठवी आंतरराष्ट्रीय नागरी आरोग्य परिषद भरली होती. या परिषदेतल्या सहभागामुळे तिथल्या समस्या समजून घेता आल्या आणि त्यावर आफ्रिकन धोरणकर्ते, कार्यकर्ते काय उत्तर शोधताहेत ते बघायला मिळालं. तिथला कम्युनिटी रेडिओ एकदम जिवंत वाटला.
नैरोबी शहरात चार मोठ्या झोपडवस्त्या आहेत. त्यापैकी तीन वस्त्यांमध्ये कम्युनिटी रेडिओ चालतो. हे रेडिओ तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनीच एकत्र येऊन सुरू केले आहेत. ब्राझिलमधल्या कम्युनिटी रेडिओवरून त्यांनी ही प्रेरणा घेतली. अलिकडच्या नव्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे माध्यम चालवण्यातल्या तांत्रिक गोष्टी खूपच सोप्या झाल्यात. त्यासाठी फार मोठ्या तज्ञतेची गरज राहिलेली नाही. प्रत्येक रेडिओचं प्रसारण ती ती वस्ती आणि परिसरात ऎकू जातं. वस्तीतल्या लोकांपैकीच काहीजण रेडिओवर निवेदकांचं काम करतात. आपल्याकडे जसं खाजगी एफ़ एम रेडिओवरून कार्यक्रमांचा आणि गाण्यांचा चोवीस तास अखंड रतीब सुरू असतो तसाच या कम्युनिटी रेडिओवरूनही असतो. फक्त कार्यक्रमांच्या स्वरुपात जमीन-अस्मानाचा फरक असतो. तिथेही मनोरंजन करणारे अन्य एफ़ एम रेडिओ आहेत. तेही ऎकले जातात. पण किबेरा, कोरोगोशो आणि पुमवानी या वस्त्यांमध्ये चालणारे कम्युनिटी रेडिओ स्थानिकांमध्ये भरपूर ऎकले जातात.
केनया सरकारने कम्युनिटी रेडिओविषयीचं धोरण ठरवावं यासाठी स्लम्स इन्फ़र्मेशन डेव्हलपमेंट ऎंड रिसोर्स सेंटर्स या संस्थेने २००२ पासून प्रयत्न केले. त्यामुळे तसं धोरण आखलं गेलं आणि लोकांना त्यांचा रेडिओ मिळाला. इंटरनेट न्युज ही संस्था निवेदकांना प्रशिक्षण देते. कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना आवश्यक ती माहिती मिळवायला मदत करते. कम्युनिटी रेडिओंना अजून जाहिराती प्रसारित करायला परवानगी नाही. त्यामुळे स्टेशन चालवण्यासाठी निधी कमी पडतो. निवेदक तर अत्यल्प मोबदल्यात स्वयंसेवक म्हणूनच काम करतात. खर तर श्रोते आहेत आणि तळमळीचे कार्यकर्ते आहेत म्हणून हे रेडिओ टिकून आहेत.
- मेधा कुळकर्णी.
No comments:
Post a Comment