२४ ऒक्टोबर - मेधा कुळकर्णी
युगांडामधल्या मेरीची सत्यकथा
माणसांचं एकमेकांपासूनचं अंतर कमी करण्याचं श्रेय कॊम्प्युटरपेक्षा मोबाइल फ़ोनला, टेलिकॊम क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाला जातं हे आपण सतत अनुभवत असतो. नवं तंत्रज्ञान हे मनोरंजन किंवा निव्वळ चैन म्हणून वापरलं गेलं असतं तर या क्षेत्राचा एवढा विकास झाला नसता. मोजक्या श्रीमंत देशांमध्ये तसं ते चैन म्हणून वापरलंही जात आहे. पण गरीब देशातल्या लोकांसाठी ते एक उपजीविकेचं साधन बनत चाललं आहे. आपल्याकडे भाजीवाल्या बाया, मासे विकणार्या कोळणी, इस्त्री करणारा भैय्ये, रिक्षा ड्रायव्हर अशा हातावर पोट घेऊन जगणार्यांनी मोबाइल फ़ोनचा उपयोग करून घेत आपला व्यवसाय कसा वाढवला आहे ते आपण बघतोच. परवा एक मैत्रीण सांगत होती की तिच्या ओळखीत एकजण खरवस बनवून देणारा आहे. त्याच्या मोबाइलवर फ़ोन करून ऒर्डर दिली की दुसर्या दिवशी खरवस हजर. मोबाइल फ़ोनच्या वापरामुळे भारतात गरीबांच्या, छोटे व्यवसाय करणार्यांच्या जीवनमानात होत असलेली सुधारणा हा अन्य देशांमध्ये चर्चेचा, कुतुहलाचा आणि अभ्यासाचा विषय ठरला आहे. भारतातलं मोबाइल टेलिफ़ोनीचं मॊडेल गरीब देशांसाठी अनुकरणीय ठरत आहे.
युगांडा देशातल्या एका खेड्यातल्या मेरी नावाच्या गरीब स्त्रीचं आयुष्य मोबाइल फ़ोनमुळे कसं बदलून गेलं त्याची गोष्ट नुकतीच इकॊनोमिस्टमध्ये वाचायला मिळाली. स्त्रियांची लग्न लवकर करण्याची परंपरा असलेल्या समाजातली मेरी साठीतच पतवंड खेळवते आहे. सध्याच्या आयुष्याबद्दल ती समाधानी आहे. हे समाधान कुठून आलं? तर आर्थिक विकासामुळे. आर्थिक विकास कशामुळे झाला? मोबाइल फ़ोन वापरल्यामुळे. हे नेमकं काय आणि कसं घडलं?
सन २००३ मध्ये युगांडातल्या ज्या पहिल्या पंधरा स्त्रियांना गावाची फ़ोन ऒपरेटर म्हणून काम करण्याची संधी दिली गेली त्यापैकी एक बुकावेका या गावातली मेरी. ही संधी तशी मोफ़त नव्हती मिळाली. मोबाइलचा हॆंडसेट, खात्रीशीर सिग्नल मिळण्यासाठी एंटेना आणि त्यावरचं छप्पर यासाठी तिला अल्प व्याजदराने कर्ज मिळालं. या भांडवलावर सुरु झाला तिचा फ़ोन कॊल्स विकण्याचा व्यवसाय. शेजारच्या खेड्यापाड्यात ती आपला मोबाइल फ़ोन घेऊन जात असे. लोकांनी केलेल्या प्रत्येक फ़ोनमागे तिचे थोडे थोडे पैसे सुटत गेले आणि तिचं सगळं कर्ज फ़िटून गेलं. आणखी थोडी कमाई झाल्यावर तिने चक्क दुसरा मोबाइल फ़ोन विकत घेतला. त्यातून मिळणार्या पैशातून तिने आपल्या घराजवळच बीअरची टपरी टाकली. हळुहळु तिथे म्यु्झिक-व्हिडिओचं दुकान सुरू केलं. त्याचबरोबर कुटुंबातल्या मुलांना शाळेत पाठवायला फ़ीची तरतूदही तिने केली.
गेल्या दोनेक वर्षात मेरीच्या फ़ोन कॊल्स विकण्याच्या धंद्याला मरगळ आली आहे. कारण मोबाइलचे कॊल्स आणि हॆंडसेट्स या दोहोंच्या किंमती उतरल्या आहेत. आणि मेरीच्या आणि आजुबाजुच्या खेडोपाडी खूप लोकांनी स्वतःचे मोबाइल फ़ोन्स विकत घेतले आहेत. तरीही मेरीच्या मिळकतीवर विपरीत परिणाम झालेला नाही. कारण तिला आता आर्थिक स्थैर्य मिळालं आहे. तिच्या दुकानाला चांगली मागणी आहे. फ़ोन कॊल्स विकण्याच्या व्यवसायामुळे, म्हणजेच मोबाइल फ़ोनमुळे आजुबाजुच्या गावात तिच्या भरपूर ओळखी-पाळखी झाल्या. याचा तिच्या दुकानाला चांगलाच फ़ायदा होतो. म्हणूनच मेरी अभिमानाने आणि आनंदाने सांगते - "मोबाइल फ़ोन हा माझा अन्नदाता, रक्षणकर्ता ठरला."
मेरीला ज्या मोबाइल फ़ोनमुळे आर्थिक स्थैर्य मिळालं त्या फ़ोनवरून कॊल्स घेणं किंवा कॊल्स करणं मेरी आणि तिच्यासारख्याच गरीब लोकांसाठी महत्वाचं होतं. इतकं महत्वाचं होतं की हे गरीबातले गरीबसुद्धा कॊल्ससाठी पैसे खर्च करत होते. खराब रस्ते, दळणवळणाच्या साधनांची कमतरता, भरवसा नसलेली टपाल सेवा आणि न चालणारे लॆंडफ़ोन्स या सार्यामुळे होत असलेल्या नुकसानाची भरपाई एका मोबाइल फ़ोनमुळे होऊ लागली. प्रवास करण्याला पर्याय ठरू लागला मोबाइल फ़ोन. संपर्क झाला सोपा. माहिती मिळण्या-देण्याला आला वेग. उद्योग-धंदा करण्यात रस असणार्या पण हाताशी फ़ारसं भांडवल नसणार्या गरीबांसाठी मोबाइल फ़ोनचं तंत्रज्ञान हे वरदानच ठरलं ते असं.
मोबाइल फ़ोनचा वापर हा आता समाजाचा, देशाचा आर्थिक विकास मोजण्याचा एक मापदंड ठरला आहे. अर्थशास्त्रज्ञ सांगतात की विकसनशील देशात प्रत्येक शंभर माणसांमागे मोबाइल फ़ोन्सची संख्या दहाने वाढली की त्या देशाचा जी डी पी प्रति व्यक्ती आठ दशांश टक्क्यांनी वाढतो. सन २००० मध्ये विकसनशील देशांचा मोबाइल फ़ोन्सचा वापर जगाच्या तुलनेत २५ टक्के होता. तर २००९ हे वर्ष सुरू होता होता तो ७५ टक्के झाला. वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्युटने केलेली पाहणी सांगते की विकसनशील देशांची मिळकत जसजशी वाढत जाते तसतसा घरटी मोबाइल फ़ोनवरचा खर्च अन्य वस्तुंपेक्षा, पाणी-वीज यांच्यापेक्षाही वाढत जातो. भारत, चीन, आफ़्रिका या देशांबरोबरच इंडोनेशिया, व्हिएटनाम, ब्राझील आणि रशियातही हे घडत आहे. त्यामुळे खूप मोठे, क्रांतिकारी ठरतील असे बदल सर्वाधिक गरीब देशांमध्ये घडून यायला सुरुवात झाली आहे. गरीबी हटवण्याचे पारंपारिक मार्ग आता आपल्याला बदलावे लागतील असं दिसतंय. नवं तंत्रज्ञान आपल्यासाठी नवे उपाय घेऊन आलं आहे.
No comments:
Post a Comment