१७ ऒक्टोबर - मेधा कुळकर्णी
भरत, त्याचे आजोबा आणि गुगल न्युज.
नव्या तंत्रज्ञानाने आपल्याला सतत माहितीच्या शोधात आणि संपर्कात राहायची सवय लावली. पूर्वी दौर्यावर जाताना रोजची वर्तमानपत्रं वाचायला मिळणार नाहीत याचा त्रास व्हायचा. दौर्यावरून घरी परतल्यावर तेवढ्या दिवसांचा पेपरांचा गठ्ठा घेऊन वाचून, किमान चाळून काढायचं एक कामच असायचं. इतकं करूनही एखादी बातमी, एखादा लेख नजरेतून सुटायचाच. आता इंटरनेटमुळे बातम्या, घडामोडी कळण्याची सोय झालीच. आणि वर्तमानपत्रांच्या नेट आवृत्यांमुळे आपलं राहतं शहर सोडून कामासाठी कुठेही कितीही दिवसांसाठी गेलं तरी आपल्या शहरातला, आपल्या सवयीची वर्तमानपत्रं वाचता येण्याची सोय झाली. एवढच नाही तर आपल्याच शहरात राहून अन्य शहरांच्या आवृत्या बघण्याची सोयही या नेट आवृत्यांमुळे झाली. त्यामुळे मुंबईत बसल्या बसल्या एखाद्या वृत्तपत्राच्या पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, ऒरंगाबाद, सोलापूर वगैरे ठिकाणच्या आवृत्त्या वाचण्याची सोयही झाली. याहीपलीकडचं अंतर कापून जगभरातली महत्त्वाची दैनिकं, साप्ताहिकं आपापल्या जागी वाचता येण्याची सोय झाली.
छापील दैनिकं नेटवर वाचायला मिळणं हा नव्या तंत्रज्ञानाने करून दिलेला एक फ़ायदा. याही पुढे जाऊन ईंटरनेटवर वृत्तसेवाच सुरू झाल्या. म्हणजे आपली मेल चेक करता करता किंवा इंटरनेटवर माहिती शोधता शोधता ताज्या बातम्या कळू शकण्याची सोय होणं वगैरे. माहिती मिळण्याची सवय झाली की ती आणखी सुसूत्रपणे कशी मिळेल हे आपण बघतो. आपल्याला ज्या विषयात अधिक रस आहे त्या विषयातल्या नव्या घडामोडी आपल्याला कळायला हव्या असतात. आणि एकाच घटनेकडे विविध दृष्टीकोनातून कसं बघता येतं तेही समजून घ्यायला आपल्याला हवं असतं. आणि हे सारं कमीत कमी वेळात, जास्त खटाटोप न करता मिळायला हवं असतं. बराक ओबामा यांना शांतततेचं नोबेल पारितोषिक मिळालं त्यावर अमेरिका, युरोप, आशिया, आफ़्रिका, अफ़गाणिस्तान आणि अन्य मुस्लीम देश या सगळीकडच्या वृत्तपत्रांचं काय म्हणणं आहे हे समजून घ्यायचं तर आपण प्रत्येक ठिकाणच्या दैनिकांच्या नेट आवृत्त्या बघत बसायचं का?
असाच प्रश्न पडला भरत नावाच्या तरुण इंजिनिअरला ११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेवर झालेला अतिरेक्यांचा हल्ला बघताना. त्याने आपल्या घरात आजोबांना बातम्या वाचताना, रेडिओवर ऎकताना पाहिलं होतं. एकाच बातमीचं विविध कोनातून निरनिराळ्या अंगाने विश्लेषण वाचा-ऎकायला भरतच्या आजोबांना आवडत असे. एकाच वेळी स्थानिक आणि जागतिक दृष्टिकोन समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. भरतवरही तो संस्कार झाला होता. त्यामुळे ९/११ च्या हल्ल्यानंतर त्याने या घटनेचा अर्थ लावण्यासाठी खूप ठिकाणी सर्फ़िंग केलं. अनेक वेबसाइट्स पाहिल्या. त्याचवेळी त्याच्या लक्षात आलं की एका घटनेचा अर्थ समजून घेण्यासाठी माहितीचे अनेक अनेक स्रोत शोधावे, बघावे लागतात. हे सोपं कसं करता येईल याचा विचार त्याच्या डोक्यात सुरू झाला. त्यावेळी तो गुगलमधल्या संशोधन विभागात काम करत होता. त्याने माणूस आणि संगणक यांच्यातली देवाण-घेवाण या विषयात डॊक्टरेट केलं होतं. गुगलचे निर्माते लॆरी आणि सर्जी यांची कार्यपद्धती भरतला आवडली होती.
गुगलमध्ये एक पद्धत अशी होती की नेमून दिलेल्या वेळातला २० टक्के वेळ कर्मचार्यांनी स्वतःच्या आवडीच्या विषयासाठी द्यायचा. त्या वेळात त्यांनी काय केलं याचा रिपोर्ट वरिष्ठांनी त्यांच्याकडे मागायचा नाही. कर्मचार्यांच्या आवडीच्या विषयाचा गुगलला लाभ होण्यासारखा असेल तर त्या विषयाचा पाठपुरावा करता यावा म्हणून काही निधीही पुरवला जात असे. भरतला त्याचा विषय ९/११ च्या दुर्घटनेत सापडला. विविध स्रोत एकाच ठिकाणी आणून, विषयांचं वर्गीकरण करून माहिती सुसूत्रपणे देऊन बातम्या मिळवण्याचं, वाचण्याचं काम सोपं-सुलभ आणि अधिक अर्थपूर्ण करण्याचा ध्यासच भरतने घेतला. पत्रकार आणि बातम्यांचे वाचक या दोघांनाही हे उपयुक्त ठरेल याची भरतला पक्की खात्रीच होती.
भरतवर झालेले आजोबांचे संस्कार, भरतची स्वतःची समज, बातम्या समजून घेण्यात त्याला असणारा रस, संगणक आणि माणूस यांची एकमेकांशी देवाण-घेवाण कशी असायला हवी त्याचा भरतने केलेला विचार, अल्गोरिथम या गणितातल्या शाखेवर असलेलं त्याचं प्रभुत्व, ९/११ च्या घटनेनंतर जगभरात बातम्या वाचण्याचं लोकांमध्ये निर्माण झालेलं आकर्षण, नवनिर्मितीला पोषक असलेलं गुगलमधलं मोकळं वातावरण, जगभरातली माहिती सूत्रबद्धपणे आणि वेगाने वाचकांना उपलब्ध करून देणं हे गुगलचं ब्रीद या सगळ्यातून निर्माण झालं गुगल न्युज हे पोर्टल. या निर्मितीची कहाणी गुगल स्टोरी या पुस्तकात आहे.
आज गुगल न्युजच्या ४१ आवृत्त्या आहेत. १८ भाषांमध्ये इथे बातम्या वाचायला मिळतात. त्यापैकी एक हिंदी आहेच. या पोर्टलमध्ये काय काय आहे? खरं तर काय नाही? इथे एकाच बातमीचे विविध स्रोत आपल्यासाठी एकाच ठिकाणी आणून ठेवलेले असतात. गुगल न्युज या एकाच पोर्टलवर आपण जगभरातल्या विविध ठिकाणी (छापील, वेब, टीव्ही आणि रेडिओ या चारही माध्यमात) तयार होणार्या बातम्या, लेख, स्टोर्या पाहू-वाचू-ऎकू शकतो. बातम्यांच्या विषयांचं सुटसुटीत वर्गीकरण, सतत केलं जाणारं नूतनीकरण, आपल्या मेलवर, मोबाइलवर पाठवले जाणारे न्युज एलर्ट्स असं सगळंच इथे आहे. सर्वसामान्य वृत्तपत्र वाचकाला जे मिळतं त्याहून कितीतरी अधिक आणि मोलाचं गुगल न्युज वाचकाला देतं. भरतच्या आजोबांना हवं असायचं तसं आणि आजोबांसारख्या वाचकांना पत्रकार जसं द्यायचे तसं.
No comments:
Post a Comment