14 December, 2011

मराठी विकिपिडियावर तुमचे स्वागत असो!



माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करण्याची सवय आपल्याकडे बर्‍यापैकी रुळली आहे. ‘गुगल सर्च’ मध्ये आपल्याला हवा असलेला विषय टाईप केला की त्याची माहिती देणारे असंख्य दुवे संगणकाच्या पडद्यावर क्षणात उमटतात. त्यात ‘विकिपिडिया’ अग्रक्रमी असतो. इंटरनेटचा असा वापर माहिती मिळवण्यासाठी करताना लक्षातही येत नाही की ही माहिती तिथे परिश्रमपूर्वक उपलब्ध करून दिली गेली आहे. ती ‘अपौरुषेय’ वगैरे नसते. आपल्याला सहजी मिळत असलेली माहिती विविध वेबसाइट्सवर कुणीतरी नोंदवलेली असते. ती अद्ययावत ठेवण्याचं कामही सतत सुरू असतं. अद्ययावतपणा हेच या माहितीचं बलस्थान आहे. छापील माध्यम आणि इंटरनेट यातला मुख्य फरक हाच आहे.

जे जे आपणासी जे ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करोनी सोडावे, सकलजन” असं संतवचन असलं तरी परंपरा नेमकी उलटी होती. माहितीवर विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती. आणि इतरेजनांना अज्ञानात पिचत ठेवून आपले हितसंबंध सांभाळत बसण्याचं काम पिढ्यान्‍ पिढ्या या वर्गाने केलं.  समाजसुधारकांचे प्रयत्न, शिक्षणाचा प्रसार आणि समाजातल्या तळच्या वर्गात झालेली जागृती यामुळे माहितीच्या मक्तेदारीला धक्के बसू लागले आणि समाजात घुसळण सुरू झाली. गेल्या दशकात इंटरनेट अवतरल्यावर होऊ लागलेला माहितीचा सुसाट प्रसार आणि त्यामुळे होणारी उलथापालथ आपण अनुभवतो आहोतच. भारतात खेड्यातल्या एखाद्या मुलीने वा मुलाने अकल्पित प्रगती करण्यापासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बराक ओबामा विराजमान होण्यापर्यंतच्या सर्व घटना या उलथापालथीतून झालेल्या परिवर्तनाच्या निदर्शक आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा विचार करताना हा सामजिक संदर्भ ठळकपणे लक्षात घ्यावा लागतो.

इंटरनेट हे मुळात माहिती खुलं करणारं माध्यम. त्याही पुढे जाऊन ‘विकिपिडीया’ने तर माहिती नोंदवण्याची प्रक्रियाच मुक्त कली. “Imagine a world in which every single person on the planet is given free access to the sum of all human knowledge. That’s our Commitment!” अखिल मानवसमाजाने निर्माण केलेलं ज्ञान पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाच्या हाताशी सहजी उपलब्ध व्हावं अशी ‘विकिपिडीया’ची प्रतिज्ञा आहे.  माहितीवरची कुणा व्यक्तीची वा समाजाची मालकी मोडीत काढणारा आणि सर्वांनाच माहिती-योगदानाची संधी बहाल करणारा, सर्वांच्याच सहभागातून सतत वाहात राहणारा हा मुक्त प्रवाह.  

जिमी वेल्स (जन्मवर्ष १९६६) या अमेरिकन इंटरनेट उद्योजकाच्या पुढाकाराने २००१ साली ‘विकिपिडीया’ सुरू झाला. २००६ वर्षाच्या टाईम मॅगेझिनने जाहीर केलेल्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये जिमी वेल्सचा समावेश होता. सर्वच वाचकांना लेखन-संपादनस्वातंत्र्य असल्याने कोणीही काहीही लिहू शकेल आणि त्यातून अनर्थ निर्माण होईल अशी बरीच चर्चा ‘विकिपिडीया’च्या निर्मितीनंतर झाली होती. ’नव्या’ला विरोध हे या चर्चेच्या मुळाशी होतं. आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रतिसादाविषयी आडाखा बांधता येत नव्हता. खुद्द जिमी वेल्सला भीती होती की हा प्रयोग पूर्णपणे फसेल. पण झालं अगदी उलटंच! पहिल्या काही दिवसांतच माहितीची नोंद लोक जबाबदारीने करताहेत असं दिसलं. आणि लोकांच्या नोंदी, त्यावरचा प्रतिसाद यातून स्वनियंत्रणाची प्रक्रियाही विकसित होत गेली. यातूनच पुढे ‘विकिपिडीया’ची नियमावली तयार होत गेली. खोडसाळपणा अजिबात होत नाही असं नाही. पण ‘विकिपिडिया’च्या उपयुक्ततेच्या तुलनेत त्याचं प्रमाण नगण्य असतं.
‘विकिपिडीया’ची गंमत अशी आहे की काही पानांचा अपवाद वगळता तिथल्या नोंदी, माहिती, लेखनाची शैली, नियमावली यापैकी कशालाही पूर्णविराम नाहीच. काळानुसार बदलणारा घटनाक्रम वा वाढत्या वाचक-लेखक-संपादक वर्गाकडे असणारी संदर्भसंपन्नता यातून आवर्तनं सुरू राहातात. माहिती अद्ययावत होत राहाते. विकिपिडीयाच्या या विकासक्रमात इंग्रजी भाषेची मक्तेदारी ओलांडून तो देशोदेशींच्या अन्य भाषांच्या अंगणातही शिरला. युरोपमधल्या लयाला जात चाललेल्या लॅटिन भाषेत विकिपिडीया आहे आणि आशिया खंडातल्या कझाकिस्तान (पूर्वीच्या सोविएत रशियातील एक देश) देशाच्या कझाक (kazakh) भाषेतही आहे. यंदापासून सुरू केलेलं ‘सर्वोत्तम जागतिक विकिपिडीयन’ हे पारितोषिक एका कझाकभाषकाला मिळालं आहे.
मराठी विकिपिडीया १ मे २००३ ला सुरू झाला. जगातल्या प्रत्येक भाषेतलं ज्ञान मराठीत आणि मराठीतलं ज्ञान जगातल्या प्रत्येक भाषेत मुक्तपणे उपलब्ध व्हावं हा मराठी विकिपिडीयाचा उद्देश आहे. हे विचार आणि त्यासाठीचे प्रयत्न खूप उदात्त आहेत यात शंकाच नाही. मुळात कोणत्याही माहितीवर एखाद्या व्यक्तीची / समूहाची मालकी असू नये आणि माहितीचं भंडार प्रत्येकासाठी खुलं असावं असं लोकशाहीचं तत्त्व या विचारामागे आहे. आणि नव्या तंत्रज्ञानामुळे ही लोकशाही वास्तवात यायला सुरूवातही झाली आहे. फक्त माहितीकोशच नाही; तर आता Wikibhasha / विकीभाषा असा लोकांचा शब्दकोशही सुरू झाला आहे. आपण सर्वांनी या सर्व माध्यमांमध्ये योगदान केलं पाहिजे.
भारतातलं पहिलं विकिसंमेलन दि १८ ते २० नोव्हेंबर या काळात चर्चगेट इथल्या मुंबई विद्यापीठ परिसरात भरलं होतं. भारतीय भाषांमधल्या, खास करून मराठीतल्या विकिपिडीयाचा विकास हा या संमेलनाचा मुख्य विषय होता. संमेलनाचं नियोजन विकिपिडीयन्स स्वयंसेवकांनी केलं होतं. Paid services जवळपास नव्हत्याच. त्यामुळे एखाद्या साध्याशा NGO च्या कार्यक्रमासारखं वातावरण होतं. उत्साही तरुण-तरुणींची संख्या भरपूर होती. जिमी वेल्स यांनी उद्‍घाटनपर भाषणात भारतीय भाषांमधून सुरू झालेल्या ‘विकिपिडीया’ला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचं आणि त्यामुळे भाषक विकिपिडीयांचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं सांगितलं. मराठीसह तेलुगु, मल्याळम्‍, तमीळ, बंगाली आणि गुजराती भाषांमधल्या ‘विकिपिडीया’च्या विकासाविषयी सत्रं आयोजली होती. ‘विकिपिडीया’ वापरायचा कसा, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्याची कशी मदत होऊ शकते, विद्यार्थी आणि विविध व्यावसायिक त्यात योगदान कसं देऊ शकतात, स्त्रियांचा सहभाग कसा वाढवता येईल अशा अनेक मुद्यांची चर्चा तिथे झाली.
सर्व वक्त्यांनी अगदी मोजक्या वेळात विषयाची मांडणी केली. त्यांची Power point presentations सुद्धा अगदी साधी आणि नेमकी-मुद्देसूद होती. त्यामुळे प्रश्न विचारायला श्रोत्यांना पुरेसा वेळ मिळू शकला. विकीपिडीयाचं महत्व, त्याचा विकास, भारतीय भाषा आणि  विकीपिडिया, त्यावर लिहिणे (content writing) आणि त्याची तांत्रिक बाजू अशी विविध विषयांवर माहिती तिथे मिळाली.
विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असल्यामुळे सर्वसमावेशक पण तरिही तटस्थ (Neutral Point of View) दृष्टिकोनातून संदर्भासहीत लेखन करणं हे  ‘विकिपिडीया’चं सूत्र आहे. कोणतेही विषय लिहिताना सर्वसाधारणपणे कसे हाताळावेत किंवा काय काळजी घ्यावी याची माहिती ‘विकिपिडीया’तच उपलब्ध आहे. वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक यांची स्वतःची एक लेखनशैली (style book) असते. विकिपिडीया’ची लेखनशैली  अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु विकिपिडीया’त काही नमुन्याचे लेख दिले आहेत. विकिपिडीया’ मुखपृष्ठ सदरातील लेखांची मांडणीसुद्धा यासाठी मार्गदर्शक ठरू शकते. ह्या लेखांची मांडणी जरी अंतिम नसली तरी अनेकांच्या सहभागातून ती तशी बनली आहे. लेख लिहिताना इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द पारिभाषिक संज्ञा या लेखामध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. लेखकांच्या सहभागाने यात अधिकाधिक सुधारणा होत राहाणं सुरूच असतं.
मराठी विकीपिडिया विकसित व्हावा म्हणून चिकाटीने धडपडणारी टीम तिथे भेटली. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्यतीत केल्या जाणार्‍या वेळापैकी १०% वेळ तरी विकीपिडिय़ा विकसित करण्यासाठी प्रत्येकाने द्यावा अशी अपेक्षा तिथे व्यक्त केली गेली. मराठीतून लिहिणार्‍यांची संख्या वाढावी यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांना मराठीप्रेमींनी, मराठी माध्यमांनी साथ द्यावी अशी विनंतीही केली गेली. आज इंटरनेटवर ‘गुगल’खालोखाल वापरली जाणारी साईट ‘विकिपिडीया’ची आहे. जगभरातल्या २८२ भाषांमध्ये विकिपिडीया सुरू आहे. मराठी भाषा पुढील काळात जगवायची असेल तर ती जास्तीत जास्त प्रमाणात वेब माध्यमात वापरली गेली पाहिजे; हे तर खरंच. वेबवर मराठी आशयनिर्मिती (content creation) परिश्रमपूर्वक करावीच लागेल. विकिपिडीया हा ना-नफा तत्त्वावर चालणारा उपक्रम आहे. कुठली एक बाजू न घेता तटस्थ भूमिकेतून माहिती नोंदवणं, माहितीच्या तथ्यांशाशी प्रामाणिक राहाणं हा या उपक्रमाचा गाभा आहे. या गाभ्याला बाधा येऊ नये, या सूत्राच्या आड कोणतेही हितसंबंध येऊ नयेत म्हणून व्यापारी कंपन्यांकडून देणग्या घ्यायच्या नाहीत असं विकिपिडीयाचं धोरण आहे. सर्वसामान्य व्यक्तींच्या छोट्या रकमेच्या (अगदी २५० रुपयांपासून) देणग्यांवर हे काम चालतं. तसं आवाहन मुखपृष्ठावरच वाचायला मिळतं. तेव्हा ‘विकिपिडीया’च्या विकासासाठी लेखन-संपादनासह आर्थिक योगदान करण्याचीही गरज आहे.
इथे हवे आहेत लिहिणारे, संपादन करू शकणारे, व्याकरणाच्या चुका दुरुस्त करू शकणारे, नवे शब्द निर्माण करू शकणारे, विकिपिडीयाचा प्रसार करणारे लोक. प्रत्येकाला आपल्या आवडीच्या विषयावर लिहिण्याची मुभा आहे. विशिष्ट विषयात गती असणारे अनेकजण गट म्हणून एकत्र येऊन त्या त्या विषयाची समग्र माहिती लिहिण्याचंही काम करू शकतात. ‘विकिपिडीया’त लेखन-संपादन करणारे दीर्घ काळ टिकून राहात नाहीत असा सर्वच भाषांच्या बाबतीतला अनुभव आहे. याची काही कारणं सापडतात. फेसबुकसारख्या साइट्सवर स्वैर लिहिण्याची सवय झालेली असते. कारण स्वतःच्या भावनाआविष्करणाची, विचारप्रकटीकरणाची ती जागा असते. याउलट विकिपिडीयाला शुद्ध माहितीची गरज असते. तिथे शेरेबाजीला मुळीच थारा नाही, भाष्य, विश्लेषण याला फारसा वाव नाही. माहितीचे संदर्भही द्यावे लागतात. त्यामुळे शिस्तीचं बंधन येतं. आपण लिहिलेल्या माहितीचं संपादन अन्य कुणी करू शकतं. त्यामुळे आपल्या माहितीवर आपली ‘मालकी’ राहात नाही. मराठीच्या आणि अन्य भारतीय भाषांच्या बाबतीत इच्छा असली तरी फॉन्टची अडचण येते. म्हणूनच ‘विकिपिडीया’त योगदान करणारे ९५ टक्के भारतीय आपापल्या मातृभाषेऎवजी इंग्रजी विकिपिडीयासाठी लिहीतात. ही झाली व्यवहारिक-तांत्रिक कारणं. याखेरीज आणखी काही प्रश्न आहेत.
आपण खरोखरच आपल्या भाषेवर प्रेम करतो का? मराठी भाषा टिकवण्याची आपली खरोखर इच्छा आहे का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतील तर पुढचा प्रश्न उपस्थित होतो. आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची, त्यासाठी जबाबदारी घेण्याची आणि मराठी भाषक म्हणून एकत्र येण्याची आपली तयारी आहे का?  मराठी भाषेला महत्त्व आणि अधिक वेळ देणारी एवढी महत्त्वाची विकिपिडीया परिषद मुंबईत झाली. पण तिथे मराठी प्रकाशक, प्राध्यापक-विद्यार्थी, शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि माध्यमातले लोक यांची उपस्थिती अत्यल्प होती. मराठी हा राजकारणाचा मुद्दा करणार्‍या राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही कुठे दिसले नाहीत. अन्य भाषांची माहिती घेताना जाणवलं की त्या त्या राज्यात, विशेषतः दक्षिणेत आणि बंगालमध्ये वेबमाध्यमात भाषा वापरण्यासाठी, आशयनिर्मितीसाठी भरपूर प्रयत्न होत आहेत.  मराठीबाबतचं वास्तव मात्र क्लेशदायक आहे.
विकिपिडीया : आकड्यांमधून उलगडणारं वास्तव
भाषा
संपादकांची संख्या
लेखांची संख्या
इंग्रजी
३५ हजार
३० लाख
फ्रेंच
५ हजार
११ लाख
हिंदी
५६
१ लाख
मल्याळम्‍
८५
२१ हजार
तमीळ
८३
४१ हजार
तेलुगु
३२
४९ हजार
बंगाली
४२
२२ हजार
गुजराती
२१ हजार
पंजाबी
२० हजार
मराठी
३१
३४ हजार