यज्ञ नही,
यह धंदा है; धर्म के नाम
पे सौदा है
!
पश्चिम द्रुतगती मार्गावर गोरेगावजवळ सुप्रसिद्ध ओबेरॉय मॉल आहे. या मॉलच्या
समोर शिवधाम संकुल नावाची वसाहत आहे. पूर्व गोरेगावातला हा परिसर दिंडोशी नावाने
ओळखला जातो. मुंबईतली उपनगरं जशी वाढत गेली तशा मध्यमवर्गीयांना सामावून घेणार्या
अशा अनेक वसाहती तयार होत गेल्या. गोरेगाववर पार्ले वा डोंबिवलीसारखी ठळक मराठी
मुद्रा आधीही नव्हती. आता तर अख्ख्या मुंबईतच विविध भाषा बोलणार्यांची
सरमिसळ झाली आहे. आणि राजकारण्यांनी फाटाफूट
करण्याचा कितीही प्रयत्न केला; तरी विविध भाषक, धर्मीय मुंबईकर चांगल्यापैकी
गुण्यागोविंदाने राहात असतात. शेजारधर्म पाळतात. एकमेकांच्या सण-उत्सवात आनंदाने
सामील होतात.
अन्य वसाहतींप्रमाणेच शिवधाम संकुलातही मराठी, गुजराती उत्तरप्रदेशी, पंजाबी,
दाक्षिणात्य असे सगळेच राहातात. खरा मुंबईकर विनाकारण दुसरीकडे नाक खुपसत नाही.
तसंच एरवी या वसाहतीत लक्ष घालण्याचं काही कारण नव्हतं. पण अलिकडे इथल्या एका
स्थानिक प्रकरणामुळे ही वसाहत चर्चेत आली. इथल्या रहिवाशांचे चेहरे ठळक झाले.
त्यांच्या कृती गडद झाल्या.
प्रकरण आधी समजून घेऊ. १९ इमारतींच्या या संकुलात सुमारे ६०० घरं, दोन हजाराची वस्ती. मुंबईतल्या वसाहतींमध्ये
अलिकडे अशी मोकळी जागा असत नाही. पण शिवधाम संकुलात कुणीही हेवा करावा अशा मोकळ्या
जागा इमारतींच्या भोवताली आणि मध्यवर्ती मोठ्या मैदानाच्या रूपाने मिळालेल्या. मैदानात
संकुलाचा सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे कार्यक्रम होत असतात. त्यात
रहिवाशांचा चांगला सहभागही असतो. प्रकरण सुरू झालं ते या १९ इमारतींनी वेढलेल्या
मैदानात कुणी एक ‘मां वरदायिनी समिती’ सहस्त्रचंडी-नवकुंडी या नऊ दिवस चालणार्या
महायज्ञाचं आयोजन करू लागली; तेव्हापासून. गेली आठ वर्षं होणारा हा यज्ञ यंदाच्या वर्षी
रहिवाशांच्या संघटित विरोधामुळे रोखला गेला. म्हणूनच विषय गाजला.
यज्ञाचे आयोजक जयकांत शुक्ला हे संकुलरहिवासी आहेत. ते कॉंग्रेसचे नेता,
निवडणूक तिकिटाचे इच्छुक, संजय निरूपम, दिंडोशीचे विद्यमान खासदार गुरूदास कामत,
माजी खासदार गोविंदा यांच्याशी जवळीक असलेले वगैरे बोललं जातं. ते मां वरदायिनी देवीचे भक्तदेखील आहेत.
त्यामुळे त्यांच्या घरी पक्ष-कार्यकर्ते आणि भक्तगण या दोहोंचा राबता असतो आणि
साधुमंडळींचंही येणं-जाणं त्यांच्याकडे चालतं; असं रहिवासी सांगतात. शुक्ला
यांच्या पत्नीवरही देवीचा वरदहस्त आहे आणि त्यांच्या रूपाने देवीचा कृपाप्रसाद
मागायला आठवड्यातल्या विशिष्ट दिवशी भाविक महिलांचं येणंही त्यांच्या घरी चालतं;
असं इथे बोललं जातं.
संकुलातलं मैदान ‘म्हाडा’च्या मालकीचं आहे. या मैदानात काही कार्यक्रम आयोजित
करायचा असल्यास म्हाडाकडे नियमानुसार शुल्क भरून रीतसर परवानगी घ्यावी लागते.
परवानगी देताना म्हाडा काही अटी घालते. मैदानात कार्यक्रम
आयोजताना स्थानिक रहिवासी संघाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणं आणि परिसरातील
रहिवाशांना त्रास होणार नाही; याची काळजी घेणं या मुख्य आवश्यक अटी आहेत. २००४-०५
पासून श्री शुक्ला यांच्या मां वरदायिनी समितीतर्फे संकुलातील मैदानात सहस्त्रचंडी
नवकुंडी यज्ञ भरवायला सुरूवात झाली. या यज्ञासाठी नेपथ्यरचनाही डोळ्यात भरण्याजोगी
केली होती. गवताने आच्छादलेला मांडव, हवनासाठी सज्ज केलेली सुशोभित नऊ कुंड,
त्याभोवती तयार केलेला प्रदक्षिणेचा मार्ग, साधुंची लगबग आणि मंत्रपठण हे सारं
पुराणकालीन ऋषी-मुनींच्या वावराची आठवण करून देणारं. आधीच आपण सारे पुराणकाळात
रमणारे. त्यात समोर देखावाच आपल्याला थेट त्या काळात घेऊन जाणारा. गणपतीसारखे
मराठी उत्सव बघायची सवय झालेल्या रहिवाशांना हे सगळं भावलं. त्यात यजमान आपल्याच
संकुलाचे रहिवासी. यज्ञआयोजनातल्या नवेपणापायी सततच्या आवाजाचा त्रास, हवनात तूप
जाळलं गेल्याने होणारा धूर, दर्शनासाठी बाहेरून येणार्या गर्दीच्या झुंडी याकडे
रहिवाशांनी साफ दुर्लक्ष केलं. वाटलं, वर्षातून एकदाच तर आहे हा कार्यक्रम. काय
मोठासा त्रास? कुतूहलापोटी संकुलातले लोक दर्शनालाही गेले.
पुढे या वार्षिक यज्ञसोहळ्याची वहिवाटच होऊन गेली. नव्याची नवलाई संपली आणि दोन-तीन
वर्षं उलटल्यावर लोकांना देखाव्यापलीकडच्या गोष्टी दिसू आणि कळू लागल्या.
मैदानालगतच्या इमारतींमधले रहिवासी उद्वेगाने सांगू लागतात – “आयोजक रीतसर परवानगी
घेत होते; पण म्हाडाच्या शर्तींचा सपशेल भंग करत होते. यज्ञ सुरू होण्याआधीपासूनच
त्याचा त्रास सुरू व्हायचा. बांबू, गवत येऊन पडायचं. ठोकाठोकी सुरू व्हायची. सगळा
त्रास आम्ही रहिवाशांनी सहन करायचा. प्रत्यक्ष यज्ञात
आमचा सहभाग नगण्य आणि बाहेरून हजारोंच्या संख्येने येणारी, कुणाचंच नियंत्रण
नसणारी गर्दी. शेकडो पुरोहित-कार्यकर्ते-भक्तगणांचा मुक्काम दहा-बारा
दिवस मैदानातच पडलेला आणि यज्ञविधीसोबतच
त्यांचे शारीरिक विधीही मैदानातच. करणार्यांना नाही; तरी बघावी लागणार्यांना,
विशेषतः महिलांना लाज आणणारी ती ओंगळवाणी दृष्यं. मुलांच्या ऎन परीक्षाकाळात
सकाळपासून रात्रीपर्यंत ध्वनिक्षेपकावरून ‘स्वाहा....स्वाहा’चं कर्कश
मंत्रोच्चारण, यज्ञकुंडामधून शेकडो किलो तूप, धान्य जाळणं, सकाळ-संध्याकाळच्या
मेजवान्यांनंतरची उष्टी-खरकटी इतस्तत: फेकणं, यज्ञसमाप्तीनंतर स्टायरोफोमच्या
थाळ्या, यज्ञकुंडांच्या ‘पवित्र’ विटा मैदानात टाकून देणं हेही असायचंच.”
श्यामलाताई, मीनाताई या इथल्या ज्येष्ठ महिला सांगतात, “या यज्ञाचं
व्यापारी, बटबटीत स्वरूप हळुहळु आमच्या लक्षात येऊ लागलं. ‘दोन हस्तक-तिसरं मस्तक’
एवढं देवाला पुरतं. मनीचा भाव महत्त्वाचा. पण इथे भक्तांना देवीच्या नावे देणग्या,
वस्तू, सोन्याचे दागिने इ
साठी केली जाणारी जोरदार आवाहनं आणि संतान मिलेगी, नौकरी मिलेगी, फ्लॅट मिलेगा अशी
भक्तांना दिली जाणारी प्रलोभनं ऎकल्यावर आम्हाला लख्खपणे जाणवलं; की या यज्ञाचा मूळ हेतू परमार्थ नव्हे स्वार्थ आहे. याला धर्म म्हणावं; की अधर्म? हे पुण्य की पाप? यात
सामाजिक कल्याण आहे; की वैयक्तिक लाभ? ‘मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव; देव
अशानं भेटायचा न्हाई वो...देव बाजारचा भाजीपाला न्हाई वो’ या संत तुकडोजी
महाराजांच्या भजनाचं दृष्य रूपच मैदानात दिसत होतं.”
एकदा काही श्रद्धाळू आज्या हवनासाठी घरी बनवलेलं तूप घेऊन गेल्या; तर त्यांना
हजार रुपयाची पावती फाडल्यावरच प्रवेश मिळेल; असं बजावण्यात आलं. हळुहळु रहिवासी
या यज्ञाबद्दल प्रश्न उपस्थित करू लागले. वैयक्तिक पातळीवर विरोध करू लागले. हा
विरोध उत्तरप्रदेशी विरुद्ध मराठी असा नव्हता. कारण यज्ञाच्या विरोधकांमध्ये अनेक
बिगर मराठी आहेत आणि समर्थकांमध्ये काही मराठीही आहेत. संकुलात फेरफटका मारताना,
लोकांशी बोलताना समर्थकांची समीकरणं लक्षात येतात. इथे राहाणारे काही राजकीय
कार्यकर्ते, जे मागल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला उभे राहिले होते; ते यज्ञआयोजकांचं
आक्रमकपणे समर्थन करतात. मात्र याबद्दल रहिवासी आश्चर्य व्यक्त करतात. हे
कार्यकर्ते निवडणुकीत अपयशी ठरले असले; तरी पुढच्या निवडणुकीत मतं हवी असल्यास
त्यांनी यज्ञआयोजकांऎवजी रहिवाशांची बाजू घ्यायला हवी होती; अशी बहुसंख्य
रहिवाशांची भावना आहे. संकुलात काही जुन्याजाणत्या लोकांनी स्थापन केलेलं शिवधाम
सेवा मंडळ आहे. वसाहतीतील गणेशमंदिराचं व्यवस्थापन, सार्वजनिक गणेशोत्सव,
नवरात्रोत्सव इ मध्ये मंडळाचा पुढाकार असतो. मात्र हे मंडळदेखील यज्ञप्रकरणात
रहिवाशांच्या बाजूने उभं राहिलं नाही; अशी खंत इथले रहिवासी बोलून दाखवतात. मात्र
नुकतंच गठित झालेल्या इथल्या सर्व सोसायट्यांच्या फेडरेशनने मात्र रहिवाशांच्या
भावना जाणल्या आणि म्हाडापर्यंत पोचवल्या. फेडरेशनचे अध्यक्ष लेले सर आणि एक सदस्य
रामदास टाके सांगतात, “फेडरेशन हे संकुलातल्या सर्व सोसायट्यांचं प्रतिनिधित्व
करतं. त्यामुळे त्यांच्या व्यथा-वेदना, गार्हाणी-तक्रारी याकडे लक्ष देणं हे आमचं
कर्तव्यच आहे.”
या प्रकरणात रहिवाशांच्या संतापाला सनदशीर आंदोलनाचं योग्य वळण दिलं; ते
शिवधाम संकुल नागरिक मंच या संकुलातल्या नागरिकांच्या स्वयंसेवी गटाने. भोवतालच्या
घडामोडींविषयी उदासीन असणारे, आपण आणि आपलं कुटुंब एवढ्यापुरतंच बघणारे लोक अनेक
गृहनिर्माण संस्थांत असतात. या पार्श्वभूमीवर या नागरिक मंचाचं काम उठून
दिसतं. शिवधाम
संकुल नागरिक मंचाचे सचिव अरविंद निगळे सांगतात, “कोणत्याही
गृहनिर्माण संस्थांमध्ये मूठभर व्यक्ती काम करतात. आणि अन्य सद्स्यांना ते काय
करतात याच्याशी काही देणं-घेणंही नसतं. यातूनच नको ते हितसंबंध तयात होतात. काही
ठराविक लोकांची दादागिरी सुरू होते. आणि अन्य लोक ती मुकाट्याने सहन करतात. आपल्यासारख्या सरळमार्गी लोकांना आपल्या प्राथमिक गरजांवर आक्रमण करणार्या
बर्याच गोष्टी आपल्या इच्छेविरुद्ध सहन कराव्या लागतात. याचं मुख्य कारण आपल्यातील सजगपणाचा अभाव आणि आपलं औदासिन्य. मग
विषय असो रस्त्यावरील घाणीचा वा दिवाबत्तीचा. आम्ही लोकांचं ऒदासिन्य जावं यासाठी प्रयत्न
करतो. आम्ही कामाला सुरूवात केली संकुलातील रस्त्यांच्या सफाईच्या कामापासून.”
मंचाच्या अध्यक्षा अरूणाताई सांगतात, “सफाईच्या कामासाठी आम्ही
घरोघरी बोलायला गेलो; तेव्हा यज्ञ आणि इतर त्रासदायक बाबींविषयी रहिवासी आमच्याशी
बोलू लागले. मग आम्हालाही लोकांचा हा त्रास दूर करण्यासाठी काही करावंसं वाटू
लागलं. कोणताही प्रश्न सोडवण्याची पहिली पायरी संबंधितांशी संवाद ही असते. तसा
संवाद साधण्याचा प्रयत्नही केला. पण यश आलं नाही. रहिवाशांच्या
विनंत्यांना यज्ञआयोजकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जराही भीक घातली नाही. या सर्वांनी
यज्ञासाठी संकुलातील लोकांना गृहीत धरलं होतं. आणि पुढे वेठीसही धरलं. या
त्रासाच्या बळी स्त्रियाच अधिक होत्या. म्हणून आम्ही स्त्रियांशी बोलू लागलो. खरं
तर देव, धर्म या नाजुक बाबी असतात. अलिकडे देव, महाराज, बुवा-बाबा यांचं प्रस्थ
वाढत चाललं आहे. आणि लोक मनातून नाराज असले; तरी उघडपणे विरोध करायला घाबरतात. पण
आम्हाला जाणवलं; की संकुलातल्या स्त्रिया देव-धर्मातला खरे-खोटेपणा ओळखण्याइतक्या
चतुर आणि परिपक्व आहेत. म्हणूनच संधी मिळताच त्या वेगाने संघटित झाल्या.”
मृणाल रेडिज, मनिषा मोरे, सुनिता जोगल, वसुधा तळाशीकर अशा
इथे आघाडीवर असलेल्या अनेक जणी स्वतः श्रद्धाळू आहेत, आपापल्या परीने देवाधर्माचं
करणार्या आहेत. मां वरदायिनी समितीच्या यज्ञाने त्यांची आणि त्यांच्यासारख्या
अन्य श्रद्धावान भक्तगणांची फसवणूक होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्या यज्ञाविरोधात
उभ्या राहिल्या. त्यांच्या श्रद्धेनेच त्यांना ’अधर्मा’विरोधी लढण्याचं बळ दिलं;
असं म्हटलं पाहिजे. रहिवाशांची बाजू ऎकून घेण्यासाठी म्हाडाचे अधिकारी मैदानात आले
होते. त्या सभेत महिला मोठ्या संख्येने जमल्या होत्या. आणि सगळ्यांनाच बोलायचं
होतं. मृणाल रेडिज यांना बोलण्याची संधी मिळताच त्यांनी धीटपणे आपलं म्हणणं
मांडलं. विरोधकांनी त्यांच्या बोलण्यात अडथळे आणले, सभा उधळण्याचा प्रयत्न केला;
पण त्या मागे हटल्या नाहीत. जाहीर सभेत त्या पहिल्यांदाच बोलत होत्या हे सांगूनही
खरं वाटलं नाही असा त्यांचा आत्मविश्वास होता. निर्मल दुग्गल, उर्मिला शर्मा,
नवनीता परमार, रीटा सेनगुप्ता अशा अमराठी महिलाही या कामात पुढे राहिल्या.
त्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी असं या वादाचं स्वरूप राहिलं नाही. याचं श्रेय
महिलांच्या एकजुटीला.
सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात सर्वपरिचित असलेल्या लेखिका मेधा
कुळकर्णी इथल्या रहिवासी. त्या म्हणाल्या, “गडचिरोली जिल्ह्यातल्या मेंढालेखा
गावाच्या आदिवासींची ’दिल्ली-मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावात आम्ही सरकार’ या
घोषणेचं आपल्याला कौतुक वाटतं. आमच्या शिवधाम संकुलसारख्या वसाहती ही मुंबईतली
छोटी-मोठी गावंच आहेत. वसाहतीबाहेरच्या गोष्टी सोडून देऊ. पण वसाहतीच्या आतल्या
वातावरणावर तरी आमचं नियंत्रण असायला हवं. त्यासाठी संवाद, संघटन आणि कृती या
पायर्या आहेत. लोकांना त्रास देणार्या यज्ञाला रोखण्यासाठी आमच्या संकुलातल्या
स्त्रियांनी एकजूट दाखवणं ही एक चांगली सुरूवात आहे. संकुलात चांगलं वातावरण
निर्माण करण्यासाठी सर्व स्त्रिया
पुरुषांच्या साथीने काम करतील अशी आशा निर्माण झाली आहे, हे नक्कीच.”
No comments:
Post a Comment