एक बड़ा राजकीय पुढारी,
त्याचे एका तरूणीशी जुळलेले बिनलग्नाचे संबंध, त्यातून जन्मलेल्या मुलाने मोठे
झाल्यावर पित्यापाशी नात्याचा अधिकार मागणे, पित्याने तो नाकारणे, अखेरीस
बाप-मुलात संघर्ष होऊन मुलाचा विजय होणे - ही एखाद्या चित्रपटाची कहाणी शोभावी! पण
ही खरीखुरी घटना आहे. गेल्या आठवड्यातल्या या बातमीने आपले जरा जास्तच लक्ष
वेधून घेतले.
श्री नारायण दत्त तिवारी (वय ८६) यांच्यावर पितृत्वासंबंधात सुरू असलेल्या
खटल्याचा निकाल गेल्या शुक्रवारी लागला. तिवारी यांच्या DNA (deoxyribonucleic acid) चाचणीचा अहवाल दिल्ली उच्च न्यायालयाने जाहीर केला.
त्यानुसार रोहित या युवकाचे तिवारी हे जैविक पिता असल्याचे उघड झाले. रोहितने हा
दावा न्यायालयात २००८मध्ये दाखल केला होता. अनेक कारणांसाठी हा निकाल लक्षवेधी
ठरतो. सर्वात पहिले कारण तिवारींचे राजकीय वजन. नारायण दत्त तिवारी हे कॉंग्रेसचे
ज्येष्ठ नेते. एके काळचे पंतप्राधानपदाचे आकांक्षी, केंद्रात परराष्ट्रमंत्रीपद, उत्तरप्रदेशचे
तीनदा, उत्तराखंडचे एकदा मुख्यमंत्रीपद आणि आंध्र प्रदेशचे राज्यपालपद भूषवलेले! अशा
तालेवार व्यक्तीला न्यायालयात खेचणारा रोहित तसा सामान्य माणूस. पण त्याने
निर्भयपणे, चिवटपणे न्यायालयीन लढा दिला आणि तिवारींना उघडे पाडले.
या प्रकरणाचा तपशील असा – तिवारी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांचे कॉंग्रेसचेच
एक मंत्री शेरसिंग यांची कन्या उज्ज्वला हिच्याशी संबंध जुळले. या संबंधातून रोहितचा
जन्म झाला. पुढे अनेक वर्षे तिवारींनी उज्ज्वलाच्या घरी जाणे-येणे, लहानग्या रोहितचे
वाढदिवस एकत्र साजरे करणे यातून हे संबंध सांभाळले. कालांतराने संबंध कमी होत
गेले. रोहितला समज आल्यावर त्याने आपल्या आईला तिवारींशी असलेल्या नात्याची
विचारणा केली. तिने ते त्याचे वडील असल्याचे मोकळेपणे सांगितले. हे कळल्यावर रोहित
याने तिवारींच्या घरी जाऊन नात्याचा अधिकार प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू
केले. रोहितला सत्य कळले आहे; हे लक्षात येताच तिवारींनी त्याला झिडकारायला
सुरूवात केली. तेव्हा तो १६ वर्षांचा होता. (आता तो ३२ वर्षांचा आहे) आपल्या
बापापाशी जाण्याच्या प्रत्येक प्रयत्नात त्याच्या वाट्याला अपमान, तिरस्कार आला.
निरुपायाने त्याने तिवारी यांच्या पितृत्वासंबंधात याचिका दाखल केली. २०१०
साली दिल्ली उच्च न्यायालयाने तिवारी यांना नोटिस बजावली. तिवारी सत्य नाकारतच होते.
पुढे न्यायालयाने DNA चाचणीचा आदेश दिला. या
चाचणीतून माणसाच्या जैविक वैशिष्ट्यांचा आराखडा उपलब्ध होतो. माणसाच्या शरीराच्या
पेशीत हा DNA असतो. गर्भधारणा होते;
तेव्हा गर्भाच्या पेशीत माता आणि पिता यांच्या DNAचा प्रत्येकी निम्मा हिस्सा येत असतो. त्यामुळेच या चाचणीद्वारे जैविक
मातृत्व-पितृत्व सिद्ध करणे शक्य होते.
तिवारी यांनी प्रथम न्यायालयाने दिलेला DNA चाचणीचा आदेश धुडकावण्याचा प्रयत्न केला. याचिकेतून
सुटका करून घेण्यासाठी स्वतःचे राजकीय वज़न खर्ची घातले. रोहित आणि त्याची आई
उज्ज्वला यांनाही थांबवण्याचा प्रयत्न साम-दंड-भेद वापरून केला. पण रोहित हटला
नाही. आईची साथ होतीच. अखेरीस न्यायालयाने DNA चाचणी जबदरस्तीने करण्यात येईल असे फर्मान काढल्याने तिवारींचा नाईलाज झाला.
या चाचणीच्या निष्कर्षाची खात्री असल्यानेच भीतीपोटी तिवारींनी तो गुप्त ठेवला
जावा अशी गळ सर्वोच्च न्यायालयाला घातली. ही मागणीही फेटाळली गेली. अखेरीस DNA चाचणीतून तिवारी रोहितचे बाप असल्याचे सिद्ध झाले आणि
ते न्यायालयाने जाहीरच करून टाकले.
हे जाहीर झाल्यावर रोहित याने पत्रकारांना सांगितले;
की त्याला न्याय मिळाला आहे. अनेक वर्षे त्याने सोसलेल्या अपमानाची, उपेक्षेची
थोडी तरी भरपाई यामुळे होईल. रोहितने आपल्या आईचे, ती या प्रकरणात जाहीरपणे भूमिका
घेऊन उभी राहिल्याबद्दल कौतुकही केले. रोहितची आई उज्ज्वला यांनी सांगितले की जे
सत्य होते; ते न्यायालयात सिद्ध झाल्याने आम्हाला सर्व काही मिळाले. तिवारी यांनी
एक पत्रक काढून जाहीर केले; की ही त्यांची खाजगी बाब असून काही हितशत्रूंनी
त्यांची बदनामी करण्यासाठी हे सर्व कारस्थान रचले.
राजकारणातून येणार्या सत्तेचा वापर, नातेसंबंध
निभावण्याबाबतचा स्त्री-पुरुषांचा दृष्टिकोन, बाप नसलेल्या मुलाची, पुरुषाशी
लग्नाबाहेरचे संबंध ठेवणार्या स्त्रीची समाजातली पत, कायदे, वैद्यकशास्त्र,
प्रसारमाध्यमे अशा अनेक अनेक बाजूंनी या प्रकरणाकडे पाहाता येते.
या प्रकरणात तसे नवे काहीच नाही. सतेचा वापर करून
पुरूषांनी स्त्रियांना वश करून घेणे पूर्वापार चालत आले आहे. विवाहित पुरूषांनी
दुसरा घरोबा करणे, अनेक लग्ने करणे किंवा लग्न न करताच लग्न केल्याप्रमाणे राहाणे
हेही चालत आले आहेच. असे करणार्या राजकारण, उद्योग, साहित्य, कलाक्षेत्रात
नावाजलेल्या अनेक व्यक्ती आपल्याला माहीत असतात. प्रकरण सार्वजनिक होते; तेव्हा
चर्चा सुरू होते. अशा प्रकरणाची चर्चा करताना चांगले-वाईट, नैतिक-अनैतिक यात जाण्यात
अर्थ नसतो. कारण या भूमिका व्यक्तीसापेक्ष असतात. मात्र व्यापक सामाजिक संदर्भात
हे प्रकरण पाहिले पाहिजे.
बड़ा नेता असूनही तिवारींना न्यायालयाचे आदेश पाळावे
लागले. कायद्यापुढे सर्व समान या तत्त्वावरचा विश्वास यामुळे पक्का झाला. सामान्य
लोकांसाठी हे दिलासादायक आहे. तिवारींसारखे व्यवहार करणार्यांना यामुळे जरब बसली;
तर ती आणखी मोठी गोष्ट ठरेल. अन्यथा आज सत्ताबळाने माजलेल्यांना वठणीवर कोण आणि
कसे आणणार?
तिवारींच्या बरोबरीने रोहितची आई उज्ज्वला हीसुद्धा
या नातेसंबंधांना जबाबदार होतीच. स्री-पुरूष या दोघांच्याही इच्छेने जेव्हा संबंध
प्रस्थापित होतात; तेव्हा दोघांपेकी एकाला झुकते माप देण्याची गरज नसते. परंतु असे
सबंध जेव्हा बिघडतात, तुटतात; तेव्हा पुरूष पटकन नामानिराळा होतो. त्याच्या
सामाजिक प्रतिष्ठेवर ओरखडाही उमटत नाही. आणि संबंधित स्त्रीला मात्र गुन्हेगार
ठरवले जाते. बर्याच प्रकरणांत, अगदी लग्नाच्या संबंधांमध्येही दिसते की अपत्याची
जबाबदारी पुरूष सहजच झटकून टाकतो. आणि स्त्री मात्र तिचे आईपण सर्व प्रतिकूलतेवर
मात करत निभावून नेते. उज्ज्वलाने सामाजिक प्रतिष्ठेची तमा न बाळगता जाहीर भूमिका
घेणे, उघडपणे रोहितला साथ देणे हे धाडसाचेच म्हणावे लागेल.
एकट्या पुरूषाला समाज विनासायास सामावून घेतो. एकट्या
स्त्रीला स्वीकारले जात नाही. त्यातही एकट्या स्त्रीच्या पदरी अपत्य असेल; तर
तिच्या अवहेलनेत आणखीच भर पडते. अनाथाश्रमातील मुलांविषयी वात्सल्याचे पान्हे
फुटणार्या समाजाला मुलांच्या अनाथपणाच्या मूळ कारणांशी जायला नको असते. तिवारी
प्रकरणाच्या बातम्यांमध्ये औरस-अनौरस हे शब्द सतत वापरले गेले. रोहित अनौरस कसा?
कोणतेही मूल अनौरस असूच शकत नाही. कारण त्याला आई-बाप असतातच. त्याच्या
आई-बापाच्या आपसातल्या कायदेशीर संबंधांवरून त्याचे सामाजिक स्थान ठरत असते. रोहितला आई-बाप दोघेही होतेच. बापाने ते नाते
झिडकारल्याने रोहितल्या न्यायालयाची मदत घ्यावी लागली इतकेच.
काळ बदलतो, समाज बदलतो; तसा कायदाही बदलाला कवेत घेत
असतो. आता कायद्याने लग्नाच्या बंधनाशिवाय असलेल्या live in
relationship चीही नोंद घेतली आहे. अशा नात्यांतून जन्माला येणारी
मुले, अशा नात्यांत स्त्रीवर होणारे अत्याचार यांचीही दखल बदलेला कायदा घेतो. पुरूषाचे
एका वा अधिक स्त्रियांशी विवाहातून वा विवाहाशिवाय तयार झालेले नातेसंबंध, त्यातून
जन्माला येणारी मुले, त्यांची उपेक्षा, पत्नी वा पुढच्या स्त्रियांवर होणारा
अन्याय, मालमत्ताविषयक वाद, खटले इ वर्षानुवर्षे चालत आले आहे. मात्र आता प्रगत
वैद्यकशास्त्रामुळे ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ ही वेळ खरोखरच आली आहे.
जुन्या मराठी चित्रपटांपासून आताच्या ‘गॅंग्ज ऑफ
वासेपूर’ पर्यंत सत्ताधुंद पुरूषांच्या स्त्रियांशी असलेल्या संबंधांचे चित्रण आहे.
आजच्या वासेपुरी गॅंग्जच्या तुलनेत पूर्वीच्या मराठी चित्रपटातले प्रसंग भलतेच
साधेसभ्य वाटावेत असे. याचाच अर्थ सत्ता भोगण्याचे नवनवे आणि अश्लाघ्य मार्ग
सत्ताधारी (सर्वच क्षेत्रातले) अवलंबताहेत असे दिसते. स्त्री-पुरुष संबंधही
गुंतागुंतीचे होत चाललेत. तिवारी प्रकरणाचा पिच्छा मिडियाने पुरवला नसता; तर
त्याचा असा वेध घेता आला नसता. प्रकरण ‘गॉसिप’ म्हणून चघळण्यापेक्षा त्यातील
गुंतागुंत उलगडून दाखवण्याची प्रसारमाध्यमांची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे; हेही या तिवारी-प्रकरणाने पुन्हा जाणवले.
No comments:
Post a Comment