18 July, 2012

जिम पोरी जिम


आज जिममध्ये माझ्या प्रशिक्षकाने मला नवे व्यायाम शिकवले. खूप मजा आली. लहान मुलाला एखादं नवं खेळणं मिळाल्यावर वाटत असेल; अगदी तसंच वाटलं. व्यायाम पूर्ण करून घरी परतताना रोजच्यापेक्षा जास्त उत्साह आणि आनंद वाटला.

मी जिममध्ये जायला सुरूवात केली; त्याला दोन वर्ष पूर्ण होतील. यापैकी एकूण पाऊण वर्ष विविध कारणांमुळे जिमला जाणं होऊ शकलं नाही. सुरुवातीचा कंटाळा, कधी घरातल्या अडचणी, माझे मुंबईबाहेरचे दौरे आणि माझ्या दोन शस्त्रक्रिया. खरं तर जिम घरापासून अवघ्या चार मिनिटांवर आहे. त्यामुळे दांडी मारायला तितकंच सबळ कारण लागतं! सहजी बुडवता येत नाही.

घरातल्या आणि बाहेरच्या कामांसाठी (पोटासाठी) करावी लागणारी ऊठबस सोडल्यास मी शरीराला फार तोशीस कधी दिली नव्हती. मुळात पिंड बैठेपणाकडे झुकणारा. (आता पिंडही बदलला!) घरात वाचनाचा वारसा होता. व्यायामाचा नव्हता. पण नोकरी सोडताना (जून २००९) आता स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं असा एक संकल्प केला होता. पण म्हणून लगेच जिम सुरू करायची तत्परता दाखवली असं झालं नाही. नोकरी सोडल्याने रोजचं रेल्वेने जाणं-येणं बंद झालं. त्या प्रवासाचा ताण एकदम संपला. सहाजिकच सकाळी सावकाशीने उठणं, चहापान, वृत्तपत्र वाचन असं सुरू केलं. ‘संपर्क’च्या काही कामांची जबाबदारी, त्यासाठीचे दौरे इ सुरू होतंच. पण ऑफिसची रोजची धावधाव नव्हती. त्यामुळे शरीर आळसावायला सुरूवात झाली. सकाळी उठल्या-उठल्याच मला कंटाळवाणं, क्वचित विफल वाटू लागायचं. (त्याला काही खाजगी, कौटुंबिक कारणंही होती. पण ती माझ्या नियंत्रणापलीकडची होती.) दिनक्रम बेशिस्तीचा होऊ लागला. मला त्यावर नियंत्रण आणायचं होतं. तरीही एक वर्ष तसंच गेलं. आळसाची, वाढत चाललेल्या वजनाची चर्चा एकदा नेहाशी करत होते; तेव्हा तिने ‘समोरच आणि इतक्या जवळ’ असलेल्या जिममध्ये नाव घालायचं सुचवलं. आणि तिचं म्हणणं मी ताबडतोब मनावर घेतलं. ती फिटनेसच्या बाबतीत चांगली तत्पर आणि अभ्यासू मुलगी आहे. माझा नोकरीत संघर्ष सुरू असतानाच्या काळात नेहाने कामं करून चार पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात गोरेगावातल्याच दुसर्‍या एका जिममध्ये जाऊन ट्रेनरचं प्रशिक्षण घेत नोकरीही केली होती. तेव्हाच मी जिम कशी असते; ते आतून पाहिलं होतं. त्यावेळी मला ते एक नव्या काळातलं नवश्रीमंतांचं चंगळवादी फॅड वाटलं होतं. तसल्या ठिकाणी मी कधी जाईन, त्या वातावरणाशी माझं कधी जुळेल; असं वाटणंच तेव्हा शक्य नव्हतं.
पण आता “पाहू तर खरं जाऊन...” असं वाटलं. आणि मी चौकशी करायला गेले. फीचा आकडा ऎकून दचकलेच. त्याखेरीज बूट इ विकत घ्यायचा खर्च! पण एखादा महिना जाऊन बघावंच असं वाटलं. एकदाची फी भरली. स्वस्तातले बूट घेतले. सकाळचा वेळ ठरवून घेतला आणि मनाचा हिय्या वगैरे करून जायला सुरूवात केली. (जुलै २०१०)

ट्रेडमिल या यंत्राची घरी थोडी सवय होती. नेहानेच ते हट्टाने विकत घ्यायला लावलं होतं. (पुढे तिच्या लग्नानंतर मी ते तिच्या घरी पाठवलं).

सुरूवातीला वेगळा अनुभव म्हणून जीममध्ये बरंच वाटलं. तिथे येणारी माणसं मला आधी निराळीच वाटली. कारण ती माझ्या नेहमीच्या संपर्कातली, ‘सामाजिकते’तली नव्हती. हळुहळु व्यायामाने बरं वाटायला सुरूवात झाली. मी तिथे काय काय करते, शिकते ते नेहा अधनं-मधनं विचारायची. तिने मला जमिनीवर करण्याचे (यंत्रांशिवायचे) व्यायामप्रकारही नक्की शिकून घे; असं सांगितल्यावर मी तेही सुरू केलं. तरीही मी तिथे एखादं काम उरकल्यासारखंच जात होते.

तीन महिन्यांनंतर नीट शिकण्यासाठी जादा पैसे भरून प्रशिक्षक घ्यायचं ठरवलं. तेव्हापासून हर्षद साखरे हा माझ्या मुलीहूनही लहान वयाचा मुलगा माझा व्यायामशिक्षक आहे. मी त्याला गंमतीत ‘गुरूजी’ म्हणते. माझं वय, कुवत, मूड या सगळ्याचा विचार करून त्याने मला शिकवायला सुरूवात केली. सोप्या व्यायामप्रकारांपासून कठीण, कमी वजनापासून जास्त, एका सेटमध्ये ५ पासून सुरूवात करून २०-२५ पर्यंत  असा व्यायामप्रवास सुरू झाला. मी या शिकण्यात चांगलीच प्रगती केली आहे आणि मी एक चांगली शिष्या आहे असं त्याचं म्हणणं असतं. तो जे सांगतो; ते मी खरोखरच तसंच करण्याचा प्रयत्न करते. कुणीतरी आपल्याला काहीतरी शिकवतंय याची मला मोठी गंमतच वाटते. (आपणच दुसर्‍याला शिकवायचं किंवा आपल्याला काय आहे आता शिकण्यासारखं...? – या अहंकाराची ऎशी की तैशी!)  मी ते शिकणं अगदी एन्जॉय करते. त्याला शंका विचारते, त्याच्याकडून नवी माहिती घेते. त्याचं मी ऎकते.

या सगळ्या काळात व्यायामाचं तंत्र समजलं. श्वास कधी आणि कसा घ्यायचा- सोडायचा, शरीराची योग्य स्थिती, गती इ तपशील, कार्डिओ, वर्क आऊट, ऎरोबिक्स करण्याच्या योग्य पद्धती, स्वतःला कंटाळा येऊ नये म्हणून व्यायामप्रकारात करण्याचे बदल इ तपशील कळला.  याच जिममध्ये योगा, साल्सा, किक बॉक्सिंग, स्पिनिंग इ प्रकारही शिकवले जातात. मी कॉलेजात असताना निंबाळकरांच्या शिबिरात योगासनं शिकले होते आणि ते शिकलेलं विसरूनही गेले होते. मी योगाही सुरू केलं. तिथे माझी प्रशिक्षक सुजाता निकम ही चाळीशीतली शांत स्वभावाची मुलगी. मजा आणखी वाढली. आपल्या शरीराला हात-पाय, मान-खांदे, मांड्या, टाचा इ अवयव आहेत; एवढंच काय...सूर्यनमस्कार घालताना पाठीमध्ये कणा आहे; हे पहिल्यांदाच कळलं जणू. प्राणायाम शिकताना छातीत श्वासनलिका असल्याचंही नव्याने जाणवलं!  सुरुवातीला गुडघे दुमडून पालथं / उपडं बसणं दोन सेकंदही जमत नव्हतं. आता अर्धा तासही आरामात बसते. शरीर आपलंच असतं. त्याला जीव लावला की ते सहकार्य करायला सुरूवात करतं. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं की मात्र ते मख्खपणा करतं, जराही लवचिकपणा दाखवत नाही.  पाय समोर ठेवून एकेका गुडघ्याला डोकं लावताना शरीर जराही वाकत नसे. आता अगदी सहज डोकं गुडघ्यापर्यंत पोचतं. आता एखादा नवा, अवघड व्यायामप्रकार शिकताना शरीर जेव्हा साथ देतं; तेव्हा मी मनोमन त्याचे आभार मानते.  शरीराशी असा संवाद सुरू झाला, आयुष्यात प्रथमच!

पाच-सहा महिन्यांत माझ्या शरीराच्या मोजमापांत काही इंचांचा फरक पडायला सुरूवात झाली. डाएट्ची जोड दिली होती; त्यामुळे वजनही हटायला सुरूवात झाली. (वजनापेक्षा इंच कमी होण्यालाच तिथे जास्त महत्व दिलं जातं) माझा स्पॉन्डिलॉसिस नाहीसाच झाला. High BP साठीचं औषध घेणं मी बंद केलं. त्याची गरजच उरली नाही.

आणखी मोठा लाभ झाला - माझ्या मानसिकतेत खूप फरक पडला. मला दिवसभर प्रसन्न वाटू लागलं. ताणांचा त्रास कमीकमी होणं सुरू झालं. आळस-कंटाळा कुठच्या कुठे पळून गेले. चालायला, शारीरिक श्रम करायला मजा वाटू लागली. तशी संधीच मी शोधू लागले. जवळपासच्या बाजारात, बॅंकेत पूर्वी मी रिक्षाने जात असे; तिथे मी पायी जाऊ लागले. दिवसातून कितीही वेळा बाहेर जायला लागलं तरी त्याचं काहीच वाटेनासं झालं. असं पायी फिरू लागल्याने आसपासच्या परिसराशीही एक नातं जुळायला सुरूवात झाली. सकाळ-संध्याकाळी इमारतीच्या आसपास येणारा पोपटांचा थवासुद्धा याआधी मी नीट पाहिला नव्हता. आमच्या गृहनिर्माण संकुलातील असुविधा, अस्वच्छता डोळ्याला बोचू लागली. अख्ख्या महाराष्ट्राच्या, देशाच्या वा जगाच्या समस्यांबद्दल जागरुक असलेल्या मला आमच्या परिसरातल्या समस्यांची नीटशी ओळखच नव्हती. रहिवाशांनी एकत्र येण्याची निकड वाटू लागली. समविचारी रहिवाशांशी मी हे बोलायला सुरूवात केली. त्यातून ‘शिवधाम संकुल नागरिक मंचा’ची स्थापना झाली. मंचाने सफाईचं, परिसरव्यवस्थापनाचं काम हाती घेतलं, नगरसेवक-महापालिका यंत्रणा यांच्याशी संवाद सुरू केला. माझा यात पुढाकार राहिला. शरीर-मन सक्रीय राहिल्याने हे सारं घडलं. पुस्तक लिखाण, प्रशिक्षणं घेणं इ माझी अन्य कामं या काळात सुरू होतीच.
जिम माझ्यासाठी थोडी महागडीच आहे. डिस्काउंट वगैरे तिथेही असतोच. पण माझ्या फीमधला काही भाग तिथल्या तरूण प्रशिक्षकांना मिळतो; ही समाधानाची बाब. कारण या क्षेत्रात येणारी हर्षदसारखी मुलं-मुली गरीब आणि अल्पशिक्षित घरांमधून आलेली असतात. त्यांना करिअर घडवण्यासाठी शारीरिक कष्ट घेण्याबरोबरच स्वतःचं ज्ञान वाढवणं, अद्ययावत ठेवणं हेही करावं लागतं. आणि ते ही मुलं आनंदाने करत असतात. घरातली पुस्तकं या मुलांना वाचायला द्यायलाही मी सुरुवात केली आहे.

जेव्हा जिमला जाणं शक्य नसतं; तेव्हा मी घरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करते. पण घरी अनेक अडथळे पार करत ते करावं लागतं. कामानिमित्त मुंबईबाहेर असते; तेव्हा बाहेर चालायला तर नक्कीच जाते. अलिकडे मी खुल्ताबादला गेले होते; तेव्हा बाजुच्या डोंगरावर गेले, भरपूर चालले, योगासनं केली आणि शिकवलीसुद्धा. कुडाळला गेले होते; तेव्हा तर दररोज सात-आठ किमी सहजच चालत होते. नुकतीच पावसात कोकणात गेले होते; तेव्हा हलका ट्रेकही केला. गेल्या वर्षी सिक्कीमला गेले असतानाही भरपूर चालणं आणि थोडा बर्फातला ट्रेक करू शकले. मला आता चालण्यातली मजा कळली आहे; हे महत्त्वाचं.

मी जिमला जाते ती सकाळची वेळ स्त्रिया-पुरूषांसाठी सामायिक असते. माझ्या वयाचे (५६) फार कमीजण येतात. त्यावेळी येणार्‍या माझ्या वयाच्या स्त्रिया तर थोड्याच. त्यामुळे तिथल्या तरूण तुर्कांमध्ये आम्ही थोडेजण असलेले “म्हातारे” उठून दिसतो. सुरूवातीला मला अवघडल्यासारखं व्हायचं. पण मग पाहिलं की तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती त्या ठराविक वेळात जास्तीत जास्त चांगला व्यायाम कसा करता येईल ते बघत असते. त्यामुळे अनोळखी स्त्री-पुरुष एकत्र आल्याने येणार्‍या अवघडलेपणाला तिथे मुळीच थारा नसतो. हे तर मला फारच आवडतं. मी अर्ध्या बाह्यांचा, बंद गळ्याचा टॉप आणि पॅंट घालते. तिथे येणार्‍या तरूण कन्या तर बिनबाह्यांचे, मोकळ्या गळ्याचे कपडे, काहीजणी तर वर फक्त स्पोर्ट्स ब्रा घालतात, मुली-पुरूष अर्ध्या पॅंट्स घालतात. पण तिथे कुणी कुणाच्या उघड्या शरीराकडे बघत बसत नाही. सेक्सच्या पलीकडंचं असं मोकळं वातावरण असतं. (कुणाकुणाच्या एकमेकांशी लाइनी असतात. पण त्याचा संबंध या पोषाखाशी नाही.) सगळेजण ताजेतवाने असतात. एकाद्या प्रासंगिक विषयावर (अण्णांचं आंदोलन, आमीरचा कार्यक्रम, राजेश खन्ना इ) मधूनच चर्चा सुरू होते. एखाद्याने दांडी मारली असली तर त्याची विचारपूस असं चालतं. चालू चित्रपटांवर मल्लीनाथी असते. फिटनेस, डाएट यावर भरपूर बोलणं सुरू असतं. माझंही फिटनेस, आरोग्य या विषयावरचं वाचन (पुस्तक आणि इंटरनेट) वाढलं. गांधीजी-विनोबा यांचं याही विषयातलं काम- सांगणं याचं नव्याने मोल वाटू लागलं. वानगीदाखल हे:
विनोबांनी लिहिलंय – ‘प्रभाते करदर्शनम्‍’ पेक्षा ‘प्रभाते मलदर्शनम्‍’ महत्त्वाचं! (किती खरं आहे ना हे!)
महात्मा गांधींनी आहारशास्त्राची सुंदर व्याख्या केली आहे – “ज्या वस्तू नासतात, सडतात, खराब होवू शकतात त्या वस्तू बहुधा आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या वस्तू नासत- सडत नाही, खराब होत नाही त्या वस्तू आरोग्यासाठी बहुधा चांगल्या नसतात.” आज बनविलेली पोळी, भाकरी, भाजी उद्या बुरशी येवून खराब होते; म्हणून पोळी, भाकरी, भाजी खाणं आरोग्यासाठी चांगले. याउलट बिस्किटसारख्या पॅकिंगच्या वस्तू या महिनोन्‍ महिने टिकतात म्हणून त्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. (काय खावं अणि काय खाऊ नये याची याहून सोपी कसोटी आणखी काय असू शकणार?

मी रोज सकाळी ७-७.३० ला घरातून जिमचं सामान (चांगलासा टॉवेल – भरपूर येणारा घाम पुसण्यासाठी, बूट, पाण्याची बाटली – तिथे चांगलं पाणी असतं; ते आपल्या बाटलीत भरून व्यायाम करताना जवळ ठेवायचं. कारण व्यायाम करताना भरपूर तहान लागत असते आणि सतत पाणी प्यावं लागतं.) घेऊन निघते. आत गेल्यावर बूट घालते. मोबाइलसह बाकीचं अनावश्यक सामान बाजुला ठवते. फ्लोअरवर प्रवेश करते. ओळखीचा माहोल. यंत्र आणि माणसं एका  गतीत संचलन करत असतात. तालबद्ध गाण्याचे सूर कानावर पडतात. माझं शरीर नेहमीच्या लयीच्या ओढीने काम सुरू करतं.  तास-सव्वा तास भरपूर व्यायाम करते. अध्यात्मात निर्विचार मनोवस्थेचं वर्णन असतं. केशवसुतांनी वर्णन केल्यानुसार “विसरुनी गेलो अखिला भेदा ऎकत असता दिड दा दिड दा”   (कविता: सतारीचे बोल) अशीच काहीशी अवस्था असते माझी. व्यायाम संपतो. घामाने निथळल्यावर अगदी ‘पवित्र’ वाटतं. ज्या शरीराच्या माध्यमातून आपण सगळी सुखं भोगतो; त्या शरीराचं देणं फेडल्यासारखं वाटतं. छान वाटतं. म्हणूनच दुसर्‍या दिवशी पुन्हा जावंसं वाटतं.

No comments:

Post a Comment