२८ नोव्हेंबर ०९
प्रेमलग्नाची गोष्ट
१९९१ ची आठवण. वॉशिंग्टन डीसीहून शिकागोला जाणार्या विमानात माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन शेजारणीशी गप्पा सुरू होत्या. शिकागोला काय काम काढलं या प्रश्नावर तिचं उत्तर - “ज्या संस्थेत मी काम करते त्या संस्थेची मिटिंग आहे. आणि नंतर माझ्या विहिणीला भेटायला एक दिवस थांबणार आहे.” हे उत्तर ठीकच होतं. पुढे ती म्हणाली “माझ्या मुलीचं लग्न होऊन दहा वर्ष झाली. विहिणीला भेटायचा योग कधी आला नव्हता. आता चाललेच आहे शिकागोला तर भेटीन म्हणते विहिणीला.” हे ऎकून मला धक्काच बसला. मुलीचं लग्न होऊन दहा वर्ष झाली तरी विहिणींची भेट नाही? मी न राहवून हा प्रश्न तिला विचारलाच. ती म्हणाली – “मी तर मुलीच्या लग्नालाही हजर नव्हते. त्यावेळी काहीतरी अडचण होती. मग मुलगी जावयाला घेऊन एक-दोनदा माझ्या घरी, वॉशिंग्टन डीसीला येऊन गेली. पण विहिणीची भेट झाली नव्हती. आता होईल.” म्हणजे हे सगळं नॉर्मलच होतं तर! त्याउलट आपल्याकडे? लग्न ही आपल्याकडे असामान्य, अलौकिक, न भूतो न भविष्यति अशी घटना मानली जाते. भावना तीव्रपणे व्यक्त करण्याची जागा आणि एकुणात खूप घोळ घालायची घटना असते.
आपण या सदरात बदलणार्या जगाचा विचार करत आलो. या बदलणार्या जगात आपल्याकडच्या लग्नाभोवतालचे घोळ कमी झालेत का? चेतन भगत या आजच्या काळाच्या लेखकाचं ताजं पुस्तक लग्न याच विषयावर आहे. ती आहे लेखकाच्याच लग्नाची गोष्ट. खरं तर भारतीय लग्नाची गोष्ट; त्याहीपेक्षा भारतीय प्रेमलग्नाची गोष्ट. या पुस्तकाचं नाव आहे “टू स्टेट्स – स्टोरी ऑफ़ माय मॅरेज”.
पंजाबी मुलगा आणि तमीळ मुलगी यांच्या प्रेमाची आणि प्रेमलग्नाची ही कहाणी. पुस्तकात हसत खेळत लग्नावर भरपूर भाष्य केलं आहेच. जगात इतरत्र होणारी लग्न साधी-सुधी बिन घोळाची असतात. (सुरुवातीला सांगितलेल्या अमेरिकेतल्या लग्नासारखी.) मुलाचं मुलीवर प्रेम असतं. मुलीचं मुलावर असतं. आणि ते लग्न करतात. बस्स!
भारतात? मुलाचं मुलीवर प्रेम असतं. मुलीचं मुलावर असतं. एवढ्याने कुठे काय होतं? मुलीच्या कुटुंबाला मुलगा आवडावा लागतो. मुलीच्या कुटुंबाला मुलगी पसंत पडावी लागते. एवढ्यानेही होत नसतं. मुलीच्या कुटुंबाला मुलाचं कुटुंब पटावं लागतं. मुलाच्या कुटुंबाला मुलीचं कुटुंब पटावं लागतं.
चेतन भगतच्या या प्रेमलग्नाच्या गोष्टीचे नायक-नायिका क्रिश आणि अनन्या. क्रिश पंजाबी आणि अनन्या तमीळ. पंजाब आणि तमीळनाडू. उत्तर आणि दक्षिण. दोन दिशा. दोन टोकं. दोन भिन्न राज्य. भिन्न संस्कृती. मुलं एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण पालकांचा कडाडून विरोध. क्रिश आणि अनन्याची ही प्रेमकहाणी प्रेमलग्नापर्यंत पोचण्यातले अडथळे, प्रेमिकांनी केलेले प्रयत्न, संघर्ष याची ही गोष्ट. भांडण करणं, बंड करणं सोपं. पण दुसर्याचं मन वळवणं महाकठीण. ते हे प्रेमिक करू शकतात किंवा नाही ते पुस्तक वाचून वाचकांनी जाणून घ्यावं.
लग्नाच्या गोष्टीपलीकडे हे पुस्तक आणखी कशाचं तरी आहे. माहिती तंत्रज्ञानाचा महापूर, वादळ, भूकंप काहीही येवो. लग्नाशी जोडलेली पारंपारिकता, रूढीप्रियता, कर्मठता तसूभरही न सोडणार्या नवभारतातल्या न बदललेल्या माणसांची, समाजांची गोष्टही या पुस्तकात येते. माणसांच्या न बदलण्याच्या मानसिकतेचीही भरपूर खिल्ली लेखकाने उडवली आहे.
ही गोष्ट नव्या काळातल्या भारतीय युवकांचीही आहे. जीवनात लांडीलबाडी करू नका. प्रामाणिक रहा. पण जीवन अती गांभीर्यानेही घेऊ नका. असं सांगणार्या चेतन भगतच्या या पुस्तकाचे नायक-नायिका आणि कथेतली अन्य तरुण पात्र अशीच आहेत. कठीणातल्या कठीण प्रसंगी परिस्थितीवर, स्वत:वर विनोद करणारी, हट्टाग्रह, अभिनिवेश यापासून मुक्त राहणारी, अतिरंजितपणापासून दूर असणारी मुलं-मुली इथे भेटतात.
आता पुस्तकापलीकडलं. चेतन भगतच्या ब्लॉगवरची ताजी प्रतिक्रिया. एका पंजाबी अंकलनी दिलेला कबुलीनामा वाचण्यासारखा आहे. स्वत:च्या मुलीची केरळी तरुणाबरोबरच्या प्रेमाची कहाणी सांगून या अंकलनी चेतनचं पुस्तक वाचून आपला विरोध मावळला आणि मुलीच्या प्रेमलग्नाला आपण कसे मनापासून तयार झालो ते सांगितलं आहे. या पुस्तकाने पालकांच्या विरोधापायी अडलेल्या कितीतरी प्रेमलग्नांचा मार्ग मोकळा केला आहे.
जाती-धर्माच्या बाहेर प्रेम करणार्या मुला-मुलींना धडा शिकवताना त्यांचा जीव घेण्यापर्यंत पोचणार्या पालकांच्या कहाण्या आपण आजवर वाचत आलो. चेतन भगतची प्रेमलग्नाची गोष्ट आणि त्यावरच्या वाचकांच्या प्रतिक्रिया वाचताना पुराणमतवादी मानसिकता बदलू शकते अशी घट्ट आशा मनात निर्माण होते.
मेधा कुळकर्णी.
No comments:
Post a Comment