२६ डिसें ०९
कुटुंबसंमेलन
आजी-आजोबांनी ठरवलं कुटुंबातली माणसं विखुरली आहेत. काहीतरी कारण काढून त्यांना एकत्र आणलं पाहिजे; मुख्यतः तरुण पिढीला. कोणी लंडन, कोणी मिनेसोटा, कोणी सिंगापुरला; कोणी बंगलोर, चेन्नई, हैदराबादला; तर कोणी औरंगाबाद, नागपूर, कुडाळला. उरलेले मुंबई-पुण्यात. सगळे जगभर पसरलेले. पणजोबा अजुन जिवंत आहेत. म्हणजे त्यांच्यापासून मोजलं तर पाचवी पिढी जन्माला आली आहे. तिसर्या-चौथ्या पिढीला तर सगळ्या कुटुंबियांची धड ओळखसुद्धा नाही. मुलं, सुना, जावई, नातवंडं....सगळी मोजली तर शंभर नक्कीच भरतील. तशी भली आहेत सगळी. पण त्यांना फारशी ओढ नाही राहिलेली कुटुंबियांशी जोडून घ्यायची. प्रयत्न केला तर येतील सगळे एकत्र. येतील तेव्हा घडेल त्यांना त्यांच्या कुटुंबमहावृक्षाचं दर्शन. राहातील काही काळ या वृक्षाच्या सावलीत. मग जातीलच जगभर आपापल्या कामाच्या ठिकाणी. जाताना एक ओळख तरी घेऊन जातील. कुटुंबाच्या सदस्यत्वाची. ते सारेजण जगाचे नागरिक आहेतच. पण त्यांचं मूळ जिथे रुजलं, वाढलं त्या कुटुंबाशीही त्यांची ओळख टिकून राहायला हवी.
पणजोबांच्या नव्वदाव्या वाढदिवसाचं निमित्त केलं आणि ठरवलं सगळ्यांना एका ठिकाणी जमवायचं. कुटुंबसंमेलनच घडवून आणायचं. पण संपर्क कसा करायचा? ज्या तरुण पिढीला कुटुंबाची ओळख करून द्यायची आहे त्यांना याचं महत्व कसं पटवून द्यायचं? त्यांना फोनवर बोलायलाही एखाद्या मिनिटापलीकडे धड वेळ नसतो. बर्याचदा तर ही मुलं फोन रिसिव्ह करून “बिझी आहे जरा...नंतर करते / करतो” असं म्हणून पुन्हा कधीच स्वतःहून फोन करत नाहीत.
आजींनी मार्ग काढला. एका नातवाला, सुनेला विश्वासात घेऊन आपला बेत आणि त्यामागचा उद्देश सांगितला. नातू आणि आणि नातसून दोघांनी मनावर घेतलं आणि काम सुरू केलं. आजोबांनी स्वतःच्या हाताने लिहिलेलं कुटुंबसंमेलनाविषयीचं निमंत्रण पत्र नातसुनेने इमेलवर काहीजणांना पाठवलं. पत्रच इतकं परिणामकारक होतं की कुणी नकार देणं शक्यच नव्हतं. शिवाय आपल्या भावंडांना, आत्या-मावशांच्या, काका-मामांच्या कुटुंबांना भेटणं, जुन्या ओळखी जाग्या करणं आणि कुटुंबात नव्याने सामील झालेल्यांच्या ओळखी करून घेणं हे सारं हवंहवंसं वाटण्याजोगच होतं. मित्र-मैत्रिणींना भेटून जसं छान वाटतं तसंच भावंडांना भेटूनही वाटेलच. यश-अपयश, सुख-दुःख, मदत यांची देवाण-घेवाण कोणाला नकोय? आणि एकदा समोरासमोर ओळख झाली की मग नेटवर संवाद सुरू ठेवता येईलच.
आजोबांच्या पत्राची ती मेल पुढे पुढे सरकत राहिली. सर्वदूर जाऊन पोचली. दिव्याने दिवा पेटावा तसं झालं. हळुहळु प्रतिसाद येऊ लागला. कुणी फोटोंची देवाण-घेवाण सुरू केली. पोरांनी ऑर्कुटवर कुटुंबाची कम्युनिटी तयार केली. तिथे पटापट सगळेजण जमा झाले. वर्षअखेरच्या आठवड्यातले दोन सोयीचे दिवस आणि मुंबईजवळ सोयीची जागा ठरली. संमेलनाचा कार्यक्रम आकाराला येऊ लागला. आजी-आजोबांविषयी नातवंडं बोलणार होती. जावई आणि सुना यांच्यासाठी खास वेळ ठेवला गेला. बालसंमेलनाची निराळी आखणी झाली. सगळ्या आज्यांनी जुन्या फोटोंचे आल्बम कपाटातून शोधले आणि नातवंडांच्या हवाली केले. ते जुन्या काळातले ब्लॅक ऎंड व्हाइट फोटो नव्या पिढीला अर्काइव्हल व्हॅल्युचे वाटले. नातीने सगळे फोटो कंप्युटरवर टाकून नव्यासारखे केले आणि त्याला छान शीर्षकं दिली. प्रत्येक फोटोशी जोडलेल्या आठवणी सांगणारा एक दृक-श्राव्य कार्यक्रमच तयार झाला. ज्यांनी प्रेमविवाह केला आहे त्यांच्या मुलाखती, व्यवसायाशी संबधित किस्से, मजेदार खेळ, गाणी असा रंगतदार कार्यक्रम.
आखणी करता-करताच संवादही सुरू झाला होता. मेल, चॅटिंग, फोन असं नेटवर्किंगही झालं. कुटंब संमेलन भरवण्यामागे आजी-आजोबांचा जो उद्देश होता तो सुफळ व्हायला सुरुवात झाली. प्रत्यक्ष संमेलनात तो संपूर्ण झाला.
संमेलनातून ज्येष्ठांना जाणीव झाली की तरुण पिढी आपण समजतो तशी एकलकोंडी नाही. त्यांनाही एकत्र येणं हवं आहे. ज्येष्ठांना अशीही जाणीव झाली की तरुण पिढी खूपच कर्तबगार आहे. नातवंडांना विविध विषयातली इतकी माहिती आहे की आपलं ज्येष्ठत्व फक्त वयापुरतंच उरावं. आजी-आजोबांच्या लक्षात आलं की त्यांना असलेली जगाची माहिती आता पार जुनाट होऊन गेली आहे. आणि तरुण पिढीशी संवाद साधायचा तर ही जुनी माहिती उपयोगाची नाही. जुनी साधनंही कामाची नाहीत.
मुला-नातवंडांना कळलं की आजी-आजोबा, आत्या-मावशा-मामी-काकी, काका-मामा हे सगळे भले लोक आहेत. या सगळ्यांना आपली नवी भाषा, नवी साधनं कळत नसतील पण त्यांची स्वतःची अशी एक ओळख आहे. या ओळखीचा मान ठेवायला हवा असं मुलांना वाटत राहिलं.
कुटुंब संमेलनाचा समारोप करताना आजी-आजोबा म्हणाले – आमच्या काळातही जग बदलत होतच. आता ते फार वेगाने बदललं आहे. आणखी बदलत आहे. राजकीय, आर्थिक आणि तंत्रवैज्ञानिक कारणं त्यामागे आहेत. देश, समाज आणि माणसांचे नातेसंबंधही या बदलाने ढवळून निघत आहेत. नवे संबंध, नव्या संस्कृती आकार घेत आहेत. याचा फायदा पोरांनो, तुम्ही घेताच आहात. ते तुमच्या जीवनशैलीवरून दिसतच आहे. चांगलंच आहे ते. पण पोरांनो बदल निव्वळ वरवरचा नको. माणूस म्हणवून घ्यायला शरम वाटेल असं काही करू नका. आतूनही बदला. ग्लोबल म्हणून मिरवताना जगाला भेदभावापलीकडे जाऊन खरोखरच आपलसं करा. आधिक चांगल्या, अर्थपूर्ण माणूसपणाच्या दिशेने जात राहा.
मेधा कुळकर्णी.
No comments:
Post a Comment