06 September, 2010

येथे चौकशी करावी

- ३१ ऒक्टोबर - मेधा कुळकर्णी

आजोबांना त्यांचा जुना रेडिओ दुरुस्त करून हवा होता. नेहमीच्या रिपेअरवाल्याने ते जमणार नाही म्हणून सांगितलं. नातीने पटकन "जस्ट डायल"ला फ़ोन लावला आणि परिसरातल्या पाच-सहा रेडिओ दुरुस्तीवाल्यांचे नंबर मिळवले. आजोबांचं काम एका कॊलमध्ये होऊन गेलं. उपकरणांच्या दुरुस्त्या करणारे, घराला लागणार्‍या सेवा पुरवणारे, खरेदीसाठी योग्य दुकान, खादाडीसाठी हॊटेल्स, तयार वस्तू पुरवणारे वगैरे वगैरे वगैरे ...."जस्ट डायल" चा फ़ोन फ़िरवला की हवी ती माहिती तुमच्या मोबाइलमध्ये एस एम एसच्या किंवा संगणकात इ मेलच्या रूपात हजर. फ़ोन नंबर, पत्ते लिहून घेण्याचाही त्रास नको. अलिकडे तर "जस्ट डायल"वाले आपल्याला हव्या असणार्‍या सेवेला आपला फ़ोन थेट जोडूनच देतात. म्हणजे पुन्हा दुसर्‍यांदा फ़ोन करण्याचा व्यापही नको. खरोखरच एका कॊलमध्ये काम.

"जस्ट डायल"मधून उपकरण दुरुस्ती किंवा दुकान किंवा हॊटेल, थिएटर यांची माहिती मिळणं ठीक. लाडू, चकल्या, चिवडा हे पदार्थ मिळणंही ठीकच. पण हॊस्टेलवर राहणारी भाची सांगत होती की गणेश चतुर्थीच्या दिवशी तिच्या मैत्रिणींना उकडीचे मोदक खायची इच्छा झाली. पण त्या इच्छापूर्तीसाठी अभ्यास सोडून, ट्रेन-बस-रिक्षा असा प्रवास करत कुणा नातेवाइकाच्या किंवा अगदी स्वतःच्यासुद्धा घरी जाणं परवडण्यासारखं नव्हतं. हॊस्टेलच्या परिसरात उकडीचे मोदक करून देणारं कोणी भेटलं नाही. मग माहिती काढण्याचा हमखास मार्ग म्हणजे "जस्ट डायल". पण उकडीच्या मोदकांसारखा खास घरगुती पदार्थ करून देणार्‍याची, खर तर देणारीची माहिती तिथे मिळेल? भाचीने चौकशी केली आणि चक्क केतकर नावाच्या उकडीचे मोदक करून देणार्‍या बाई सापडल्या. ऒर्डर दिली. संध्याकाळी हॊस्टेलवर छानपैकी उकडीच्या मोदकांची पार्टी झाली. यंदा दिवाळीच्या फ़राळाचे जिन्नस अनेक मैत्रिणींनी "जस्ट डायल"वरूनच बुक केल्याचं कळलं. यात विशेष काहीच वाटलं नाही.

हे सगळं सुरु कसं झालं? व्ही एस एस मणी हे "जस्ट डायल"चे जनक. टेलिफ़ोन डिरेक्टरीसाठी यलो पेजेस तयार करणार्‍या कंपनीत मणी नोकरी करत होते. तिथे एका गिर्‍हाइकाबरोबर झालेल्या चर्चेतून ग्राहकांनी डायल केल्याबरोबर त्यांना सेवा आणि वस्तू यांची माहिती चोविस तास पुरवणार्‍या सर्च इंजिनची कल्पना त्यांना सुचली. आणि मणी कामाला लागले. "जस्ट डायल"ची सुरुवात १९९२च्या सुमारास झाली खरी. पण लगेचच ते बंद पडलं. माहितीतंत्रज्ञानाच्या प्रभावाचा काळ अजून यायचा होता. एका लॆंड फ़ोन कनेक्शनसाठी वर्षानुवर्ष तिष्ठत राहण्याचा तो काळ. मोबाइल यायचाच होता. त्यामुळे मणी यांची माहिती देणार्‍या या सर्च इंजिनची कल्पना लोकांच्या पचनी पडली नाही. पुढे १९९२ ते ९६ या काळात मणी यांनी या कल्पनेवर खूप काम केलं आणि १९९६ मध्ये आता आहे त्या स्वरुपातलं "जस्ट डायल" सुरू झालं. सुरू करण्यासाठी मणी यांनी वापरलेलं भांडवल होतं उधार उसनवार मिळवलेलं फ़र्निचर, भाड्याने आणलेले संगणक, भाड्यावरच घेतलेली एका गॆरेजमधली दहा बाय तीस ची जागा आणि पनास हजार रुपये...बस्स. ग्राहक आणि त्यांना सेवा देणारे यांचा मेळ घालून दोघांचाही; आणि स्वतःचा, म्हणजे "जस्ट डायल" चा फ़ायदा करून देणारं हे एक बिझिनेस मॊडेल बनलं. आपल्या सेवेतून माहिती मिळवणार्‍या एकाही ग्राहकाला आपला फ़ोन नंबर आठवत नाही असं व्हायला नको असं मणी यांचं म्हणणं होतं. म्हणूनच तर "जस्ट डायल"चा स्थानिक नंबर २२८८८८८८ आणि राष्ट्रीय नंबर ३९९९९९९९ हा आहे. विसरभोळ्यांच्यासुद्धा सहजच आठवणीत राहू शकणारा.

आज "जस्ट डायल"ची उलाढाल पाचशे कोटींच्यावर गेली आहे. दर वर्षीची मिळकत शंभर कोटींच्या पुढे आहे. भारतातल्या २४० शहरांत ही सेवा उपलब्ध आहे. इथे दररोज वीस लाखाहून अधिक फ़ोनकॊल्सना उत्तरं दिली जातात. याखेरीज "जस्ट डायल"च्या वेबसाइटमधून, मोबाइल-एस एम एस सेवेतून माहिती मिळवणारे लाखो लोक आहेतच. "जस्ट डायल"ने आता उत्तर अमेरिकेत स्थानिक सर्च इंजिन सुरू केलं आहे.

नवतंत्रज्ञानाच्या युगात "जस्ट डायल"सारखी सेवा निर्माण होणं अपरिहार्यच होतं. ग्राहकांना हवी ती माहिती वेगाने आणि विनासायास उपलब्ध होणं हे तर इथे घडतं आहेच. अशा सेवांमुळे टेलिफ़ोनची छापील डिरेक्टरी इतिहासजमा झाली आहे. आपल्याला हवा असलेला पत्ता, फ़ोन नंबर आपल्या मोबाइलमध्येच येऊन पोचला की लगेच फ़ोन लावणं, ती माहिती साठवून ठेवणं हे सगळं आपोआपच होतं. ग्राहक म्हणून आपल्याला सुखावणारं आणखी एक या "जस्ट डायल"मध्ये घडतं. आपण "जस्ट डायल"ला जेव्हा दुसर्‍यांदा फ़ोन करतो तेव्हा तिथली फ़ोन घेणारी व्यक्ती चक्क आपलं नाव घेऊन बोलायला सुरुवात करते. म्हणजे आपण त्यांना जेव्हा पहिल्यांदा फ़ोन केलेला असतो तेव्हा तिथे आपलं नाव, आपला फ़ोन नंबर, इ मेल आय डी अशी सगळी माहिती नोंदवली गेलेली असते. आणि पुढच्या प्रत्येक खेपेला ती वापरली जाते. ग्राहकाचा रुबाब यामुळे वाढतो.

"जस्ट डायल"मध्ये आणखीही काही आहे. इथे नोंदवल्या जाणार्‍या माहितीचा अभ्यास केल्यावर जाणवतं की नव्याने व्यवसाय सुरू करणार्‍यांची गर्दी जास्त आहे. उद्योगिनी स्त्रियांची तिथली वाढती नोंदणी हे उद्योग-धंद्याच्या क्षेत्रात स्त्रियांची दमदार वाटचाल सुरू असल्याचं लक्षण आहे. पाळणाघर, ब्युटी पार्लर चालवणार्‍या, शिकवण्या घेणार्‍या, घरगुती वस्तूंची विक्री करणार्‍या स्त्रियांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी, आपला व्यवसाय वाढवण्यासाठी "जस्ट डायल"सारखी सेवा मदतकारक ठेरली आहे. तिथे नाव नोंदवणारे सांगतात की व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात या सेवेचा खूपच उपयोग होतो. तंत्रज्ञान सामान्य माणसाचं बळ कसं वाढवतं त्याचं "जस्ट डायल" हे उदाहरण आहे.

No comments:

Post a Comment