५ डिसें
रिऍलिटी टुरिझम
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या एका प्लॅटफॉर्मवर शेखर परदेशी पाहुण्यांना घेऊन येतो. फळांचा ज्युस विकणार्या एका टपरीच्या छतावर कार्डबोर्डचे खोके सपाट करून अंथरले आहेत. ते दाखवत शेखर त्या ऑस्ट्रेलियन पाहुण्यांना सांगतोय – “ बघा..तिकडे त्या टपरीवर रस्त्यावरची काही मुलं रात्री झोपतात.” वर्दळ आणि गोंगाट असलेलं हे भारताच्या राजधानीच्या शहराचं स्टेशन. तिथल्या एका प्लॅटफ़ॉर्मवरची टपरी, तिचं छत ही मुलांच्या झोपण्याची जागा? परदेशी पाहुण्यांच्या मनातले प्रश्न शेखरने ओळखलेत. मग तो स्वत:चंच उदाहरण देऊन सांगू लागतो – “मीही असाच कुठेतरी निवारा शोधायचो. मी मूळचा बिहारचा. व्यसनं, जुगार यात लहानपणीच अडकलो. माझ्या घराला माझी लाज वाटू लागली. मी नकोसा झालो घरच्यांना. म्हणून पळालो घरातून. तेव्हा बारह वर्षाचा होतो. रस्त्यावर रहाणं काय असतं मला चांगलंच माहीत आहे. सोपं नाही ते....माझ्यासारख्या स्मार्ट मुलांनाच ते जमतं. परदेशी पाहुणे हसतात, शेखरकडे कौतुकाने बघतात. शेखर आता एकवीस वर्षाचा आहे. सलाम बालक ट्रस्ट या सामाजिक संस्थेत तो टूर गाइड म्हणून काम करतो. दिल्लीत येणार्या पाहुण्यांसाठी दोनशे रुपयांची दोन तासांची पहाडगंज परिसर आणि नवी दिल्ली रेल्वे स्टेशनची ही टूर. स्वतः त्या अनुभवातून गेल्यामुळे रस्त्यावरच्या मुलांच्या जगण्याबद्दल, समस्यांबाद्दलही तो बोलतो. स्टेशनवर राहणारी जवळपास दोनशे मुलं काय खातात-पितात, कोणत्या व्यसनांच्या आणि गॅंगच्या विळख्यात कशी अडकतात, हे सगळंही सांगतो.
आणि तिकडे पूर्व आफ्रिकेतल्या केनयाच्या राजधानीत, नैरोबीमध्ये झोपडपट्टीतल्या रस्त्यांवरून परदेशी पाहुण्यांसाठी आयोजित केल्या जाणार्या “गाइडेड वॉक” मधून निघालेले परदेशी पर्यटक. एखाद्या सफ़ारीवर जायला निघाल्यासारखे बूट, पाठीवर सॅक, मिनरल पाण्याच्या बाटल्या, गॉगल्स असे सुसज्ज होऊन किबेरा या जगातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीचं दर्शन घ्यायला निघालेले. स्थानिक खाजगी पर्यटन संस्थांतर्फे शहरातल्या झोपडपट्ट्यांमधली “गाइडेड वॉक्स” २००७ ला नैरोबीत सुरू झाली. वीस डॉलर्समघ्ये गरिबीचं एक्स्पोजर! उघडी गटारं, घाण कुबट वास, कचर्याचे ढीग, पत्र्याच्या मोडक्या-तोडक्या झोपड्या, त्यात कोंबून जगणारी माणसं, मानवी विष्ठा वाहणार्या इतस्तत: विखुरलेल्या प्लास्टिक थैल्या...टूर ऑपरेटर्सनी रूढ केलेला शब्द “फ़्लायिंग टॉयलेट्स”! किबेरावासियांनाही आता आपल्याला बघायला येणार्या माणसांची सवय झालेली. ते आपापल्या झोपड्यांच्या दारात किंवा नाक्यावर उभं राहून ही माणसं पाठ केल्यासारखं पर्यटक पाहुण्यांना “हॅलो, हाउ आर यु?” असं विचारतात. त्यांच्या फोटोंसाठी, व्हिडिओग्राफीसाठी पोझेस देतात. फोटो काढून घेण्यात मुलं तर जास्तच तरबेज झालेली. काळ्या स्त्रिया त्या गोर्या कातडीच्या पाहुण्यांना न्याहाळत राहतात. अशी ही टूर. स्लमडॉग मिलेनियरच्या धर्तीवर बनवल्या जाणार्या “द कॉन्स्टन्ट गार्डनर” सारख्या एखाद्या सिनेमाचं शुटिंग करणार्या क्रुही तिथे सर्व सामुग्रीनिशी हजर असतो.
खुद्द मुंबईत, आपल्या धारावीतही अशाच “साइट सिईंग टुर्स” आयोजित केल्या जातात. कृष्णा पुजारी यांच्या ट्रॅव्हल कंपनीचं नावच “रिऍलिटी टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स”. ते २००६ पासून धारावीच्या अशा गाइडेड टुर्स चालवतात. धारावीतला कुंभारवाडा, चामड्याचा व्यवसाय, साबण, पापड, बेकर्या, रिसायकलिंग आणि दुसरे ढीगभर उद्योग यांची ही टुर असते. अडीच तासांच्या टुरसाठी माणशी तीनशे आणि साडेचार तासांसाठी सहाशे रुपये असा दर आहे. जास्त वेळ द्यायची आणि पैसे मोजायची तयारी असणार्यांना मुंबईतला रेड लाइट एरियेही दाखवला जातो. आता हा रिऍलिटी टुरचा प्रकार ग्रामीण भागातही पोचतो आहे.
जागितिकीकरणामुळे विस्तारलेलं एक क्षेत्र म्हणजे पर्यटन. पर्यटन क्षेत्राचा विस्तार असा सिंगापूर-सिमल्याच्या पलीकडे धारावी-किबेरापर्यंत झाला आहे. या रिऍलिटी टुर्स आयोजकांचं म्हणणं आम्ही पर्यटनाला एक निराळं वळणं दिलं आहे. आणि मिळणार्या नफ्यातला काही वाटा ते या गरीब वस्त्यांच्या विकासासाठी वापरतात असाही त्यांचा दावा आहे. खुद्द पर्यटकसुद्धा टुरला भरलेल्या रकमेच्या पलीकडे वस्तीतल्या गरिबांसाठी देणग्या देतातच.
पर्यटकांचं काय म्हणणं?- “एखादा देश बघायचा म्हणजे फक्त डोंगर-दर्या, प्राणी-पक्षी, म्युझियम्स आणि स्वप्नवत वाटणारा देशातल्या शहरांचा झगझगीत भाग बघणं हे पुरेसं नाही. नव्या बदलणार्या जगात आता वास्तवाकडे डोळेझाक करून कसं चालेल? आम्हाला त्या त्या देशातली हाडामासाची माणसं बघायला मिळणं महत्वाचं.” इजिप्त बघून आफ्रिका बघायला आलेला एक पर्यटक म्हणाला – “इजिप्तच्या पिरॅमिडपेक्षा मी आठवण घेऊन जाईन ती किबेराच्या गरीब माणसांचीच.”
या रिऎलिटी टुरिझमवर टीका करणारे म्हणतात – “हा निव्वळ पैसे कमावण्यासाठी काढलेला नवा प्रकार आहे. सोशल मार्केटिंगचे दिवस आहेत तर काढा नव्या कल्पना, कमवा पैसे.”
सांगा, आपण काय म्हणायचं?
मेधा कुळकर्णी
No comments:
Post a Comment