06 September, 2010

जुने जाउद्या...

१९ सप्टेंबर ०९ -

जुने जाउद्या...

काळ जसजसा बदलत जातो तसतसं व्यक्ती म्हणून, समाज म्हणून आपणही बदलत जातो असं दिसतं. म्हणजे नेमकं काय होतं? आपले अगोदरचे विचार, आपल्या भूमिका नव्याने तपासून, जोखून घ्यायची वेळ आपल्यावर येते. आपल्यावर बदलायची "वेळ येतेअसं म्हटलं कारण अनेकदा असं होतं की आपल्याला स्वत:हून बदलायचं नसतं, सोन्यासारखं वाटणारं जुनं सोडायचं नसतं. पण भोवतालची परिस्थितीच इतकी बदलते की आपल्याला मनाविरुद्ध का असेना बदलणं भागच पडतं. अर्थकारण आणि तंत्रज्ञान हे दोन प्रभावशाली घटक असे बदल घडवून आणत असतात. कर्ज घेणं हे एके काळी पाप समजलं जायचं. आता क्रेडिट कार्डशिवाय व्यवहार होत नाहीत. घराबाहेरच्या जगातलं मुला-मुलींचं मिसळणं हे ही त्यांच्या पालकांनी दृष्टीआड सृष्टी म्हणून स्वीकारलं आहे. एके काळी संगणकाच्या वापराला विरोध करणार्‍यांनी या तंत्रज्ञानाला आपलसं केलच ना? माणसाची वृत्ती मुळात बदलाला विरोध करण्याची असते. पण मग व्यावहारिक शहाणपण किंवा परिस्थितीचा रेटा यामुळे ती मूळची वृत्ती बाजुला ठेवून माणसं बदल स्वीकारू लागतात. अर्थात रेटा येऊनही जुन्या भूमिका प्राणपणाने जपल्या जातात अशीही उदाहरणं आहेत; खास करून जात, धर्म, वंश, रंग यांच्या अस्मितांच्या संदर्भात. तरीही माणसाला, समाजाला बदलावं लागतंच, सोयीसाठी बाहेर तसं दाखवावं तरी लागतंच.

व्यक्ती बदलतात किंवा व्यक्तींना बदलावं लागतं तसंच संस्थांचंही होतं. कोण्या एके काळी जी उद्दिष्ट घेऊन संस्था सुरू केल्या जातात, संस्थांमार्फ़त जी कामं सुरू केली जातात ती कालांतराने कालसुसंगत राहिली नाहीत असं होतं. हे ध्यानात आलं की उद्दिष्ट तपासून कामाची पुनर्र्चना करण्याचे प्रयत्न सुरू केले जातात. हे सगळं सोपं नसतं. मुळात बदललेल्या जगाचं आकलन नेमकेपणाने होणं महत्वाचं असतं. एका विशिष्ट रीतीने विचार आणि काम करायची सवय झालेली असते. ही सवयही बदलावी लागतेच. कामाची, संवाद-संपर्काची साधनं नवनवी साधनं, माध्यमं येत जातात. भाषा, शैली हे ही जुनं होत जातं. लोकांना, नव्या पिढीला आकर्षून घेणारा कार्यक्रम लागतो....वगैरे वगैरे.

ग्रंथाली या संस्थेचं उदाहरण घेऊनच हे सगळं समजून घेऊया. आत्ता पन्नाशीच्या अलिकडे-पलिकडे असलेल्या वाचन, सामाजिक चळवळींकडे ओढा असलेल्या मुंबई-पुण्यातल्या माझ्यासारख्या अनेकांचं ग्रंथालीशी भावनिक, वैचारिक नातं आहे. ग्रंथाली ही रूढार्थाने संस्था नव्हतीच. वाचक चळवळ याच नावाने ती सर्वपरिचित होती. आताच्या भाषेत बोलायचं तर ते एक नेटवर्क होतं. पुस्तकप्रेमी, समाजस्नेही, कृतीवादी तरुणांचं नेटवर्क. महाराष्ट्रातल्या सर्व चळवळींचं ग्रंथाली हे ऒर्कुट होतं. नव्याचं स्वागत आणि कौतुक करणारी, मुख्य प्रवाहाच्या बाहेरच्या धारांना मानाचं स्थान देणारी ही चळवळ सुरू झाल्यापासून पंधराएक वर्ष जोमात होती. काळाशी सांधा जोडून होती. पुढे काय झालं?

ग्रंथालीची चाकं नव्या काळाच्या रस्त्यावरून चालवण्याच्या प्रयत्नात असलेले संस्थेचे तरुण विश्वस्त धनंजय गांगल यांच्याशी संस्थेच्या नवं-जुनं असण्याची चर्चा केली. १९९२-९३ पासून धनंजय ग्रंथालीसोबत काम करत आहेत. आय आय टीतून इंजिनिअर झालेले आणि कॊम्प्युटर सॊफ़्ट्वेअरचा व्यवसाय करणारे धनंजय बदलणार्‍या जगाचा संदर्भ जराही सुटू न देता विचार करतात. ते म्हणतात - "पूर्वी आतासारखी माध्यमांची गर्दी नव्हती. महाराष्ट्रात जे नवं घडत होतं त्याला एक प्लॆटफ़ॊर्म हवा होता. तो ग्रंथालीने उपलब्ध करून दिला. ग्रंथाली मुळात युवकांच्या, स्त्रियांच्या, दलितांच्या चळवळींनीच घडवली, आकाराला आणली. पुस्तकं छापणं हे ग्रंथालीचं मुख्य काम कधीच नव्हतं. ग्रंथालीसाठी पुस्तकं हे लोकांपर्यंत पोचण्याचं एक साधन होतं. चळवळ आणि प्रकाशन व्यवसाय याचं हे एक कॊम्बिनेशन होतं. आणि तेच ग्रंथालीचं बळ होतं. पण हे मॊडेल आर्थिक दृष्ट्या यशस्वी होऊ शकलं नाही. आणि भांडवल मिळवण्यासाठी ग्रंथाली पुस्तक छापत राहिली."

कोणतंही काम टिकून राहण्यासाठी आणि ते वाढण्यासाठी ते एक बिझिनेस मॊडेल म्हणून यशस्वी होण्याची गरज असते. कामाला पैसा लागतो आणि माणसं लागतात. स्वयंस्फ़ूर्तीने काम करणारी माणसं पैशाची कसरसुद्धा भरून काढू शकतात. जागतिकीकरणामुळे सुरू झालेल्या बदलांचा एक अटळ परिणाम चळवळीकडे स्वतःहून येणारा माणसांचा ओघ आटण्यात झाला. नोकर्‍या, उद्योग-धंदे या क्षेत्रात बदल होत होते, मध्यमवर्गाला सुखासीनतेची ओढ लागली होती, आर्थिक क्षेत्रात खाजगीकरण वरचढ होत चाललं होतं, बाजाराची सत्ता प्रस्थापित होत होती, चॆनल्सचा जमाना सुरू झाला होता, इंटरनेटने माहितीचं महाद्वार सर्वांसाठी उघडलं होतं. काळ वेगाने बदलत चालला होता. ग्रंथाली कुठे होती?

धनंजय सांगतात - "ग्रंथाली पुस्तकं छापण्यातच रमली होती. जगात होत असलेले बदल समजून घेण्याऎवजी आपण करत आहोत तेच कसं योग्य आहे असाच दॄष्टिकोन होता. एकूणच बदललेल्या जगाला हीन समजलं जायचं, तुच्छ लेखलं जायचं. एक वाचन तेवढं काय ते महान आणि बाकी चॆनल्स वगैरे सगळं घाण असा पवित्रा असायचा. पण याच काळात वॄत्तपत्रांची, मराठी वॄत्तपत्रांची संख्या वाढत चालली होती. महिना तीनशे रुपयात तीन -चार वॄत्तपत्र, तेवढ्याच पैशात शेकडो चॆनल्स मिळू लागली. यातून घरबसल्या माहिती आणि मनोरंजन भरपूर सुरू झालं. लोकांना घराबाहेर पडण्याची गरज वाटेनाशी झाली. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या वेळा वाढल्याने कार्यकर्त्यांना सामाजिक -सांस्कॄतिक उपक्रमांसाठी वेळ काढणं कठीण होऊ लागलं. दुसरीकडे सामाजिक चळवळी थंड होत गेल्या. आणि याच काळात लोकांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोचणारं माध्यम येऊन थडकलं - इंटरनेट. ग्रंथाली या सगळ्या वातावरणात मागे पडत गेली."

आता ग्रंथालीचं रुचीहे मासिक इमेलवरून पंधरा हजार वाचकांपर्यंत पोचतं. बॄहनमहाराष्ट्र अधिवेशनातून ग्रंथाली महाराष्ट्रा-भारताबाहेरच्या मराठी वाचकांपर्यंत पोचते. जनसंवाद सारख्या कार्यक्रमांमधून नव्या रीतीने चळवळ उभी करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. ग्रंथाली ज्या संक्रमणातून गेली, जे पेच तिने अनुभवले त्याच परिस्थितीतून सगळ्याच सामाजिक - सांस्कॄतिक संस्थांना जावं लागलं आहे. आजच्या काळात जुन्या पद्धतीने संस्था चालवून भागणार नाही. आपापल्या सुरक्षित घरट्यांमधून बाहेर पडावंच लागेल. खुल्या मनाने नव्याला सामोरं जावंच लागेल. ग्रंथाली थंडावल्याचं वैषम्य अशासाठी की ती त्या जुन्या काळातही नव्या पद्धतीने, खुल्या विचारानेच काम करत होती. अगदी १९९०-९२ मध्येही ग्रामीण-शहरी मराठी नवसाक्षर वाचकांसाठी कोणत्या प्रकारची साहित्यनिर्मिती व्हावी याचा शोध घेण्याचा प्रयत्न ग्रंथालीने केला होता. हे नक्कीच नवं होतं. तरीही कालसुसंगत राहण्यात ती मागे पडत गेली. नवं तंत्रज्ञान वापरता आलं नाही हे त्याचं कारण नक्कीच नाही. नव्या तंत्रज्ञा्नातूनही लोकांना नेमकं काय द्यायचं, त्याहीआधी लोकांना नेमकं काय हवं आहे हे समजण्यातली कमतरता हेच मागे पडण्याचं कारण असणार. हा सगळा पेच, गुंता सोपा नाहीच. तो सोडवणं कोणा एका-दोघांच्या हातातही नाहीच. धनंजय किंवा आणखी तरुण मंडळींना याचं नीट आकलन होऊ शकतं. आणि त्यांच्या प्रयत्नांमधूनच आजच्या काळातलं ग्रंथालीचं ऒर्कुट शोधायला मदत होऊ शकते.

- मेधा कुळकर्णी

No comments:

Post a Comment