24 October, 2010

आक्रोश तोच....

आक्रोश नावाचा सिनेमा मी नुकताच पाहिला. कथेचा मध्यवर्ती विषय ऑनर किलिंग हा आहे. ग्रामीण भारतातल्या कोणत्याही गावा-तालुक्या-जिल्ह्यात घडणारी ही गोष्ट. राजधानी दिल्लीजवळचा हा प्रदेश. जातीचं जोखड मनावर घट्ट असलेली माणसं. बाहेरच्या मोकळ्या विचारांच्या वार्यांचा स्पर्शही न झालेली. दलित मुलावर प्रेम करणारी तथाकथित उच्च जातीच्या, गावाचा ’मालक’ असलेल्या दांडग्या बापाची मुलगी. प्रेमाच्या पूर्ततेसाठी बंड करण्याची हिंमत करण्याच्या आधीच तिला आणि तिच्या प्रियकराला आणि त्यांना मदत करणार्याब शहरातल्या त्याच्या मित्रांना गप्प बसवलं जातं. आणि पुढे या जुलुमी, अख्ख्या गावाला वेठीला धरणार्याप टोळीच्या विरोधातला कायदेशीर संघर्ष.....वगैरे. कथानक तसं जुनंच. बेनेगल – तेंडुलकर यांच्या अंकुर चित्रपटाची आठवण आक्रोश बघताना येते. आणि इतकी (किमान ३०) वर्षं उलटली तरीही जात हे प्रकरण आपल्या समाजातून पातळ व्हायला तयार नाही याचा भयंकर त्रास होतो.
अंकुरमध्ये अन्याय करणारे सरंजामशाहीतले पारंपरिक जमीनदार आहेत.
आक्रोशमध्ये गावाला दहशत बसवणारी टोळी आहे लोकशाही व्यवस्थेने नेमलेले कलेक्टर, एस पी असे सरकारी अधिकारी, गावातले सवर्ण आणि राजकारणी यांची. अंकुरच्या शेवटी अन्यायग्रस्त कुटुंबातला एक लहान मुलगा संतापाच्या भरात जमीनदाराच्या खिडकीवर एक दगड भिरकावतो आणि खिडकीच्या काचेला तडा जाऊन ती फुटते. आक्रोशमध्ये असाच एक मुलगा जुलुम करणार्‍याच्या मनगटाचा त्वेषाने चावा घेतो. आणि शेवटी एक दलित स्त्री या टोळीचा सूड घेते.
सिनेमा म्हणून आक्रोश खूपच लाउड वाटला. कथानक आणि गावातलं वास्तव तेच असलं तरी नव्या काळात झालेल्या काही बदलांची चाहूल आक्रोशमध्ये दिसली. त्या झांझर गावातला तो दलित तरुण दिल्लीच्या कॉलेजात डॉक्टर बनण्यासाठी आलाय. आणि त्याचे जवळचे मित्र आहेत दिल्लीतल्या उच्चभ्रू कुटुंबातून आलेले. दलित तरुणावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध दाद मागणारे मेडिकल कॉलेजातले विद्यार्थी आहेत. आणि त्यांना साथ देणारा मिडियादेखील. गावातल्या प्रकरणाचा छडा लावायला आलेला अधिकारी आहे झांझरसारख्याच एका गावात दलित कुटुंबात जन्मलेला, मोठा संघर्ष करत अधिकारपदापर्यंत पोचलेला तरुण. अशी सर्व जाती-धर्मातली तरुण पिढी जातीपाती आणि अन्य अमानुष परंपरांना उलथवून टाकेलच.
अजय देवगण आणि अक्षय खन्ना सलमान-शहारुखहून किती निराळे आणि खरे आहेत हे जाणवतं. आक्रोश आणखी वास्तववादी करता आला असता असं म्हणताना जातीच्या, ऑनर किलिंगच्या वास्तवाचं दुःख होतं आणि शरमही वाटते.
Collapse





Medha Kulkarni

No comments:

Post a Comment